थिंक टँक स्पेशलशेतीवाडी

वसुबारस म्हणजेच ‘गोवत्स द्वादशी’

दिवाळी सणाचा आज पहिला दिवस

Spread the love

थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे
दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण असून त्याची सुरुवात वसुबारसच्या सणाने होते. आज 21 ऑक्टोबरला वसुबारसचा सण साजरा केला जात आहे. वसुबारसला ‘गोवत्स द्वादशी’ असे देखील म्हणतात. यामध्ये जनावरांची पूजा केली जाते. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन (द्रव्य), त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी.

*वसुबारस म्हणजे काय?
वसुबारस दिवाळी सुरू होण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. हिंदू कॅलेंडरनुसार वसुबारस हा सण आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या बाराव्या दिवशी साजरा केला जातो, हा दिवस गायी आणि वासरांचा सन्मान, पूजा करण्यासाठी ओळखला जातो. ‘वसु’ म्हणजे गाय आणि ‘बारस’ म्हणजे बारावा दिवस, म्हणून वसु बारस हा शब्द आहे.

वसुबारसचा उत्सव सामान्यतः महाराष्ट्र आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये दिसून येतो. येथे, दिवाळीची सुरुवात वसुबारसने होते. महाराष्ट्रात वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी म्हटले जाते. गुजरातमध्ये याला ‘बाग बारस’ म्हणतात आणि दक्षिण भारतात लोक ‘नंदिनी व्रत’ म्हणून हा दिवस साजरा करतात.

*वसुबारसचे महत्व :
आजही भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाचा मोठा भाग आजही शेतीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवतो. म्हणून ग्रामीण भारतातील अनेक भागांमध्ये, लोक त्यांच्या गायी आणि वासरांची पूजा करून हा दिवस साजरा करतात. कारण त्यांच्यासाठी गाय हे त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. घरातील महिला गोपूजा आणि श्रीकृष्ण पूजा करतात. या दिवशी धनाची देवी म्हणून ओळखली जाणारी लक्ष्मी गाईचे रूप धारण करते, म्हणून लोक देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी गाईची पूजा करतात अशी देखील आख्यायिका आहे.

*वसुबारस व्रत :
या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलातुपात तळलेले पदार्थ आणि गायीचे दूध, तूप आणि ताक खात नाहीत. उडदाचे वडे, भात आणि गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सुवासिनी बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद-कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे, वासरे आहेत, त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.

समुद्र मंथनातून निघाली
नंदा कामधेनू गोमाता
पुजन करून वसुबारस
वसा संस्कृती भारता

‘मपोसे’ ते आयपीएस अधिकारी : नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका