जवळ्याचा कंटेनमेंट झोनमधील समावेश चुकीचा
गावात केवळ ३ अॅक्टिव्ह रुग्ण, वाड्यावस्त्यांवरील रुग्णांमुळे आकडा फुगला
जवळा (विशेष प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यात दहापेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या १८ गावांमध्ये कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) जाहीर करण्यात आला अाहे. यामध्ये जवळा गावाचाही समावेश आहे. जवळा गावात सध्या केवळ ३ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. मात्र जवळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या वाड्यावस्त्यांवरील रुग्णांमुळे हा आकडा फुगला आहे. तांत्रिकदृष्ट्या ही आकडेवारी गृहित धरून घोषित केलेली कंटेनमेंट झोनची प्रक्रिया चुकीची असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थ, व्यापारी वर्गातून उमटत आहेत.
• जवळ्याचा समावेश चुकीचा?
ज्या गावांत १० पेक्षा जास्त अॅक्टिव्ह रूग्ण आहेत अशा घोषित १८ गावांमध्ये जवळा गावाचा झालेला समावेश तांत्रिकदृष्ट्या चुकीचा असल्याचे दिसत आहे. जवळा गावात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न अनेक वाड्यावस्त्या आहे. भोपसेवाडी, तरंगेवाडी, आगलावेवाडी, बुरंगेवाडी या जवळा गावालगतच्या वाड्यावस्त्यांसह शेजारच्या गावातील रूग्ण तपासणीसाठी येत असतात. बाहेरून येणा-या रुग्णांची संख्या जवळा गावातील रूग्णांपेक्षा जास्त असते. तपासणीत पॉझिटिव्ह आढललेल्या इतर गावांतील रुग्णांची जवळा गावातील रूग्ण अशी नोंद होत असल्याने ही गफलत होत आहे. परगावच्या रूग्णांना त्या त्या गावातील रुग्ण गृहित धरल्यास मूळ जवळा गावातील रूग्णसंख्या दहाच्या आतच राहते. असे असताना केवळ आकडेवारीच्या गफलतीमुळे जवळा गाव कंटेनमेंट झोनमध्ये आले आहे.
• कंटेनमेंट झोन हटविण्याची मागणी
वस्तुस्थिती तशी नसतानाही जवळा गावात कंटेनमेंट झोन घोषित केल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प आहेत. मागील दीड वर्षांपासून कोरोना काळात सततच्या लॉकडाऊनमुळे गावातील सर्व व्यवसाय, धंदे आर्थिक अडचणीत आहेत. बाधितांची संख्या कमी होत असल्याने आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत असताना केवळ तांत्रिक गफलतीमुळे जवळा गावात कंटेनमेंट झोन घोषित केल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाने हा चुकीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांसह व्यापारी वर्गातून होत आहे.
• कारवाईसाठी पथक
या कंटेनमेंट झोन गावांमध्ये कारवाईसाठी विविध विभागातील एकत्रित अधिकारी कर्मचाऱ्यांची पथकेही पाठविण्यात येत आहेत. जवळ्यातही अशी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस पाटील अतुल गयाळी यांनी दिली.
• ग्रामस्तरीय कृती समिती कारवाईसाठी सज्ज
जवळा गावात अत्यावश्यक सेवा वगळता इतर अास्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. गावामध्ये कोरोना चाचण्या वाढविण्यात येत आहेत. गावातील ग्रामस्तरारीय कृती समितीने केलेल्या बंदच्या आदेशाचे पालन कोणी करत नसेल तर त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची सूचना ग्रामस्तरीय कृती समितीला दिल्या आहेत.
• कंटेनमेंट झोन जाहीर केलेली गावे
कडलास, महूद, शिरभावी, अकोला, सोनंद, चोपडी, सावे, डोंगरगाव, जवळा, धायटी, एखतपुर, कमलापूर, खवासपूर, संगेवाडी, शिवणे, हलदहिवडी, मेडशिंगी आणि पाचेगाव बुद्रुक.
• तालुक्यात शुक्रवारी 41 रूग्ण
शुक्रवार, दि . 27 ऑगस्ट 2021 रोजी सांगोला तालुक्यात एकूण 41 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. 2258 रिपोर्ट निगेटिव्ह आले. गावनिहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे : सांगोला – 12, चिंचोली -2, बुटलेवाडी -1, शिरभावी – 2, गळवेवाडी -1, मेडशिंगी – 3, य . मंगेवाडी-, घेरडी -1, महुद -3, ढाळेवाडी -1, चिकमहुद -1, खिलारवाडी -1, गायगव्हान -1, कांडेवाडी -1, सावे -1, गौडवाडी -1, धायटी -4, शिवणे -1, संगेवाडी -1, हंगिरगे व कमलापूर – 1.
हेही वाचा :
जवळ्यासह १८ गावांत कंटेनमेंट झोन
“चिंच विसावा” कृषी पर्यटन केंद्र बनलंय पर्यटकांचं आकर्षण
कोव्हिशिल्डचा तिसरा बूस्टर डोसही आवश्यकच : डॉ. सायरस पुनावाला
सांगोल्यात ५० वर्षे होती शेकापची त्सुनामी, ‘मोदी लाट’ही ठरली निष्प्रभ