पावसाळ्यातील दुधाळ जनावरांचे व्यवस्थापन
जनावरांतील पोटफुगीवर उपाययोजना
थिंक टँक / नाना हालंगडे
पावसाळ्यामध्ये आर्द्रता तसेच जमिनीतील ओलसरपणा वाढायला लागतो हे वातावरण वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणू आणि विषाणूंच्या वाढीकरिता अनुकूल असून, त्यामुळे जनावरांच्या प्रजनन संस्थेमध्ये अनेक विपरीत परिणाम दिसून येतात. उदा. जनावरे वारंवार उलटणे, गाभण न राहणे, माज न दाखवणे.
*१]* पावसाळ्यात गोठ्यामध्ये गोचीड, पिसवा, माश्या, डासांचे प्रमाण वाढायला सुरुवात होते. यांच्या प्रादुर्भावामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. जनावरांच्या पोटामधील जंत वाढायला सुरुवात होते, त्यामुळे दुधाळ जनावरांना, वेळोवेळी जंतनाशक देणे आवश्यक असते.
*२]* आठवड्यातून एकदा संपूर्ण गोठ्यामध्ये जंतुनाशकाची फवारणी करावी. गोठ्याच्या भिंती, टणक पृष्ठभाग, गव्हाणी जाळून घ्याव्यात.
*३]* पावसाळ्यात लसीकरण करावे.
*४]* गोठ्यामध्ये ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्याची गळती असेल त्याची त्वरित दुरुस्ती करावी.
*५]* गोठ्यामधील दुर्गंधीयुक्त वातावरण असू नये याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात गोठ्यातील पृष्ठभाग ओला असेल तर जनावर घसरून पडण्याची शक्यता असते. याकरिता गोठ्यातील जमीन कोरडी ठेवावी
*६]* जनावरांच्या खुरांची नियमित तपासणी करावी.
रोहयोतून फळबाग लागवडीचा मार्ग मोकळा
*आहार व्यवस्थापन*
*१]* चारा किंवा खाद्य साठवणूक स्वच्छ, हवेशीर ठिकाणी असावी. चारा साठवणूक असलेले ठिकाण ओले असेल तर पावसाळ्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव दिसतो.
*२]* बुरशीयुक्त खाद्य जनावरास दिल्यास आजार होतात, दुग्ध उत्पादन कमी होते, विषबाधा होते गाभण जनावरांमध्ये गर्भपात होऊ शकतो.
*३]* हिरवा व वाळलेला चाऱ्याचे योग्य संतुलन करावे. जनावरांना समतोल आहार देणे आवश्यक आहे. उदा. ५०० किलो वजनाच्या दुभत्या गाई, म्हशींसाठी २० ते २२ किलो हिरवा चारा, ५ ते ६ किलो कोरडा चारा, ६ ते ७ किलो पशुखाद्य (दुधाच्या प्रमाणात ) द्यावे.
महाराष्ट्रात करचुकवेगिरी करणाऱ्या बड्या उद्योगांवर मोठी कारवाई
*४]* पावसाळ्यात दुधाळ जनावरांमध्ये कासदाह दिसतो. हे टाळण्यासाठी दूध काढण्या अगोदर आणि नंतर, जंतुनाशक द्रावणांनी सड, कास स्वच्छ करावी.
*५]* गाभण जनावरांना जास्त प्रमाणात हिरवा चारा दिल्याने मायांग बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते. यासाठी समतोल आहार देणे आवश्यक आहे.
*६]* दुधाळ गाई, म्हशींना दूध उत्पादनाचा ताण असतो. सोबतच वातावरणाचा ताण पडला, तर आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन प्रजनन प्रक्रिया आणि दूध उत्पादनावर वाईट परिणाम दिसून येतो.
*७]* पावसाळ्यातील प्रजनन संस्थेविषयी आजार टाळण्यासाठी दुधाळ गाई, म्हशींची योग्य काळजी, गोठा स्वच्छता, निर्जंतुकीकरण, स्वच्छ पाणी, समतोल आहार देणे हे अतिशय आवश्यक आहे.
*जनावरांतील पोटफुगीवर उपाययोजना*
कोवळे हिरवे गवत जास्त प्रमाणात खाल्ल्याने जनावरांना पोटफुगीचा त्रास सुरू होतो. जनावरांचे डाव्या बाजूचे पोट फुगते. पोटातील वायूचे प्रमाण वाढल्याने पोटाची डावी बाजू वर येते. यामध्ये रोमन्थिकामध्ये जास्त प्रमाणात वायू साठल्याने पोट फुगते, जनावरे अस्वस्थ होतात.
सीना व भीमा नदीकाठी पूरस्थिती!
*जनावरांमधील पोटफुगीचे प्रकार*
*१]* प्राथमिक अवस्थेतील पोटफुगी आहारातील बदलामुळे होत असते आहारात सुक्या चाऱ्याचे कमी प्रमाण आहारातील अचानक बदल यांचा समावेश होतो. द्वितीय अवस्थेतील पोटफुगी वायू शरीराबाहेर न टाकल्यामुळे होत असतो. जनावरांच्या रोमन्थिकेत चारा आंबविण्याच्या क्रियेमुळे सतत वायू तयार होतो. हा वायू नैसर्गिक क्रियेने बाहेर पडत असतो, परंतु जर रोमन्थिकेत फेस तयार झाला, तर त्यामध्ये वायू अडकल्यामुळे तो बाहेर पडू शकत नाही किंवा कधी कधी दोषयुक्त आहारामुळे वायू तयार होण्याचे प्रमाण वाढते.
*२]* अन्ननलिकेत काही अन्नघटक फसून राहिल्याने, खाद्याचे कमी प्रमाणात सेवन केल्याने दिसून येते. पोटात तयार झालेला वायू बाहेर न पडल्यास, तो पोटातच अधिक काळ साचून राहिल्याने, जनावरांचे डावीकडील पोट फुगलेले दिसून येते. त्या ठिकाणी हात मारल्यास विशिष्ट प्रकारचा आवाज घुमतो. पोटदुखी होते, जनावर वारंवार लघवी, शेण टाकते. श्वास घेण्यास त्रास होतो. परिणामी जनावर तोंड उघडून मान वर करून श्वास घेण्यास सुरुवात करते. कोठीपोटाची हालचाल कमी होते. जनावर बैचेन होते. चारा खाणे, पाणी पिणे बंद होते. यामुळे वेदनाही होतात.
*लक्षणे*
जनावरांचे पोट डाव्या बाजूकडून फुगते. पोट फुगलेली जनावरे अस्वस्थ दिसतात. ऊठबस करतात. रवंथ करणे बंद करतात. पोटावर लाथा झाडतात किंवा जमिनीवर लोळतात. तोंडावाटे श्वास घेतात जीभ बाहेर काढतात. जनावरांची लाळ गळत असते. पोटावर डावीकडे ठोकल्यास आवाज येतो.
*उपाययोजना*
*१]* आहारात जास्त प्रथिने असलेल्या चाऱ्याचा समावेश कमी करावा. भरडलेल्या धान्याचा आहारातील समावेश कमी करावा.
*२]* आहारात तंतुमय पदार्थांचा वापर योग्य प्रमाणात करावा. असे केल्याने जनावरांना चयापचय क्रियेत मदत होते. उपाय म्हणून पोटाच्या डाव्या बाजूला मसाज करावा.
*३]* पोटफुगी दिसून आल्यावर जनावरास उंच जागेवर उभे करावे. जनावरांना वायू बाहेर पडण्यास मदत होईल अशा क्रिया कराव्यात. पोटगीचे प्रमाण जास्त असल्यास पशुवैद्याकडून उपचार करावेत.