थिंक टँक स्पेशलरोजगार/शिक्षणशेतीवाडी
Trending

गायीच्या कासेला ५५ दिवस विश्रांती मिळालीच पाहिजे

गाई, म्हशीच्या वेतातील व्यवस्थापन

Spread the love

रविवार विशेष/ डॉ.नाना हालंगडे
व्यायल्यानंतर ५५ दिवसांत गाय, म्हशीला पौष्टिक, संतुलित आहार मिळाला पाहिजे. या दिवसांत तिचे गर्भाशय पूर्वस्थितीत येऊन परत माजचक्र सुरू करण्याच्या तयारीत आणणे महत्त्वाचे असते. शेवटच्या गाभण काळात आणि व्यायल्यानंतर सुरवातीच्या काळात भूक कमी असल्याने लवकर पचणारा व भरपूर पोषणमूल्ये असणारा आहार द्यावा.

एक वेत म्हणजे चांगल्या दूध देणाऱ्या गायींमध्ये ३०५ ते ३१० दिवस आणि म्हशींमध्ये २७० ते २८० दिवस. एकदा गाय, म्हैस व्यायली की ती पुन्हा गाभण राहून ज्या दिवशी परत वासरू, रेडकू देते, तो कालावधी म्हणजे २ वेतांतील अंतर हा काळ गायीमध्ये १२-१३ महिने तर म्हशीत १३-१४ महिने असावा. या कालावधीतील १०० दिवस म्हणजे विण्याच्या अगोदरचे ४५ दिवस व व्यायल्यानंतरचे ५५ दिवस महत्त्वाचे आहेत विण्याच्या अगोदर गायीच्या कासेला ४५ दिवस विश्रांती मिळाली पाहिजे त्यासाठी तिला संपूर्णपणे आटवली पाहिजे. आटवताना पाणी, खुराक, हिरवा चारा हळूहळू कमी करावा तिच्या कासेत सडाच्या ट्यूब भराव्यात. त्यामुळे कास एकदम आकुंचित होते.

मग तिचा आहार पुन्हा पहिल्यासारखा सुरू करावा. या ४५ दिवसांचे साधारणपणे ३ भाग पडतात. पहिल्या १० दिवसांत कासेची काळजी घ्यावी, तिला आतून-बाहेरून कोणत्याही प्रकारची इजा होऊ देऊ नये. त्यानंतरच्या ३०-३५ दिवसांत तिला पचनीय आहार व व्यायाम मिळेल, हे पाहावे. म्हणजे गर्भाशयातील वासरू, रेडकाचे वजन वाढते. व्यायच्या अगोदरच्या काळात त्यांना संतुलित आहार द्यावा. विण्याअगोदरच्या पाच दिवसांत त्यांना जास्तीतजास्त स्वच्छ ठेवावे. त्यांना निसरड्या, घसरड्या, जास्त उताराच्या, खड्डे असलेल्या जागी बांधणे, डोंगर, टेकड्या अशा जागी पाठवणे योग्य नाही.

त्यांच्या बसण्या उठण्याच्या जागेवर गवत, पाचट, गव्हाचे काड, पेंढ्याची किंवा अन्य सामग्री वापरून गादी करावी, तसेच त्यांना अत्यंत हलका आहार द्यायचा प्रयत्न करावा. व्यायल्यानंतर ५५ दिवसांत गाय, म्हशीला पौष्टिक, संतुलित आहार मिळाला पाहिजे, या दिवसांत तिचे गर्भाशय पूर्वस्थितीत येऊन परत माजचक्र सुरू करण्याच्या तयारीत आणणे महत्त्वाचे असते. तिच्या गर्भाशयातून १०-१२ दिवस येणाऱ्या स्रावामुळे तिच्या शेपटीचा भाग धुऊन, निर्जंतूक रसायने वापरून दररोज स्वच्छ ठेवावा. त्यामुळे गर्भाशयाला इजा होत नाही.

*गाभण काळ, व्यायल्यानंतरचे आहार व्यवस्थापन
गाय, म्हशी गाभण असताना शेवटचे दिवस खूप महत्त्वाचे आहेत. दुधात फॅटचे प्रमाण वाढविण्यासाठी कोरडा चारा आवश्यक आहे.

जास्त ऊर्जेसाठी खाद्यपुरके दिल्यास गाभणकाळ आरामदायी होतो. शेवटच्या गाभण काळात आणि व्यायल्यानंतर सुरवातीच्या काळात भूक कमी असल्याने लवकर पचणारा व भरपूर पोषणमूल्ये असणारा आहार द्यावा, शेवटच्या ३ महिन्यांचा गाभणकाळ अतिशय संवेदनशील आहे.

सुरवातीच्या ६ महिन्यांच्या गाभणकाळात नेहमीचे खाद्य आणि चारा आपण देऊ शकतो परंतु शेवटच्या ३ महिन्यांमध्ये जनावरांच्या पोटाचा काही भाग वासराने व्यापल्यामुळे पचनाला चांगले खाद्य देण्याची गरज असते..
खाद्य दोन ऐवजी चार वेळा विभागून दिल्यास पोटावर अतिरिक्त ताण येत नाही. प्रसूती जवळ आल्यावर पचनाला सोपे खाद्य दिल्यास प्रसूती सुलभ व्हायला मदत होते.

*गाभण काळ आणि व्यायल्यानंतर ऊर्जेची गरज
गाभण काळातील शेवटच्या २ महिन्यात गाय किंवा म्हैस दूध देत नाही, यावेळेस ती पुढील वेताची तयारी करते या काळात योग्य आहार दिला गेला तर प्रसूती व्यवस्थित होऊन दूध उत्पादनात सातत्य राहते.

शेवटच्या ३ महिन्यात गर्भाशयातील वासराची सुमारे ६५ ℅ वाढ होते. त्यामुळे गाभण काळात प्रथिनांबरोबर ऊर्जेची गरज पूर्ण करणेसाठी ऊर्जायुक्त पूरक आहार द्यावा, यामुळे गर्भाशयातील वासराची नीट वाढ होते गायीच्या शरीरात चरबीच्या रूपाने ताकद साठून राहते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोअर) ३.५ ते ४ यादरम्यान राहण्यास मदत होते. व्यायल्यानंतर होणारे दुधाचा ताप किंवा मिल्क फिवर, किटोसीस इत्यादी आजार होत नाहीत.

*शेवटच्या गाभण काळातील पशुआहार
ट्रान्जिशन फीड २.५+२.५५ किलो किंवा शरीर वजनाच्या एक टक्के देणे आवश्यक आहे, १०-१५ ग्रॅम कोलिन व १०० ग्रॅम बायपास फॅट द्यावे. हिरवा तसेच कोरडा चारा गरजेनुसार द्यावा.
व्यायल्यानंतर सुरवातीला दुभत्या गाई म्हशींची भूक कमी असते. अशा वेळेस जास्त ऊर्जा व जास्त पचनीय प्रथिने असलेला आहार द्यावा. जेणेकरून शरीराला कमी खाद्यामध्ये जास्त पोषणतत्त्वे मिळू शकतील. चांगल्या प्रतीच्या आहारासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

*गाय, म्हैस व्यायल्यानंतर कॅल्शिअमची गरज
गाय, म्हैस व्यायल्यानंतर ग्लुकोजबरोबरच कॅल्शिअमची गरज वाढते. पहिल्या दिवशी ही गरज तीन पटींनी जास्त असते. यावेळेस चीक किंवा दुधावाटे कॅल्शिअम शरीराबाहेर जातो. त्यामुळे पहिल्या आठवड्यात कॅल्शिअमची कमतरता जास्त असते.

चीक व दूध निर्मितीला कॅल्शिअम कमी पडू नये म्हणून शरीरातील संप्रेरके हाडांमधील कॅल्शिअम काढून रक्तामधील त्याचे प्रमाण वाढवितात, परंतु जेव्हा खाद्यामध्ये पोटॅशियम व सोडियमचे प्रमाण जास्त असते, तेव्हा या घटकांचे रक्तातील प्रमाण वाढून रक्ताचा सामू अल्कली स्वरूपाचा बनतो.

जास्त पोटॅशियममुळे मॅग्नेशियमची उपलब्धता कमी होते. त्यामुळे शरीराची कॅल्शिअमची कमतरता ओळखण्याची क्षमता कमी होते यामुळे संप्रेरकांचे रक्तातील प्रमाण कमी होते. शरीरातील कॅल्शिअम दूध उत्पादन व इतर शारीरिक कामांसाठी उपलब्ध केला जात नाही किंवा खाद्यातील कॅल्शिअम कमी शोषला जातो.

*व्यायल्यानंतरचा आहार
व्यायल्यानंतर ३५ ते ४५ दिवसापर्यंत गाय, म्हशीचे दूध वाढत जाते, या काळात जितके जास्त दूध आपल्याला मिळवता येईल तितके त्या वेतातील एकूण दूध उत्पादन वाढते.

या काळात कर्जेची कमतरता (निगेटिव्ह एनर्जी) दिसून येते. तिचा प्रकृती अंक (बॉडी स्कोर) खालावतो, कारण दुधावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. या वेळेस गाय उलटण्याचे प्रमाण वाढते, कारण नवीन वासरू जन्माला घालण्यासाठी लागणारी ऊर्जा शरीरात कमी पडते.

शरीरातील चरबी यकृतावर (लिव्हर) जमा होऊन फॅटी लिव्हर आजार होण्याची शक्यता असते, शरीरासाठी लागणारे ग्लुकोज यकृत पूर्ण क्षमतेने तयार करू शकत नाही. यामुळे गाय एकूण तिच्या क्षमतेपेक्षा कमी दूध व फॅट उत्पादन करते. ऊर्जेची कमतरता भरून काढल्यास पूर्ण क्षमतेने दूध व फॅट उत्पादन घेणे शक्य होऊन जनावर वेळेवर गाभण राहण्यासही मदत होते.

*शरीरात कॅल्शिअमची उपलब्धता वाढविण्याचे उपाय
शेवटच्या गाभण काळात कमी पोटॅशियम व कमी सोडियम असलेला आहार द्यावा. मॅग्नेशियमचे प्रमाण मात्र वाढवावे.
पशू आहारामधील मीठ व सोडा यांचा वापर कमी करावा. यामुळे रक्ताचा सामू आम्ल स्वरूपाचा राहण्यास मदत होईल. जेणेकरून संप्रेरके हाडांमधील व आतड्यामधील कॅल्शिअम दुधासाठी जास्त प्रमाणात उपलब्ध करू शकतील.

काही खाद्य पुरके वापरून शरीरातील रक्ताचा सामू आम्ल स्वरूपाचा करून दुभत्या गाई, म्हशींना होणाऱ्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.

गाभण काळात कमी कॅल्शिअम व जास्त मॅग्नेशिअम अशा स्वरूपात खनिजांची उपलब्धता ठेवावी.
गाभण काळात जास्त कॅल्शिअम दिला गेल्यास तो शरीरात शोषला जाण्याची क्रिया मंदावते. कारण दूध उत्पादन नसल्यामुळे कॅल्शिअम शरीरात शोषून घेणाऱ्या रिसेपटर्सचे कार्य मंदावते, याचा फटका गाय, म्हैस व्यायल्यावर बसतो. कारण व्यायल्यावर तोंडावाटे दिलेला कॅल्शिअम शरीरात कमी शोषला जातो. दुधाचा ताप हा आजार होण्याची शक्यता बळावते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका