फ्रॅक्चर्ड फ्रीडमचे वादग्रस्त अंतरंग
डॉ. मिलिंद कसबे यांचा खळबळजनक लेख
“फ्रॅक्चर्ड फ्रीडम” हे कोबाड गांधी यांचे पुस्तक त्याच्या मराठी अनुवादाला दिलेल्या पुरस्कार वापसीबद्दल बरेच चर्चेत आले आहे. कोबाड गांधी यांच्या तुरुंगातील भेदक अनुभवांवर आधारीत हे पुस्तक आहे. रोली बुक्सने २०२१ साली हे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित केले त्यानंतर लोकवाङ्मय गृहाने या पुस्तकाची मराठी आवृत्ती प्रकाशित केली. अर्थातच अनघा लेले यांनी या पुस्तकाचा उत्तम मराठी अनुवाद केला आहे. इंग्रजीप्रमाणेच मराठी वाचकांनाही वैचारिक अनुभव हे पुस्तक देते यातच भाषांतरकारांचे कष्ट स्पष्टपणे जाणवणारे आहे.
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे कोबाड गांधी यांच्या दहा वर्षातल्या तुरुंगातल्या अनुभवांनी काठोकाठ भरलेले पुस्तक असले तरी हे केवळ अनुभवकथन नाही तर ते भारतातल्या प्रागतिक चळवळींची चिकित्सा करून त्यांना नवा सैद्धांतिक मार्ग दाखवणारे आहे.
या पुस्तकाची सुरुवात होते ती कोबाड गांधी (Kobad Ghandy) अॅक्टिविस्ट बनण्याच्या पार्श्वभूमीवर. डेहराडूनच्या डॉन स्कूल मध्ये शिकलेला आणि मुंबई विद्यापीठातला रसायनशास्त्राचा हा हुशार पदवीधर १९६८ मध्ये लंडन येथे सी.ए पदवीसाठी आर्टिकलशिप करायला जातो. याच दरम्यान ब्रिटिशांच्या दमणकारी व्यवस्थेने भारताची केलेली लूट आणि मार्क्सवादी विचारसरणींचा सखोल अभ्यास कोबाड गांधी यांनी केला. त्यांच्यातल्या मार्क्सवादी धारणेने त्यांना स्वस्थ बसू दिले नाही हे खरे आहे. ते युकेतल्या वर्णद्वेषातल्या आंदोलनात सहभागी झाले. म्हणून त्यांना इंग्लडमध्ये १९७२ साली पहिली अटक झाली. त्यानंतर ते भारतात आले व माओवादी गटांपैकी एका गटात सामील झाले. त्यांचा सुरुवातीला गांधीवादाकडे ओढा होता परंतु ते आर.पी. दत्त यांच्या ‘इंडिया टुडे’ या पुस्तकाच्या प्रभावाने पूर्णपणे मार्क्सवादी झाले.
‘फ्रेंक्चर्ड फ्रीडम’ हे पुस्तक त्याच्यातील अनुभवांमुळे तर वेगळे आहेच परंतू भारतीय समाजव्यवस्थेतील काही मूलभूत आणि स्फोटक तार्किक मांडणी हे पुस्तक वाचकांसमोर ठेवते.
एका अधिक समतावादी अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्यासाठी समाजात जे परिवर्तन केले पाहिजे त्यासाठी मार्क्सवादी विचारसरणी महत्वाची आहे असे त्यांना वाटते. मार्क्सच्या लेखनात भांडवलशाहीचे उत्क्रांत झालेले वैज्ञानिक विश्लेषण आहे. याशिवाय मार्क्सवादात एका भावी न्यायव्यवस्थेचे चित्र आहे असे कोबाड गांधींचे मत आहे. जातीमुळे आपला देश कायमस्वरूपी विभाजित राहीला आहे. त्यामुळे चळवळींनी जातीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग अधिक महत्वाचा आहे असेही कोबाड गांधी या पुस्तकात म्हणतात.
मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाचा समन्वय हा आजच्या प्रश्नांच्या सोडवणूकीचे उत्तर आहे असेही त्यांनी या पुस्तकात सूचित केले आहे. मार्क्सवादाचे भारतीयीकरण होऊन भारतातल्या अनेक सशक्त अशा अब्राह्मणी परंपरांना मार्क्सवादाशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. एक कार्यकर्ता म्हणून कोबाड गांधी आणि त्यांच्या पत्नी अनुराधा शानबाग या दोघांनीही जो कांतीकारी प्रवास केला आहे तो थक्क करणारा आहे.
कार्ल मार्क्स आणि डॉ. आंबेडकरांचा विचार पोहचवण्यासाठी कोबाड गांधी आणि त्यांच्या पत्नी अनुराधा यांनी ज्या धेर्याने कार्य केले तो क्रांतिकारी विचारप्रवास या पुस्तकाचा महत्वाचा भाग आहे. कोबाड यांचे दलित पँथच्या चळवळीत सक्रिय होणं, नामांतर लढ्यात उतरणं, रिडल्स आंदोलनात रस्त्यावर येणं, पुढे मुंबई नंतर नागपूर कार्यक्षेत्र मानून भांडारा जिल्हयात बिडी कामगार आणि दलितांना संघटित करणं, विदर्भातील शेतकरी संघटनेत सक्रिय होणं आणि जातीअंताच्या लढ्यासाठी सैद्धांतिक मांडणी करणं हे सारं काम महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतातील पुरोगामी चळवळींना आत्मटिकेसह नवी दिशा दाखणारं आहे.
या पुस्तकातली सैद्धांतिक मांडणी केवळ त्यांच्या तुरुंगातील अनुभवांवर थांबत नाही; तर ती सध्याच्या काळात भारतीय समाजव्यवस्थेला समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि संविधानमूलक धोरणांची सर्वाधिक गरज कशी आहे हे सूचवते.
फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकातला सर्वांचे लक्ष वेधणारा भाग म्हणजे कोबाड गांधी यांचे दहा वर्षांचे तुरुंगातले अनुभव आहेत. त्यांचे हे अनुभव सर्वसामान्य माणसाला न दिसणाऱ्या परंतू प्रचंड कुतुहल असलेल्या अनुभवांचे वास्तव कथन करणारे आहेत. खरे तर हे अनुभव केवळ अनुभव नाहीत; तर भारतीय समाजात आज उभ्या ठाकलेल्या अनेक ज्वलंत प्रश्नांचे चिंतन आहे. माओवादी या हिंसक नक्षलवादी चळवळीशी जवळून संबंध असल्याच्या आरोपात त्यांना २००९ साली अटक झाली.
तिहार जेलमध्ये सात वर्ष काढल्यानंतर हैद्राबाद, पतियाला, विशाखापट्टणम, झारखंड आणि सुरत अशा वेगवेगळ्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले. या दहा वर्षांच्या कारावासात त्यांना जेलमधल्या आतल्या जगाचे झालेले विदारक आणि दर्दनाक दर्शन त्यांनी मांडले आहे. जेलमधला कैद्यांचा दिनक्रम, जेल प्रशासन, वेगवेगळ्या कैद्यांचे त्यांच्याशी आलेले संबंध न्यायालयीन प्रक्रिया, कुटुंब, मित्र आणि चवळीतल्या सहकाऱ्यांची त्यांना मिळालेली साथ आणि राजकीय इच्छाशक्ती अशा सर्वच गोष्टींवर कोबाड गांधी ज्या पद्धतीने व्यक्त झालेत ते वाचताना कुणाचेही मन हेलावून जाईल यात शंका नाही.
विशेषत: अफजल गुरुशी त्यांचा आलेला संबंध, त्याच्याशी झालेला वैचारिक संवाद आणि त्याचं कोबाड गांधी यांच्या डोळ्यासमोर फाशी जाणं ही गोष्ट वाचकाला माणूस म्हणून हलवून टाकणारी आहे. अर्थात अफजल गुरूचे समर्थन कुणी करणार नाही परंतु कोबाड गांधी यांना भेटलेल्या अफजल गुरूची दुसरीही एक मनोभूमिका या पुस्तकात दिसते. याशिवाय चंबळ खोऱ्यातले आणि झारखंडमधले अनेक डॉन, नक्षलवादी चळवळीतले आरोपी, राजकीय क्षेत्रातले अनेक आरोपी बडे नेते, उद्योग आणि सिनेमा क्षेत्रातले शिक्षा भोगणारे अनेक माणसं कोबाड गांधींना कशी कशी भेटत गेली. या साज्या घडामोडींचं स्वकथन कोबाड यांनी केलं आहे.
कोबाड गांधी हे नक्षलवादी चळवळीत सहभागी होते हे त्यांनी नाकारले नाही परंतू ते आज बंदी असलेल्या माओवादी गटाशी संबंधीत नव्हते अशी बाजूही त्यांनी या पुस्तकात मांडली आहे.
कोबाड गांधी माओवादी नक्षलवादी चळवळीत प्रमुख नेते म्हणून सक्रिय होते हा त्यांच्यावर आरोप होता. २०१९ साली त्यांची सुटका झाली असली तरी अद्यापही त्यांच्यावर जवळ जवळ दहा केसेस चालू आहेत अशी वस्तुस्थितीही त्यांनी या पुस्तकात सांगितली आहे.
या पुस्तकावर आजपर्यंत समाजघटकांतून अनेक आरोप झाले आहेत. त्यातला पहिला आरोप म्हणजे हे पुस्तक नक्षलवादी चळवळीचे समर्थन करते असा आहे. कोबाड गांधींवरचा दुसरा आरोप म्हणजे या पुस्तकात त्यांनी भारतीय संसदेवर हल्ला करणाऱ्या काश्मिरी अफजल गुरूचे समर्थन केले असून त्याची प्रसंशा केली आहे. या दोन्ही आरोपांबद्दल कोबाड गांधी यांनी त्यांचीही बाजू तांत्रिकपणे या पुस्तकात मांडली आहे.
नक्षलवाद ही संपूर्ण भारतीयांसाठी अत्यंत घातक गोष्ट आहे, त्यामुळे नक्षलवादी कृत्यांचे समर्थन कोणताही विवेकी भारतीय माणूस करणार नाही, परंतू नक्षलवादाच्या नावाखाली सरकारे आपल्या विरोधातला आवाज बंद करतात हे गांधी यांनी मांडले आहे. त्यांच्या मते “भारतात सामान्य माणसाला न्याय मिळणे फारच दूरचे बनले आहे. भारतातली कायदा व्यवस्था अजूनही ब्रिटिशांनी बनवलेली जुनी वासाहतिक व्यवस्थाच आहे.
आजकाल केंद्र आणि राज्यसरकारे आपल्या विरोधातला आवाज चिरडण्यासाठी या व्यवस्थेचा वापर करताना दिसतात. भारतातला राज्यकर्ता उच्चभ्रू वर्ग ब्रिटिशांप्रमाणेच विरोधकांना देशद्रोही मानू लागला आहे. म्हणजे आपण तिथेच आहोत. फक्ते ब्रिटिशांची जागा काळ्यासावळ्या लोकांनी घेतली आहे.” (पृ-१०९) कोबाड गांधी हे नक्षलवादी चळवळीत सहभागी होते हे त्यांनी नाकारले नाही परंतू ते आज बंदी असलेल्या माओवादी गटाशी संबंधीत नव्हते अशी बाजूही त्यांनी या पुस्तकात मांडली आहे.
‘नक्षलवादी’ हे नाव मार्क्सवादी असूनही माओवादी विचारसरणीला माणणाऱ्या गटांसाठीचे लोकप्रिय नाव आहे असे लेखक म्हणतात. या गटांमध्ये अनेक छटा आहेत. विचारसरणींचे जवळ जवळ हे तिसेक गट आहेत. यात जनशक्ती, सीपीआय (माओवादी), सीपीआय (एम-एल), लिबरेशन तसेच देशातील सर्व मार्क्सवादी, कम्युनिस्ट अगदी समाजवादी या सर्वांसाठी ‘डावे’ अशी सर्वसाधारण संज्ञा वापरली जाते.
प्रसारमाध्यमे सीपीआय (माओवादी) या गटासाठी नक्षलवादी हे नाव वापरतात. हा गट मोठा नक्षलवादी गट आहे परंतू सर्वच ‘डावे’ नक्षलवादी आहेत हा समज चुकीचा आहे असेही गांधी यांनी म्हटले आहे. (पृ-११२).
‘फ्रेंक्चर्ड फ्रीडम’ हे पुस्तक त्याच्यातील अनुभवांमुळे तर वेगळे आहेच परंतू भारतीय समाजव्यवस्थेतील काही मूलभूत आणि स्फोटक तार्किक मांडणी हे पुस्तक वाचकांसमोर ठेवते.
जगभरातला मार्क्सवादाचा प्रभाव आणि त्याचा तेवढयाच गतीने झालेला पाडाव, भांडवलशाहीचे आक्रमण आणि त्यातून उद्भवलेले विषमतेचे प्रश्न, दलित आणि डाव्यांच्या चळवळींची वाताहात आणि मुस्लिम, आदिवासी कष्टकरी समाजाच्या सामाजिक न्यायाचे प्रश्न, याशिवाय भारतीय न्यायव्यवस्था, त्यातली दिरंगाई, काश्मिरचा प्रश्न आणि नव-उदारवादी आर्थिक धोरणांनी जनतेवर केलेला प्रहार अशा महत्वाच्या प्रश्नांची चिकित्सक मांडणी या पुस्तकात आहे.
कोबाड गांधी यांनी हे पुस्तक आपल्या किंवा आपल्या विचारसरणीच्या समर्थनार्थ लिहिले असावे असा प्रथमदशर्नी समज होण्याची शक्यता आहे; परंतु या पुस्तकातली सैद्धांतिक मांडणी केवळ त्यांच्या तुरुंगातील अनुभवांवर थांबत नाही; तर ती सध्याच्या काळात भारतीय समाजव्यवस्थेला समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि संविधानमूलक धोरणांची सर्वाधिक गरज कशी आहे हे सूचवते. हे समाजवादी धोरण राबविताना दलित, कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांचे काय चुकले याकडे कोबाड गांधी यांनी लक्ष वेधले आहे.
भारतातल्या कम्युनिस्टांनी जातीच्या प्रश्नांकडे अत्यंत सोईने दुर्लक्ष केले म्हणून जातचिकित्सा करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि वर्गसंघर्ष मिटवणाऱ्या मार्क्सवादाचा समन्वय कसा साधता येईल याकडे गांधी यांनी लक्ष वेधले आहे. याशिवाय सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना काही अपेक्षा कोबाड गांधीनी केल्या आहेत. यात “खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये योग्य संतूलन असले पाहिजे. कामगारांना कायमस्वरूपी नोकऱ्या दिल्या पाहिजेत आणि कंत्राटी व्यवस्था संपुष्टात आणली पाहिजे.
आरोग्यसेवा आणि शिक्षण सर्वांसाठी मोफत असले पाहिजे. शिक्षणात सर्जनशीलता आणून पाठांतर पद्धत काढली पाहिजे. अशा अनेक गोष्टी करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज निश्चितच आहे. परंतु सध्याची भांडवली व्यवस्था मानवी समूहांना, चळवळींना विभक्त करून संपवत आहे. दुदैवाने भारतामध्ये पश्चिमेसारखी औद्योगिक क्रांती झाली नाही, आणि त्यामुळे आपण आधुनिक होऊनही आपल्यातल्या जाती आणि पितृसत्ताक नातेसंबंधाच्या सरंजामी व्यवस्था कायम राहिल्या, यासाठी जातीअंताकडे जाणे महत्वाचे आहे. लोकशाहीचा अर्थ केवळ संरचनात्मक नसतो तर तो व्यक्तिगत पातळीवर व सामाजिक पातळीवर असतो यासाठी प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्यासाठी सजग राहिले पाहिजे” (पृ-२५१) अशी अपेक्षा या पुस्तकांत व्यक्त केली गेली आहे.
“प्राप्त व्यवस्था असमर्थनीय आहे आणि ती अधिकाधिक अन्याय, अधिकाधिक अमानवी, अधिकाधिक विषय, अधिकाधिक विद्वासंक होत चालली आहे. जगभर राजकीय वर्ग अधिकाधिक अशिष्ट, अधम, असंस्कृत आणि फॅसिस्ट प्रवृत्तीचा होत चाललेला आहे. येता काळ लोकांसाठी कल्पनाही करता येणार नाही इतका भयंकर असणार आहे यासाठी नवीन मूल्यव्यवस्थेची बांधणी व्हायला हवी आणि वैश्विक आनंद हे या मूल्यव्यवस्थेचे ध्येय असले पाहिजे” (पृ-२२३) असे हे पुस्तक सूचित करते आहे.
या पुस्तकातील लेखकांच्या मतांबद्दल किंवा त्यांच्या विचारसरणीबद्दल मत-मतांतरे असू शकतात. परंतू या पुस्तकात जे लिहले आहे त्याबद्दल -प्रतिवाद करताना दोन्ही बाजुंनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा घटनात्मक सन्मान करून व्यक्त होणे महत्वाचे आहे.
– डॉ. मिलिंद कसबे
…………………………………
फ्रॅक्चर्ड फ्रीडम : कोबाड गांधी
(तुरुंगातील आठवणी व चिंतन)
मराठी अनुवाद : अनघा लेले
प्रकाशक : लोकवाड्मय गृह, मुंबई
किंमत : ३००
पृष्ठे : २७१
हेही पाहा