शहाजीबापूंच्या महूद-सांगोला रस्त्यावर अवतरली गुवाहाटी
भररस्त्यात डोंगर-दऱ्या, वाहनचालकांचे कंबरडे मोडून एकदम ओक्के
थिंक टँक / नाना हालंगडे
“काय झाडी…काय डोंगार…काय हाटील… एकदम कसं ओक्के..” अशा शब्दांत गुवाहाटीचे वर्णन करणारे कवीमनाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे गाव असलेल्या महुद ते सांगोला रस्त्यावर साक्षात गुवाहाटी अवतरली आहे. २५ किमीच्या रस्त्यात ठिकठिकाणी (नव्हे संपूर्ण रस्त्यातच) भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून प्रवास करताना चक्क गुवाहाटीला गेल्याचा फिल वाहनचालकांना येत आहे. पाठीचा कणा खिळखिळा झालेले वाहनचालक “एकदम ओक्के” म्हणून या गावठी गुवाहाटीला धन्यवाद देत आहेत.
इंदापूर-अकलूज-जत हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 जी आहे. या महामार्गा अंतर्गत महूद ते सांगोला हा सुमारे 25 किलोमीटर लांबीचा रस्ता येतो. या मार्गावरील महूद, साखर कारखाना परिसर, वाकी, शिवणे, एखतपूर पाटी, चिंचोली तलाव, गणपती मंदिर, सांगोला येथील महावितरण कार्यालय या सर्वच भागात अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत. तर या मार्गावरील महूद, वाकी, शिवणे, चिंचोली या गावातील ओढ्यांवर असलेल्या पुलांना कुठेही संरक्षक कठडे नाहीत.अत्यंत दुरवस्था झालेल्या या रस्त्यावरून प्रवास करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
आंदोलने केली, पण वाया गेली
या मार्गाच्या दुरावस्थेमुळे अनेकवेळा अपघात होऊन निष्पापांचा जीव गेला आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी येथील नागरिकांनी रस्ता रोको, रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण यासारखी आंदोलने अनेक वेळा केली आहेत. मात्र निर्ढावलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याची कधीच दखल घेतली नाही.
ही कोणाची जबाबदारी?
महूद ते सांगोला या मार्गाने विद्यार्थी, नोकरदार,व्यावसायिक व तालुक्याच्या ठिकाणी विविध कामासाठी जाणारे हजारो नागरिक दररोज प्रवास करत आहेत. शिवाय जत परिसरातील नागरिक याच मार्गाने पुणे व मुंबईकडे जातात. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक ही होत आहे. मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेल्या या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने आतापर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने या रस्त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. नागरिकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या या विभागाचा नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला आहे.
प्रस्तावावर प्रस्ताव… एकासही मंजुरी नाही
महूद-सांगोला या 25 कि.मी. मार्गापैकी सुमारे 13 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण काम मंजूर होते. तसा कार्यारंभ आदेशही ठेकेदारास दिला होता. मात्र या संपूर्ण २५ कि.मी. चे कॉंक्रिटीकरणाद्वारे दुपदरीकरण करण्याचे काम नव्याने प्रस्तावित करावे असा आदेश वरिष्ठ कार्यालयाने दिला. त्यामुळे मंजूर 13 किलोमीटर रस्ता मजबुतीकरणाचे काम रद्द करण्याबाबतचे पत्र कंत्राटदाराने दिले आहे.
हे मंजूर मजबुतीकरणाचे काम रद्द करणे व संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण सह दुपदरीकरण करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. मात्र सन 2021-22 मध्ये या कामाचा समावेश भूतल परिवहन व राजमार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वार्षिक आराखड्यात करण्यात आला नाही.
नवीन कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणे,कंत्राटदार निश्चिती करून प्रत्यक्ष कामास सुरूवात करणे यास विलंब लागण्याची शक्यता असल्याने पुन्हा संपूर्ण 25 कि.मी. लांबीच्या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्याचे अंदाजपत्रकही विभागीय कार्यालयाने भूतल परिवहन व राजमार्ग मंत्रालय यांच्याकडे सादर केले आहे. मात्र त्यासही अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. केवळ प्रस्तावावर प्रस्ताव दाखल करण्याचे काम चालू आहे. प्रत्यक्षात रस्त्यावर कोणतेही काम केले गेले नाही.
कंत्राटदारामार्फत महामार्ग दुरुस्ती
शासकीय स्तरावर सर्वच प्रस्ताव प्रलंबित असल्याने राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने नवीनच शक्कल लढवली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून या विभागाने कंत्राटदारास विनंती करून कंत्राटदारामार्फत या महामार्गाच्या तात्पुरती दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे,असे अधिकारी सांगतात.
एप्रिल महिन्यात केंद्रीय रस्ते निर्माण मंत्री नितीन गडकरी यांचा सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रम झाला होता. त्यावेळी त्यांनी पाटस- इंदापूर-अकलूज-महूद-सांगोला-जत या महामार्गासाठी 520 कोटी रुपये मंजूर केले असल्याची घोषणा केली होती. हे काम वार्षिक अंदाजपत्रकात प्रस्तावित करणार असल्याचेही सांगितले होते. मात्र त्यांच्या घोषणेचा आधार घेऊन इथल्या नेत्यांनी जनतेला आतापर्यंत ….तियात काढले आहे. (कशात हे वेगळे सांगण्याची गरज नाही.)
खरे तर तालुक्याचे आमदार असलेल्या आमदार शहाजीबापू पाटील यांनी इतका खराब असलेल्या, मरणयातना देणाऱ्या या रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याची गरज आहे. मात्र आमदार शहाजीबापू पाटील हे हल्ली चार्टर विमानातून प्रवास करीत असल्याने त्यांना या रस्त्याची दाहकता समजत नसावी. त्यांचे विमान खाली आल्यावर ते नक्कीच हा प्रश्न सोडवतील ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे.
विरोधक कुठे लपलेत?
विजयी आमदारांनंतर दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेले उमेदवार हे नैतिकदृष्ट्या विरोधक म्हणून तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात. मतदारसंघातील प्रश्न, अडचणी चव्हाट्यावर आणून विद्यमान लोकप्रतिनिधींना ताळ्यावर आणण्याची त्यांची जबाबदारी असते. ही जबाबदारी सध्या शेकापचे पराभूत उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख यांच्यावर आहे. मात्र, ही जबाबदारी ते विसरले आहेत. तालुक्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर ते तोंडातून ब्र शब्दही काढत नाहीत. मध्यंतरी त्यांनी गावभेट दौऱ्याचा फार्स केला मात्र पुढे काहीच झाले नाही. इतर पक्षाचे विरोधकही आपल्याच धुंदीत आहेत. “निघतोय धूर तर निघूद्या” अशा मानसिकतेतून ते सध्या बघ्याच्या भूमिकेत आहेत. जनता मात्र सध्या अशा विविध प्रश्नांमुळे प्रचंड संतप्त असल्याचे दिसून येत आहे.
या बातमीशी संबंधित व्हिडिओ
‘मपोसे’ ते आयपीएस अधिकारी : नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास