जवळा जि.प. गटात शेकापकडून अतुल पवार प्रबळ दावेदार
शेकापशी सलगी, रोजची ऊठबस देत आहे नवे संकेत
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम वाजण्याआधीच सांगोला तालुक्यात यानिवडणुकांचे वारे जोमाने वाहू लागले आहे. जो तो इच्छुक उमेदवार आपला गट निवडू लागला आहे. अशातच जवळा गटामधून एखतपूर जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य अतुल पवार यांनी निवडणूक लढविण्यासाठी दंड थोपटले आहेत.
- हेही वाचा : जवळा जि.प. गटात अतुल पवार करणार भूकंप?
सद्या ते शेकापकडून उमेदवारीसाठी चर्चेतही आहेत. त्यांची शेकापसोबतची रोजची ऊठबसही वाढली आहे. त्यामुळे ते प्रबळ दावेदारही मानले जात आहेत. मागील काही दिवसांपूर्वी थिंक टँक न्यूज नेटवर्कशी बोलताना अतुल पवार यांनी मी जवळा गटातूनच निवडणूक लढवणार असल्याचे सांगत शेकापची उमेदवारी मलाच मिळेल, असे स्पष्ट केले होते.
मिनी मंत्रालयासह नगरपालिका विधान परिषद निवडणूकीचे पडघम वाजू लागलेत. सर्व पक्ष जोमाने कामालाही लागले आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी कामांचा सपाटाही सुरू आहे. उद्योगपती अतुल पवार यांनी त्यांच्या एखतपूर गटात विकास कामांचा डोंगर रचत आता लगतच्या जवळा गटात विकासकामे सुरू केली आहेत. जवळा जि.प. गटात अतुल पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यातच तालुक्यातील युवा नेते आनंदा माने हे पाठीशी असल्याने त्यांना जवळा गटाची ही निवडणूक लाभदायक ठरेल असा विश्वास आहे.
शेकापकडून निवडणूक समिती
आगामी जिल्हा परिषद, सांगोला नगरपालिका तसेच पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतीच बैठक झाली. यावेळी शेकापचे नेते, प्रमुख कार्यकर्ते बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत कमिटी नेमण्यात आली आहे. उमेदवाराच्या चाचपणीबाबत व्यूहरचना केली जात आहे.
कसे असेल निवडणुकीचे चित्र
जवळा गटात शेकापला मानणारा मोठा वर्ग आहे. धनगर समाजाची संख्याही जास्त आहे. अतुल पवार यांना या गटात उमेदवारी मिळाल्यास येथील निवडणूक प्रतिष्ठेची बनणार आहे. या गटात शेकापकडून इच्छुक म्हणून अतुल पवार यांचेच एकमेव नाव पुढे येत आहे. असे असले तरी अद्याप उमेदवारी बाबत शेकापकडून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. लवकरच ही घोषणा होऊ शकते. मात्र उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अतुल पवार हे या गटात विकासकामे करून वातावरण तापवत असल्याचे दिसत आहेत.