“चिंच विसावा” कृषी पर्यटन केंद्र बनलंय पर्यटकांचं आकर्षण
ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव देणारा रांगडा प्रकल्प
- “चिंच विसावा”तील चिंचेच्या झाडांचा साजरा झाला २१ वा वाढदिवस
- प्रल्हाद बोराडे यांच्या अॅग्रो टुरिझमला मिळतेय पर्यटकांची साथ
जत (विशेष प्रतिनिधी) : जत तालुका म्हटलं की भयंकर दुष्काळ हे कोणास नाही आठवलं तर नवलंच. एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणा-या युवकाने पाण्याअभावी शेती करायची म्हणून याच तालुक्यातील शेगावजवळ 20 वर्षांपूर्वी चिंचेची 50 झाडे लावली. हा प्रयोग आता “चिंच विसावा” या कृषी पर्यटन केंद्रात रुपांतरीत झालाय. दुष्काळी भागापुढे या कृषी पर्यटन केंद्रातून नवा आदर्श निर्माण केलेल्या तरुणाचे नाव आहे प्रल्हाद बोराडे. त्यांची सुविद्य पत्नी सौ. उज्ज्वला बोराडेंचीही त्यांना याकामी मोठी साथ मिळतेय.
लोकांनी केली थट्टा
या प्रकल्पाच्या प्रारंभाबाबत बोलताना प्रल्हाद बोराडे म्हणतात, ‘चिंचेची शेती हा एक आगळा-वेगळा प्रयोग होता. बरेच लोक हसत होते. परंतु मला निसर्गाची आवड होती आणि खात्री होती की चिंच चांगले पीक देऊ शकते तेही कमी पाण्यात, कमी कष्ट आणि कमी खर्चात. चिंचेमुळे वातावरणात आमूलाग्र बदल होतो. एक झाड 5 एअर कंडिशनर या झाडांच्या रुपाने थंडावा देते. असे 250 AC बसवल्याचा आनंद मला मिळत होता. 20 वर्षानंतर हे आता एक सुंदर निसर्गरम्य ठिकाण उदयास आले आणि ‘चिंच विसावा’चा जन्म झाला.
ग्रामीण जीवनशैलीची ओळख
प्रकल्पाच्या थिमबद्दल बोलताना प्रल्हाद बोराडे म्हणाले की, ‘माझी पत्नी सौ.उज्वला बोराडे व माझे कुटुंब यांच्या संकल्पनेतून हा अभिनव प्रकल्प येथे साकारलाय. शहरी तसेच ग्रामीण भागातील पिढीला आपल्या वाडवडिलांच्या समृध्द ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून देता येईल, या पद्धतीने या केंद्राची रचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्थानिक रोजगार निर्मिती, स्थानिक शेतकऱ्यांच्या कृषी मालाला मार्केट व योग्य दर उपलब्ध होण्यासाठी या कृषी पर्यटन क्षेत्राचा उपयोग होईल. जत सारख्या दुष्काळी भागामध्ये तरुण शेतकरी वर्गास नवी दिशा, नवी शेतीची पद्धत कळेल, हा अठ्ठाहास साध्य होतोय.
धकाधकीच्या जीवनातील विरंगुळा
धकाधकीच्या जीवनात हरवत चाललेले सुख-समाधान शोधण्यासाठी, दुनियादारीच्या तणावामधून कोणतेही मेडिसिन न घेता मूड फ्रेश करण्यासाठी एक वेळ नक्की भेट द्यावी, असं डेस्टिनेशन असल्याचं बोराडे खात्रीनं सांगतात.
चिंच झाडांना नद्यांची नावे
‘चिंच विसावा’ प्रकल्पात वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे व फुलझाडे, मसाल्याची विविध झाडे, फळभाज्या आहेत. चिंच झाडांना देशातील विविध नद्यांची नावे दिलीत. झाडांना विविध प्रकारचे झोपाळे बांधले आहेत, आराम करण्यासाठी बाजली आहेत. बसण्यासाठी खुर्ची नाही तर लाकडी ठोकळे आहेत. मुलांना खेळण्यास पार्क आहे. येथे जुने पारंपरिक खेळ म्हणजे – विटी-दांडू, गोट्या, नाग्या, भोवरा, लगोर, लेझीम, टिपऱ्या, मुलींसाठी गजगे, जिभल्या इ खेळाचा अनुभव घेता येईल. वाचक प्रेमींसाठी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण पद्धतीचे चुलीवरचे जेवण म्हणजे अविस्मरणीय आनंद मिळायलाच हवा. भरपूर झाडे असल्यामुळे तसेच जोडीला वेगवेगळे पक्षी आहेत, त्याना पाहण्यात व त्यांचे फोटो काढण्यात खरी गंमत येणार आहे.
निवासाची नैसर्गिक सोय
राहण्यासाठी शीतल निवास, रवी निवास व सावली निवास अशी 3 लाकडी घरे बांधली आहेत. ज्याला आपण झोपड्या म्हणतो जिथे नैसर्गिक AC लावल्याचा अनुभव येतो.
“कुटी १९००” हे प्रदर्शन रूपी घर आहे. येथे आपणास जातं, चूल, उकळ, मडक्याची उतरंड, शिंके, दिवा व ठाणवी, फनेरपेठी- आरसा व हळदी कुंकु आदी बघायला मिळेल. हे सर्व पाहून आपल्या आजी- आजोबांचे जीवन हे किती सुंदर होते याची कल्पना येईल आणि हेवा वाटेल आणि म्हणाल, हेचि देगा देवा!
पारंपरिक वेशभूषेची सोय
या सर्व गोष्टी आणि निसर्ग म्हणजे फोटो काढण्याती जणू पर्वणीच. त्यातच भर म्हणजे ‘चिंच विसावा’कडून पारंपरिक वेशभूषेची सोय केली जाते. जेणेकरून आपण शेतकरी, आजी आजोबा यांच्या वेशात दिसू शकाल, असे बोराडे सांगतात.
चार एकर परिसरात 105 चिंचेची व 675 आंब्याची झाडे
“चिंच विसावा”बाबत अधिक माहिती देताना प्रल्हाद बोराडे म्हणाले की, चिंच विसावा कृषी पर्यटन केंद्र हे 4 एकर परिसरामध्ये वसले आहे. येथे 105 चिंचेची झाडे व 675 आंब्याची झाडे आहेत. या व्यतिरिक्त लाल जट्रोफा, मधुमालती, बकुळी, जास्वंद, अंजीर, रातराणी, पारिजातक, मोगरा, देशी गुलाब, चिक्कू, मोसंबी, जाई, जुई, ख्रिसमस,पेरू, मोरपंखी, गवती चहा, लिंबू, निशिगंधा, कडीपत्ता, वॉटर अॅपल, देशी पेरू, सोनचाफा, कवठी चाफा, पुडीका चाफा, संत्री, लिची, स्वस्तिक, दालचिनी, लवंग, मिरी, इलायची, बनारसी पान, आंबा, नारळ, केळी, आवळा, वॉटर लिली, पुदिना, आळु, शेवगा इत्यादी फळे, फुले व भाज्या बघण्यास व अभ्यासास मिळतील. विहीर, पाईप लाईन, ठिबक सिंचन व शेतीची इतर अवजारे, साधने बघायला मिळतील, असेही बोराडे म्हणाले.
कुटुंब मित्र-मंडळींसह नक्की या
जीवनाचा खरा आनंद अशा या निसर्गरम्य वातावरणात मिळेल. या केंद्रास परत भेट द्यावी व आपल्या इतर मित्र, नातेवाईक यांना आवर्जून सांगावे असे वाटेल. ‘चिंच विसावा’ हा जणू दुष्काळी भागातील ‘कोकण दर्शन’ आहे. येथे आपण डे विझिट, डे नाईट आणि नाईट स्टे असे वेगवेगळे पॅकेजेस निवडू शकता. याव्यतिरिक्त वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, डोहाळे जेवण, छोटे लग्न इत्यादी कार्यक्रमाचे नियोजन करू शकता. वेगवेगळी फोटोग्राफी जसे प्री वेडिंग, वेब सीरिअल, मॉडेलिंगसाठी सुद्धा ‘चिंच विसावा’ हे ठिकाण मस्तच असेल, असा आशावाद प्रल्हाद बोराडे हे व्यक्त करतात.
“चिंच विसावा” पत्ता
उज्वला बोराडे /प्रल्हाद बोराडे
चिंच विसावा – कृषी पर्यटन केंद्र
मु. पो. शेगांव, तालुका जत जिल्हा सांगली.416404 महाराष्ट्र, इंडिया
संपर्क : +91 88883 10882, +919657078882
हेही वाचा
कोव्हिशिल्डचा तिसरा बूस्टर डोसही आवश्यकच : डॉ. सायरस पुनावाला
इंचभर जमिनीसाठी वाद होतात, डॉ. नाना हालंगडेंनी मात्र २ एकर समर्पित केली
कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प रोखेल कोल्हापूर, सांगलीचा महापूर!
सांगोल्यात ५० वर्षे होती शेकापची त्सुनामी, ‘मोदी लाट’ही ठरली निष्प्रभ