
कोणताही समाज सातत्याने उक्रांत होत जातो. भारतीय समाजही याला अपवाद असण्याचे कारण नाही. भारतीय समाजाने अनेक स्थित्यंतरातून जात प्रत्येक वेळी अधिक उन्नत, विकसित होण्यास प्राधान्य दिले आहे. माहिती तंत्रज्ञानाची साधने सर्वांना उपलब्ध झाल्यानंतर बदलाची गती आणखी वाढली. हा बदल आता मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. तंत्रज्ञान मानवी जीवनात इतके खोलवर रूजले आहे की, त्याने मानवी मेंदूचा ताबा कधी घेतला हे लक्षातच आले नाही. मानवी जगणं अधिक सुसह्य करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणं ही वेगळी गोष्ट आहे. पण तंत्रज्ञान हेच जगणं आहे, हा अलिकडच्या काळात पैदा झालेला भ्रम काळजी वाढवणारा आहे.
डिजिटल इंडियाला डिजिटल साक्षरतेची गरज आहे. त्याहीपुढे जात डिजिटल शहापणपाची नितांत आवश्यकता आहे. साक्षरता आणि शहाणपणाकडे दुर्लक्ष करून आपण ‘नया भारत’ तयार करणार असू तर तो केवळ आभासी भारत असेल. किंबहुना तो उन्मादी भारतही असेल, याची जाणीव बाळगायला हवी.
भारतीय समाज बहुभाषिक, बहुसांस्कृतिक असला तरी सुरूवातीपासून तो एकजिनसी आहे. स्थानिक आणि प्रादेशिक अस्मिता जपत असताना देश म्हणून तो व्यापक विचारही गांभीर्याने करतो, हे आपण कित्येकवेळा पाहिले आहे. भारताची स्वतःची म्हणून एक संस्कृती आहे. देशातील विविध माध्यमांनी या संस्कृतीचे वहन नेटाने केले. संस्कृतीही उत्क्रांत होणारी बाब आहे. परिस्थितीनुरूप सांस्कृतिक मूल्ये बदलत जातात. या बदलाची नोंद घेऊन त्यानुसार वर्तन व्यवहारात आणि मूल्यांमध्ये परिवर्तनशीलता जोपासणे आवश्यक आहे. ग्रंथाधारित मूल्यांपेक्षा प्रत्यक्ष मानवी जगण्याशी भिडणार्या मूल्यांची मौलिकता आपण जाणली पाहिजे. परंपरेतून आलेली प्रत्येक मूल्ये कवटाळून बसण्यात काही अर्थ नाही. त्या मूल्यांची पुनर्रचना होणे काळाची गरज असते आणि आपणही त्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे.
डिजिटल विश्व काल्पनिक आणि आभासी आहे. हे विश्व ठरवून तयार केले गेले आहे. माहिती तंत्रज्ञानाने या विश्वाचा पसारा वाढवला. यातून नवा माहिती समाज तयार झाला. ज्यांच्याकडे माहिती आहे, ते बलाढ्य झाले. माहिती उपलब्ध नसणारा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला फेकला गेला. माहितीच्या अभावाने त्याच्या क्षमता, कौशल्ये आणि पर्यायाने निर्णय प्रक्रिया अविकसित राहिली.
संस्कृती संवर्धनात आणि तिच्या स्थित्यंतरात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा असतो. भारतीय संस्कृतीच्या विस्तारात आणि उत्कर्षात माध्यमांची भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. ज्या समाजात माध्यमे प्रभावी असतात, त्या समाजात माध्यमांनी तयार केलेली आणखी एक संस्कृती असते. ही माध्यम संस्कृती मूळ संस्कृतीचा एक भाग होऊन जाते किंवा तिला समांतर पद्धतीने चाललेली असते. विविध माध्यमांतून आलेला आशय स्वीकारून तशा पद्धतीने वर्तन आणि व्यवहार करणारा खूप मोठा समुदाय या संस्कृतीत असतो. माध्यमांतील आशय सत्य आहे, असे मानून अनेक लोक आपल्या जगण्यात माध्यमांतील आशयानुसार बदल करून घेत असतात. माध्यमांतून येणारी मूल्ये, पेहराव, जीवनशैली आदीचा आपल्या जगण्यात ते वापर करू लागतात. कळत-नकळत माध्यमांनी त्यांची निर्णय प्रक्रिया काबीज केलेली असते. माध्यमांतून येणारा संदेश सातत्याने आपल्यावर आदळून आपण कधी माध्यमांतील आशयाची एकरूप होऊन जातो, हे लक्षातही येत नाही. असा खूप मोठा समुदाय आपल्या अवतीभोवती असतो. हा समुदाय मूळ संस्कृतीमध्ये नवी संस्कृती उदयास आणतो, जी माध्यमांतून तयार झालेली असते.
अलिकडे माध्यमांसोबतच डिजिटल तंत्रज्ञान खूप निर्णायक ठरू पाहत आहे. संपूर्ण मानवी अवकाश डिजिटल साधनांनी व्यापला आहे. सोशल मीडिया हा अशा साधनांचा एक भाग आहे. तथापि, डिजिटल साधने आणि तंत्र मानवाच्या जगण्यात खूप खोलवर रूतले आहे, हे नाकारून चालणार नाही. इंटरनेटच्या विस्तारानंतरचे जग कमालीचे विसविशीत झाले आहे. घरात, कार्यालयात, मार्केटमध्ये किंवा आपण कोठेही असो, आपण तंत्रज्ञानाच्या दुनियेतच वावरत असतो. आपली प्रत्येक गोष्ट डिजिटल साधनांनी नियंत्रित केली जात आहे. यातून एक नवीनच संस्कृती तयार झाली आहे. तिला डिजिटल कल्चर म्हटले जाते. आपली मूळ संस्कृती आहेच; तिची मूल्ये, परंपरा आणि जीवनपद्धती आपल्या सोबत आहेच. पण त्याच्या पलिकडे जात माध्यमांनी तयार केलेली एक संस्कृती आहे. यात भर म्हणून डिजिटल साधनांनी तयार केलेले एक स्वतंत्र डिजिटल कल्चरही आपल्यात अस्तित्त्वात आहे. आपल्या नकळत हे कल्चर काम करत आहे.
केंट विद्यापीठातील व्हिन्सेंट मिलर यांनी ‘अन्डरस्टॅन्डिंग डिजिटल कल्चर’ या पुस्तकात मानवाच्या दैनंदिन जीवनात डिजिटल कल्चर कसे निर्णायक ठरते, याविषयी तपशीलवार भाष्य केले आहे. मोबाईल तंत्रज्ञान, अल्गोरिदम, बिग डेटा, कृत्रिम बुद्धीमत्ता, गेमिंग अशा अनेक पातळ्यांवर मानवी मेंदूवर प्रभाव टाकला जात आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक प्रभावापासून हे कल्चर अजिबात दूर नाही. किंबहुना भारतासारख्या देशात असे प्रभाव टाकणे अजून सोपे आहे. भारतीय राजकीय प्रक्रिया डिजिटल कल्चरने वाईट पद्धतीने प्रभावित केली आहे. अलिकडे ती विकृतीकडे जाताना दिसत आहे. जगभरातील राजकीय प्रक्रियाही याच दिशेने वाटचाल करीत आहेत. डिजिटल साधनांचा अतिरेकी वापर आणि त्यातील संदेशाचा सातत्याने होत असलेला मारा यातून मानवी मेंदू बधीर करण्याचे काम सुरू आहे. दुःखाची बाब म्हणजे, या कुकृतीला सगळीकडे यश येताना दिसत आहे.
डिजिटल साधनांची गरज लक्षात घेऊन 2018 मध्ये भारताच्या डिजिटल संज्ञापन धोरणात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला होता. या सुविधा गेल्या पाच वर्षांत वाढल्या आहेत. मात्र, या सुविधांचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण देणे आवश्यक होते. आजही अशा प्रशिक्षणाची खूप गरज आहे. इंटरनेट स्वस्त झाले, गावागावात पोहोचले परंतु त्याच्या वापराविषयीची समज निर्माण झाली का, हा खरा प्रश्न आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी मोबाईल दिला जातो आणि नंतर हे मूल मोबाईलमधील आशय हेच खरे जग असल्यावर शिक्कामोर्तब करतेे. डिजिटल विश्व काल्पनिक आणि आभासी आहे. हे विश्व ठरवून तयार केले गेले आहे. माहिती तंत्रज्ञानाने या विश्वाचा पसारा वाढवला. यातून नवा माहिती समाज तयार झाला. ज्यांच्याकडे माहिती आहे, ते बलाढ्य झाले. माहिती उपलब्ध नसणारा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला फेकला गेला. माहितीच्या अभावाने त्याच्या क्षमता, कौशल्ये आणि पर्यायाने निर्णय प्रक्रिया अविकसित राहिली. उलट माहिती असलेल्या वर्गाने सर्व प्रकारचे लाभ उपटले. हाच लाभार्थी वर्ग डिजिटल संस्कृतीमध्ये प्रभावी आहे. माहिती तंत्रज्ञानावर कब्जा असणार्या या वर्गाने डिजिटल विश्वातील संपूर्ण अवकाश व्यापून टाकला आहे.
डिजिटल साधने हातात असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या लोकशाही देशातील सरकारे हलवू पाहत आहेत. वस्तुस्थितीपासून दूर गेलेले आभासी जग निर्माण करण्यात या कंपन्यांना यश आले आहे. भारतासारख्या देशात ही स्थिती काळजी वाढविणारी ठरत आहे. डिजिटल माध्यमांतून आलेल्या आशयावर लोकांची मते तयार होत आहेत. ऐकीव माहिती आणि बनावट आशयावर विसंबून राहून लोक निर्णय घेऊ लागले आहेत. राष्ट्रपुरूष, राष्ट्रीय प्रतिके आणि अस्मितांचे मुद्यावरही डिजिटल माध्यमांतील निराधार माहितीवर आधारित वक्तव्ये होत आहेत. याचा अर्थ आपण तंत्रज्ञान आणि तंत्रस्नेही समाज निर्माण केला पण या समाजाची आकलनशक्ती वाढविण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठीही एक प्रकारची सदृढ मानसिक क्षमता विकसित व्हावी लागते. ती न करता आपण केवळ डिजिटल इंडियाचा नारा दिला. डिजिटल इंडियाला डिजिटल साक्षरतेची गरज आहे. त्याहीपुढे जात डिजिटल शहापणपाची नितांत आवश्यकता आहे. साक्षरता आणि शहाणपणाकडे दुर्लक्ष करून आपण ‘नया भारत’ तयार करणार असू तर तो केवळ आभासी भारत असेल. किंबहुना तो उन्मादी भारतही असेल, याची जाणीव बाळगायला हवी.
– डॉ. शिवाजी जाधव
(लेखक हे कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत. त्यांना पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांची माध्यम विषयक असंख्य पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.)
डॉ. शिवाजी जाधव यांचे गाजलेले लेख
हेही वाचा