लक्ष्मी पूजनादिवशीच लक्ष्मी पावली
सांगोल्यातील शेतकऱ्याच्या डाळिंबाला मिळाला प्रतिकिलो १२५ रूपये दर
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
देशभरात आज लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात होत असताना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात मात्र चक्क लक्ष्मीपूजनादिवशीच एका डाळिंब उत्पादकाला लक्ष्मी पावली. सांगोला शहरामध्ये परराज्यातून आलेल्या डाळींब व्यापाऱ्याने विक्रमी 125 प्रति किलो रुपये दराने 7 हजार 500 किलो (साडे सात टन) माल विकत घेतला. यातून डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला १० लाख 50 हजार रूपये इतके उत्पन्न मिळाले.
- हेही वाचा : जवळा जि.प. गटात अतुल पवार करणार भूकंप?
दोघा बंधूंची यशस्वी झेप
सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील प्रगतशील बागतदार संजय ज्ञानोबा (बाबा) शेजाळ आणि बिरा ज्ञानोबा शेजाळ हे दोन बंधू उच्चशिक्षित असूनदेखील नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेतीला प्राधान्य देत शेती करतात. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंब शेती फुलवली आहे. सांगोला तालुक्यातील जवळपास ९० टक्के डाळिंब बागा तेल्या व मर रोगामुळे उद्ध्वस्त झाल्या असताना शेजाळ बंधूंनी त्यातूनही उत्तम नियोजन करून हे उत्पादन घेतले.
आज गुरुवार ४ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजना दिवशी सांगोला शहरामध्ये परराज्यातून आलेल्या डाळींब व्यापाऱ्याला विक्रमी 125 प्रति किलो रुपये दराने 7 हजार 500 किलो(साडे सात टन) माल विकला गेला. यातून त्यांना १० लाख 50 हजार रूपये इतके उत्पन्न मिळाले.
शेजाळ बंधू पूर्वीपासून शेती व्यवसाय करतात. त्यांच्याकडे शेती 10 एकरात एकूण ३ हजार डाळींब झाडे आहेत. वार्षिक उत्पन्न 20 लाख रुपयापर्यंत आहे. याच बंधूंनी मागील दोन महिन्यापूर्वी १० लाखाचे उत्पन्न घेतले होते. मागील ८ वर्षापासून हे बंधू डाळींब शेती करीत आहेत. त्यांची पूर्वीची परस्थिती खूप हलाखीची होती. वडील ज्ञानोबा शेजाळ हे ऊस तोडणीच्या हंगामावर मुकादम होते. पण उच्चशिक्षित मुलांनी नोकरीच्या मागे न लागता आपली शेती विकसित केली. सध्या त्यांच्याकडे डाळिंबाची 3 हजार झाडे आहेत. त्यांना हे शेतीचे गमक सापडले असून अजूनही यामध्ये ते विकसित करीत आहेत.
तालुक्यावर तेल्याचे संकट
सांगोला तालुक्यात २५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर डाळींब बागा आहेत. पण या हंगामातील अनेकांच्या बागा तेल्याने उद्स्वस्त झाल्या आहेत. अशात या शेजाळ बंधूंनी अपर कष्ट करून ऐन लक्ष्मी पुजनादिवशी विक्रमी दर घेवून सांगोल्याच सोन किती अस्सल आहे हे दाखवून दिले आहे.