थिंक टँक / नाना हालंगडे
चातुर्मासातील गणेशोत्सवानंतर महत्त्वाचा उत्सव म्हणजे नवरात्रोत्सव. नवरात्रात दुर्गा देवीच्या विविध स्वरुपांचे पूजन केले जाते. देवीचे पूजन, नामस्मरण, भजन उपासना करण्यासाठी नवरात्राचा काळ सर्वोत्तम मानला जातो. वास्तविक पाहता संपूर्ण मराठी वर्षात चार नवरात्र साजरी केली जातात. पैकी दोन नवरात्र गुप्त पद्धतीने केली जातात. मात्र, दोन मोठ्या प्रमाणावर साजरी केली जातात, त्यापैकी एक अत्याधिक महत्त्व असलेले नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र. यंदा २०२२ रोजी २६ सप्टेंबर ते ०४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र साजरे केले जाणार आहे.
यंदाच्या नवरात्राचे विशेष, शुभ मुहूर्त, शुभ तिथी आणि शुभ योग कोणते, याबाबत जाणून घेऊया…
यावर्षी शारदीय नवरात्र २६ सप्टेंबरपासून सुरू होत असून, ०५ ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याने नवरात्रीची सांगता होईल. ०४ ऑक्टोबर रोजी नवमी पूजन केले जाणार आहे. यंदा अतिशय विशेष आणि शुभ मानल्या जाणाऱ्या नवरात्रीमध्ये असा योगायोग घडला आहे, तो म्हणजे नवरात्र संपूर्ण ९ दिवस साजरे केले जाणार आहे. नवरात्रात एकही तिथी क्षय होणार नाही. जेव्हा नवरात्र ९ दिवस साजरे केले जाते, ते कल्याणकारी, शुभ ठरणारे असते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. याशिवाय नवरात्रीच्या ९ दिवसांत अनेक शुभ योगही तयार होत आहेत.
*घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त
नवरात्राच्या पहिल्या दिवशी कार्याच्या संपन्नतेसाठी प्रार्थना करून घटस्थापना करण्याची प्राचीन परंपरा आणि पद्धत आहे. देशातील कोट्यवधी घरांमध्ये घटस्थापना करण्याची पद्धत रुढ आहे. तर काही ठिकाणी मोठ्या मंडळांमध्येही दुर्गादेवीसह घटस्थापना केली जाते. घरातील सुख, शांतता समृद्ध होण्यासाठी नवरात्रातील संपूर्ण दिवस घटस्थापना करून दुर्गा देवीचे पूजन केले जाते.
घटस्थापना: सोमवार, २६ सप्टेंबर २०२२
प्रतिपदा आरंभ: पहाटे ०३ वाजून २३ मिनिटे
राहुकाळ: सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत.
अमृत चौघडिया मुहूर्त: सकाळी ०६ वाजून ११ मिनिटे ते ०७ वाजून ४१ मिनिटे.
शुभ चौघडिया मुहूर्त: सकाळी ०९ वाजून १२ मिनिटे ते १० वाजून ४२ मिनिटे.
अशा परिस्थितीत सकाळी ०६ वाजून ११ मिनिटांपासून ते ०७ वाजून ३० मिनिटे आणि पुन्हा सकाळी ०९ वाजून १२ मिनिटे ते १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत नवरातरी घटस्थापना करणे खूप शुभ राहील. जर या विशेष शुभ मुहूर्तावर कलश बसू शकत नसेल तर अभिजित मुहुर्तावर म्हणजे सकाळी ११ वाजून ४८ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३६ मिनिटे या वेळेत कलशपूजन केले जाऊ शकते.
*नवरात्रोत्सवात अनेक शुभ योग
या वेळी नवरात्रात अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथीला सकाळी सूर्योदयाच्या वेळी सर्वार्थ सिद्धी नामक शुभ योग होईल. यासोबतच अमृत सिद्धी योगही प्रभावी होणार आहे. या सर्वांमध्ये उत्तम योगायोग असा की, या दिवशी हस्त नक्षत्र संपूर्ण दिवस राहील. यंदाच्या वर्षी दुर्गा देवी हत्ती वाहनावर आरुढ होऊन पृथ्वीवर येईल. याच वाहनावर आरुढ होऊन दुर्गा देवी परत जाईल, असे सांगितले जात आहे. दुर्गा देवीचे हत्ती वाहन अतिशय शुभ मानले जात असून, याचा अत्यंत सकारात्मक परिणाम देश-दुनियेवर पाहायला मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.
पाहा खास व्हिडिओ