‘बच्चन’ व्हायचंय का तुम्हाला?
संपादक संजय आवटे यांचा अभ्यासपूर्ण लेख
‘नेहरूंनंतर कोण’ हा प्रश्न अद्याप सुटलेला नव्हता. लालबहादूर शास्त्री यांच्या अकाली जाण्यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या ख-या, पण त्यांना अद्याप देशाने आणि त्यांच्या पक्षानेही पूर्णपणे स्वीकारलेले नव्हते. जयप्रकाश नारायण यांच्यापासून ते जॉर्ज फर्नांडिसांपर्यंत नवे-जुने विरोधी नेते प्रभावी होते. मात्र, देशाला ‘हीरो’ हवा होता. तो काही सापडत नव्हता.
नेहरूंनी नियतीशी करार केल्यानंतर स्वप्नाचा अथक पाठलाग सुरू झाला. स्वप्नं खूप आली, पण वास्तव त्याहून भयंकर होते. त्यातून निराशा जन्माला येत होती. इंग्रज गेले आणि आपले राज्य आले, असे वाटत असतानाच, नव्या काळ्या साहेबांनी आपले रंग दाखवायला सुरूवात केली होती. मंत्रालयांची जागा कंत्राटदारांनी व्यापून टाकली होती. बिल्डर आणि कारखानदारांनी लोकशाही ताब्यात घेतल्यासारखी स्थिती होती. माफिया आणि नेत्यांचे नेक्सस होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे, राजकीय लोकशाही आली होती. प्रत्येकाला एकच मत होते आणि त्या मताचे मूल्यही सारखे होते. पण, सामाजिक विषमतेमुळे लोकशाहीलाच सुरूंग लागत होता.
स्वप्नभंगाचा वाटावा, असा हा काळ होता. लोकांना घाई होती आणि सरकारी वेग फारच कमी होता. लालफितीतल्या भ्रष्ट नोकरशाहीबद्दल संताप सर्वदूर होता. हे चित्र सगळीकडे होते. तिकडे शेजारच्या पाकिस्तानात तर देशाचेच दोन तुकडे होऊ लागले होते. भारतात विरोधक इंदिरा गांधींना संपवू पाहात होते. तिकडे अमेरिकेत निक्सन विरोधकांवर पाळत ठेवत असल्याचे पुरावे मिळत होते. पाकिस्तान दुभंगत होते. व्हिएतनाममध्ये युद्ध सुरू होते. अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात चांगलीच जुंपलेली होती. एकूण सगळीकडे स्फोटक वातावरण होते. लोक आतून धुमसत होते, मात्र काही करू शकत नव्हते.
पण, त्याचे पडसाद उमटत होते. स.का. पाटलांचा पराभव करून जॉर्ज फर्नांडिस निवडून आले होते. शरद पवार प्रथमच विधानसभेत पोहोचत होते. दत्ता सामंतांच्या नेतृत्वाखालील गिरणी कामगारांचा तो भयंकर मोठा संप नंतरचा, पण एकूणच कामगारांचे लढे सुरू झाले होते. त्याचवेळी, ‘लुंगी हटाओ’ म्हणत शिवसेनेने मुंबईत कम्युनिस्टांपुढे आक्रमक आव्हान उभे केले होते.
हा नेपथ्यरचना होती, जेव्हा अमिताभ बच्चन नावाचा अभिनेता पडद्यावर आला.
‘सात हिंदुस्थानी’मधून अमिताभ पहिल्यांदा दिसला, तेव्हा त्याची फार दखल घेतली गेली नसेल. पुढे हाच माणूस अवघी हिंदी सिनेमासृष्टी व्यापून टाकणार आहे, याचा अंदाजही आला नसेल. पण तसे घडले मात्र! १९६९मध्ये कॉंग्रेस पक्ष स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच फुटत होता. इंदिरा गांधी आपले सर्व काही पणाला लावून मांड बसवत होत्या. त्याचवेळी अमिताभ बच्चन नावाचा तारा तळपू लागला होता.
प्रचंड समस्यांच्या गेर्तेत असणारा देश हीरोच्या शोधात होता. नेहरूंनंतर असा हीरो मिळत नव्हता. अशा या काळात अमिताभ बच्चन सुपरस्टार होत होता. ‘जगह बहुत कम है, मुसाफिर ज्यादा’, अशा त्या काळात स्वतःची जागा शोधण्यासाठी लोक थिएटरमध्ये जागा मिळवत होते. ब्लॅकने चाललेल्या या दुनियेला धडा शिकवण्यासाठी ब्लॅकने तिकीट काढून अमिताभ नावाचा चमत्कार पडद्यावर अनुभवत होते. तो जे काही बोलत होता, ती त्यांची भाषा होती. त्याचा संताप अवघ्या माणसांचा उद्रेक होता. जन्माला आल्यानंतरचे देशाचे भाबडेपण संपले होते. सत्तरचे दशक सुरू होताना, दोन वर्षात पंधरा हिट सिनेमे देणारा राजेश खन्ना हा देशाचा स्वप्नाळू, निरागस चेहरा होता. मात्र, १९४७ला जन्माला आलेला देश तरूण होत गेला. आणि, त्याचा भाबडेपणा जाऊन त्याची जागा स्वप्नभंगाने घेतली. संतापाने घेतली. अशावेळी देशाला ‘ॲंग्री यंग मॅन’ मिळाला. व्यवस्थेला जाब विचारणारा ‘हीरो’ मिळाला.
थिएटरच्या बाहेर लोक रांगा लावू लागले. अमिताभ पडद्यावर दिसला की पैसे उधळू लागले. अमिताभसारखीच शर्टाला गाठ मारून पोरं डायलॉगबाजी करू लागली. अमिताभसारखी हेअरस्टाइल करू लागली. ‘बच्चन’ नावाचा शब्द भयंकर मोठा झाला. ‘बोलबच्चन’पासून ते ‘अय, बच्चन’पर्यंत सगळं भावविश्व बच्चननं व्यापून टाकलं.
आम्ही कॉलेजात गेलो, तेव्हा बच्चन उतरणीला लागला होता. तरीही, काका, दादा आणि त्यांच्या मित्रांच्या बच्चनप्रेमामुळे आम्हीही बच्चनचे सिनेमे थिएटरात बघत होतो. एकेक सिनेमा निराश करत होता. ‘आखरी रास्ता’ हाच खरे तर अमिताभचा अखेरचा रस्ता ठरायचा, पण त्यानं तो रस्ता लांबवत नेला. ‘शहेनशहा’, ‘खुदागवाह’ तसे लोकांना आवडलेही. ‘मैं आझाद हूं’, ‘अग्निपथ’मधून अमिताभ दिसलाही. पण ‘गंगा जमना सरस्वती’, ‘तूफान’, ‘जादूगर’, ‘इन्सानियत’ या सिनेमांनी अमिताभच्या चाहत्यांनाही हसावे की रडावे, ते कळत नव्हते!
अमिताभ संपला होता. राजेश खन्ना संपला, तसा अमिताभही संपणार होताच.
तो काळ आणखी वेगळा होता. सगळीकडेच प्रस्थापितांना आव्हान दिले जात होते. १९८४ ला पाशवी बहुमत मिळवणा-या कॉंग्रेसला आता आघाडी करून सत्ता टिकवावी लागत होती. छोटे छोटे प्रादेशिक पक्ष रिंगणात उतरत होते. जागतिकीकरणाने दरवाजे उघडले होते. सोव्हिएत रशिया कोसळत होती. इंटरनेटने जग जोडणे आरंभले होते. घरोघरी छोटा पडदा आलेला होता. रेशनच्या बाहेर उभ्या असणा-या अमिताभभक्तांची मुलं मॉलमध्ये जाऊ लागली होती. माफियांच्या रण्गमहालात ट्रिंग ट्रिंग वाजणा-या अवजड फोनची जागा मोबाइल घेऊ लागला होता. सरकारी कचे-यांपेक्षा चकचकीत कॉर्पोरेट कंपन्या खुणावत होत्या. ‘जीना हो तो आपुन के जैसे ही जीना’, असं म्हणत बॅंक बॅलन्स से रंगीन जगण्याची स्वप्नं ऊर्मिला मातोंडकर दाखवू लागली होती. जुनं संपू लागलं होतं, हे नक्की. पण, नवं नक्की काय येतंय, हे कळत नव्हतं. या गोंधळात अमिताभनं काही वर्षं काढली. तो या काळाचा स्टार नव्हता. त्याचा काळ संपलेला होता. त्याच्या मित्राच्या – राजीव गांधींच्या आग्रहानं तो राजकारणात आला. त्याच्यालेखी हीच ‘सेकंड इनिंग’ असावी. लोकसभा निवडणूक जिंकून, हेमवतीनंदन बहुगुणांना हरवून अमिताभ खासदारही झाला. पण, ते काही त्याला झेपलं नाही. पुन्हा तो पडद्याकडंच वळला. एकविसावं शतक आलं होतं. अमिताभ साठीचा होत होता. त्याच्यासाठी हा निवृत्तीचा काळ होता.
आणि, मग ते घडलं.
शर्टाला गाठ मारलेला अमिताभ एकदम ब्लेझर घालून अवतरला. व्यवस्थित केस. स्टायलिश चष्मा. देखणी-सुसंस्कृत आणि तरीही तरूणाईचा डौल असणारी खेळकर भाषा. अमिताभ घरात आला. मोठा पडदाही ज्याला छोटा पडत असे, असा ‘लार्जर दॅन लाइफ’ अमिताभ छोट्या पडद्यावर आला. ‘कौन बनेगा करोडपती’ सुरू झालं आणि अमिताभनं सगळ्यांना खिळवून ठेवलं. कपड्यांची तमा न बाळगता, वेड्यासारखा धावणारा, मारामारी करणारा, हा ॲक्शन हीरो एका जागी खुर्चीत बसून खेळवू लागला आणि खिळवू लागला. लोक म्हणाले, ही कमाल अमिताभची नाही. करोडची आहे. पण, तसाच खेळ खेळण्याचा प्रयत्न प्लेबॉय सलमानलासून ते ‘ॲक्टर’ अनुपम खेरपर्यंत इतरांनीही करून बघितला. मग कळलं, ही गंमत कोणाची आहे!
मग अमिताभ गप्प बसलाच नाही. ‘अक्स’, ‘कभी खुशी, कभी गम’, ‘बागबान’, ‘ब्लॅक’, ‘चिनीकम’, ‘बंटी और बबली’, ‘पिंक’, ‘परिणिता’, ‘पा’, ‘शमिताभ’, ‘गुलाबो सिताबो’, ‘झुंड’ अशी किती नावं घ्यावीत, अगदी ताज्या ‘गुडबाय’पर्यंत. पण, अमिताभ काही ‘गुडबाय’ म्हणायला तयार नाही. ‘आनंद’, ‘जंजीर’, ‘नमकहराम’, ‘दीवार’, शोले’, कभी कभी’, ‘अभिमान’ ‘अमर अकबर ॲंथनी’, ‘डॉन’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘नसीब’, ‘सिलसिला’, ‘शक्ती’ ‘अंधा कानून’, ‘कुली’, ‘मर्द’, ‘शराबी’ असे एकेक भन्नाट सिनेमे तेव्हा देणारा अमिताभ आजही तेवढ्याच ताकदीने नवनवे सिनेमे घेऊन येतो आहे. आजोबा आणि नातू दोघेही अमिताभचे फॅन आहेत. बाकी, त्यांच्यात गॅप कितीही मोठी असला तरी अमिताभ आवडण्याविषयी त्यांच्यात एकमत आहे.
काय जादू आहे ही?
सत्तरच्या दशकात आम्ही जन्मलो. तेव्हा आमच्या वडिलांच्या पिढीचा हीरो अमिताभ होता. आमच्या कॉलेज कॅंटिनमध्येही अमिताभ होता. आणि, आताच्या ‘जनरेशन झेड’च्या स्टारबक्समध्येही अमिताभ येतो आणि ओटीटीही अमिताभ व्यापून टाकतो.
११ ऑक्टोबरला अमिताभ ८० वर्षांचा होतोय. म्हणजे साधारण माझ्या वडिलांच्या वयाचा अमिताभ. तरी त्याला ‘अहो-जाहो’ करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं. नेहरू गेले. मोदी आले. साधी थिएटर गेली. मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला मर्द गेला आणि ओलासह उबेरही आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या ‘नमक’चा संदर्भ बदलला. तरीही अमिताभ नावाचा ‘सिलसिला’ सुरूच आहे. या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं. तरी, नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर!
आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकुम काम करत असतो. अमिताभचे समकालीन काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत, ते उपकारापुरते उरले. पण, अमिताभ आहेच. कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच ‘चिनीकम’ करावा वाटतो वा ‘पा’मध्ये अमिताभला लहान मूल करावे वाटते. ‘मी भूमिकेसाठी अमिताभची निवड नाही केली, तर अमिताभसाठी भूमिका निवडली’, असं बाल्की सांगतो. चाळीशीतल्या नागराज मंजुळेला, ऐंशी वर्षांच्या अमिताभनं आपल्या सिनेमात काम नाही केलं, तर आपल्याला ‘मोक्ष’ मिळणार नाही, असं वाटतं. शूजित सरकारलाही अमिताभ हवा असतो आणि करण जोहरलाही.
काय आहे हे?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अमिताभ संपला नाही. कारण, तो थांबला नाही. तो साचला नाही. “आमच्यावेळी असं होतं!”, असं माणसं दिवसातला निम्मा वेळ म्हणू लागली की ती संपतात. आपली मुलं-बाळं रांकेला लागली की आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं जे मानतात, ते अकाली म्हातारे होतात! सकाळी वॉक, दुपारी एक पोळी, रात्री ग्लासभर दूध एवढंच ज्यांचं आयुष्य होतं, ते त्या शेड्यूलचे गुलाम होतात. तेही ८० वर्षे फीट जगतात, पण केंव्हाच संपून गेलेले असतात.
अमिताभ संपला नाही. कारण, त्याच्या त्या ‘ॲंगी यंग मॅन’ रूपाप्रमाणेच तो सदैव कार्यरत राहिला. अपघात, आजारपणं, दुखणी त्याच्यामागे कमी नाहीत. कौटुंबिक ताण, पोराबाळांची चिंता नाही, असं नाही. उद्योगधंद्याचं तर पार दिवाळं निघालं. राजकारणात अपयशी ठरला. तरी तो उभा राहिला. धावत राहिला. अमिताभ हा अभिनेता वा माणूस म्हणून थोर आहे, असे माझे मत अजिबात नाही. पण, हे जे आहे ते का आहे? काय आहे? ते नाकारून कसे चालेल? अमिताभचा जादुई आवाज, अमिताभचा करिष्मा, कवीचा मुलगा असलेल्या अमिताभची साहित्याची समज, त्याचा आवाका, त्याची खोली हे कसं नाकारणार? रूढ अर्थानं अमिताभकडं ना चेहरा, ना ॲक्शन हीरोची शरीरसंपदा. पण, अमिताभ हा अमिताभच असतो. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचा चेहरा, त्याची उंची, त्यांचे शरीर असं सुटं सुटं करून चालत नाही. या सगळ्याचा म्हणून जो एकत्रित परिणाम आहे, तो अभूतपूर्व आहे. तो अमिताभ आहे!
परवा लॉ कॉलेज रस्त्यावरच्या बरिस्तात कॉफी पित होतो. पलिकडच्या टेबलवर एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं. तर, दुस-या टेबलवर काही तरूण मुलं-मुली बसली होती. म्हातारा-म्हातारी पेन्शनपासून टेन्शन आणि मुलीच्या लग्नापासून ते फॉरेन टूरपर्यंत बरंच बोलत होते. तिकडं पोरं एक्झामपासून ते आयपीएलपर्यंत ब-याच गप्पा ठोकत होते. दोन्ही टेबलवरून दोन नावं मात्र सारखी ऐकू येत होती – अमिताभ बच्चन आणि शरद पवार. हे म्हातारे कॉलेजात होते, तेव्हा शरद पवार आमदार झाले, तर अमिताभच्या ‘आनंद’नं लक्ष वेधून घेतलं. किती उन्हाळे-पावसाळे पाहिले, पण हे दोघं आहेतच. पवारांचा पक्ष हरेल. अमिताभचा सिनेमा पडेल. पण, ते आहेत.
“सध्या काय करताय?” असं विचारल्यावर पवार परवा एका मुलाखतीत म्हणाले होते- “सेल्फी काढायला शिकतोय!”
हेच ते कारण आहे, ज्यामुळं माणसं ऐंशीव्या वर्षीही कार्यमग्न असतात. बाकी, तुम्हालाही नसतील, अशा व्याधी, अशी आजारपणं, अशा समस्या, असे ताण, असे प्रश्न त्यांच्या वाट्याला आहेत. पण, ‘ॲंग्री यंग मॅन’ला डोक्यावर घेणा-यांची नातवंडं कॉलेजात जाऊ लागली, तरीही हा ‘यंग मॅन’ अमिताभ आहेच. आणि, पवार ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा पवारांविषयी बोलणा-यांना आज त्यांची नातवंडं शरद पवारांविषयी सांगू लागली आहेत!
हे दोन्ही ‘बच्चन’ आजही कार्यरत आहेत, पण ते दोघेच नाहीत. तिकडे ८५ व्या वर्षी आमचे भालचंद्र नेमाडे नव्या प्रकल्पावर अहोरात्र काम करताहेत. त्यांच्या लिहिण्याने नव्या मुलांना आजही झपाटून टाकताहेत. त्याच वयाचे रतन टाटाही पहाटे पाचला उठून दिवस सुरू करताहेत.
शुभ्रा गुप्ता म्हणते ते खरंय.
अमिताभच्या घरावर एकच पाटी आहे –
“Work in Progress!”
अमिताभला ‘हॅपी बड्डे’ म्हणणं म्हणजे अखंड, अविरत, अव्याहत अशा कार्यमग्नतेचं सेलेब्रेशन आहे! अमिताभ एका रात्रीत जन्माला येत नाही. तो अव्याहत कामातून, कार्यमग्नतेतून, अविचल निष्ठेतून ‘अमिताभ’ होत असतो.
हे ‘अमिताभ’पण लक्षात घ्यायला हवं.
(फक्त माहिती म्हणून सांगतो – अमिताभ हे महायान पंथातल्या बुद्धांचे एक नाव आहे.)
अविरत चालणं हा अमिताभचा ‘पासवर्ड’ आहे.
सो, चालत राहा.
मुक्काम आणि मोक्षाच्या आशा करू नका.
पडद्यावर धावणारा अमिताभ आठवा आणि तसेच पॅशनेटली धावत राहा. चालत राहा. अविरत कार्यरत राहा.
तुम्हीही बच्चन व्हाल!
माझी गॅरंटी.
– संजय आवटे
सुप्रसिध्द संपादक
पाहा खास व्हिडिओ