ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलरोजगार/शिक्षणशेतीवाडी
Trending

काय सांगता? मंगुड्यातील या गावात शेतीला बांधच नाही

Spread the love
मंगळवेढ्याच्या ज्वारीला ‘जीआय’ मानांकन मिळाल्यामुळे त्या ज्वारीला जागतिक बाजारपेठ खुली झाली आहे. जगाच्या पाठीवर मंगळवेढ्याच्या ज्वारीची मागणी वाढेल. त्याचा फायदा मंगळवेढ्यातील ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे. जागतिक पातळीवर त्याचा मान टिकवून ठेवण्यासाठी ज्वारीचा दर्जा, तिची चव, तिचा रंग आणि तिची सुबकता टिकवून ठेवून जागतिक बाजारात तिचा वरचष्मा सतत निर्माण करत राहणे ही शेतकऱ्यांची कसोटी आहे.
थिंक टँक : नाना हालंगडे 
मंगळवेढा हे संत दामाजी पंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव. दामाजी पंतांनी दुष्काळात आपल्या जनतेला धान्याची कोठारे खुली करून दिली. याच दामाजी पंतांच्या नगरीने त्यांचा वारसा जपला आहे. मंगळवेढा तालुक्यातील जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला बांध नाही. ही बाब अचंबित करणारी असली तरी ते सध्याच्या स्वार्थी जगात नक्कीच आदर्शवत आहे. (Mangalwedha)
सोलापूरमध्ये प्रसिद्ध काय? असं कोणी जर एखाद्या शेतकऱ्याला विचारलं तर हमखास उत्तर मिळत ज्वारी (Jowar) असं. त्यातही प्रसिद्ध आहे ती मंगळवेढ्याची ज्वारी (Mangalvedha Jowar). या ज्वारीची खमंग खरपूस अशी भाकरी (Jowar Bread) घास मोडल्याबरोबर तोंडात विरघळेल अशी आहे. ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेला हा भाग तसा पाण्याची कमतरता असणारा. दुष्काळ (Drought) या भागाला नवा नाही. पूर्वीच्या काळी बहमनी राजवटीत सलग बारा वर्षं दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांनी या भागाला ज्वारीचं कोठार बनवलं.

अनेक तंटे हे शेतीच्या बांधावरुन होत असल्याचे आपण पाहतो. बांधाच्या वादावरून अगदी सख्खे भाऊ पक्के वैरी होतात. हे वाद टोकाला जाऊन अगदी खूनही पडतात. बांधाच्या वादावरून महसूल, पोलीस आणि न्यायालयावर ताण येतो. कारण यासंबंधीच्या वादाची अनेक प्रकरणे सुनावणीला येत असतात.

या भागात जमिनीला धर नसल्याने शेतात टाकलेला बांध टिकत नाही. केलेले बांध एखाद्या पावसात वाहून जातात. अशी स्थिती अनेक वर्षांपासून असल्याने या भागातील शेतकरी कधी बांधच घालण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आपली जमीन केवळ नजरेवर ओळखायची कशी याचे टेक्निक देखील पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. तसे बांधावर असलेले एखादे झुडूप, एखादी दगडाची खून यावरून बांध नक्की होतात. यानुसार प्रत्येक शेतकरी आपल्या मालकीची जमीन लक्षात ठेवत असतो. त्यामुळे हद्दीवरून कधी वादही होत नाहीत. 
मंगळवेढ्यात जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला आजवर कधीच बांध घालण्याची परंपरा नाही. हे विशेष आहे. एखाद्या रोडवर सलग 15 किलोमीटरपर्यंत पाहत गेला तरी तुम्हाला बांध नावाचा प्रकार पाहायला मिळत नाही. इथे शेतीच्या शिवेवरून किंवा बांधावरून कधी वादच होत नाहीत.
मंगळवेढा हा सोलापूर जिल्ह्यातील एक तालुका असून, भीमा आणि सीना या नद्यांच्या खोऱ्यात वसलेला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ एक लाख चौदा हजार एकशेपासष्ट चौरस हेक्टर आहे. त्यात लागवडीयुक्त जमिनीचे प्रमाण ब्याण्णव टक्के आहे. परिसरात चौदा गावे वसली आहेत. ज्वारी हे तेथील प्रमुख पीक. पीकरचनेत बदल अलिकडील दहा-पंधरा वर्षांत दिसत असला, तरी ज्वारीच्या पिकाखालील क्षेत्र कमी झालेले नाही. म्हणून ‘मंगळवेढा दाण्याचे’ हे नाव टिकून आहे. शहराच्या पूर्व भागात एकशेपंचेचाळीस चौरस किलोमीटरचा सलग, अतिशय सपाट, काळ्या जमिनीचा पट्टा असून, ती जमीन केवळ महाराष्ट्रात नव्हे तर आशिया खंडातील वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. ती जमीन चिकणयुक्त मातीने तयार झालेली, सपाट अशी आहे. ते तीस ते पन्नास फूट खोलवर काळ्या मातीने भरलेले सरोवरच म्हणा ना! जमिनीचा उतारा 0.2 टक्के ते 0.5 टक्के एवढा आहे.
 पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या पटकन बाहेर वाहून जात नाही. त्यामुळे पाऊस झाल्यानंतर जमिनीच्या वरच्या भागात साचलेले पाणी हे समुद्रासारखे दिसते. जास्त झालेले पाणी वाहून जाण्यासाठी मध्यभागी छोटी छोटी वगळी (छोटा ओढा) दिसतात. उरलेले पाणी जेवढे शक्य आहे तेवढे जमिनीत मुरते आणि उर्वरित पाणी बाष्पीभवनाने उडून जाते. त्या जमिनीत चिकण मातीचे प्रमाण साठ-पासष्ट टक्के आहे. पिकास अपायकारक असे क्षारांचे प्रमाण एक मीटर खोलपर्यंत नाही. परंतु, त्यानंतर मात्र करल, क्षार आणि आम्ल यांचा निर्देशांक वाढत जातो. ओल्या मातीचा थर एक मीटरच्या खाली भर उन्हाळ्यातदेखील असतो. त्या ओल्या मातीत सोडियमयुक्त चिकण मातीचे प्रमाण वाजवीपेक्षा जास्त आहे. पाणी शोषून घेण्याची क्षमता त्या जमिनीत फारच कमी असल्यामुळे पाणी खाली लवकर मुरत (झिरपत) नाही.
बांध टिकत नाहीत
या भागात जमिनीला धर नसल्याने शेतात टाकलेला बांध टिकत नाही. केलेले बांध एखाद्या पावसात वाहून जातात. अशी स्थिती अनेक वर्षांपासून असल्याने या भागातील शेतकरी कधी बांधच घालण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आपली जमीन केवळ नजरेवर ओळखायची कशी याचे टेक्निक देखील पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. तसे बांधावर असलेले एखादे झुडूप, एखादी दगडाची खून यावरून बांध नक्की होतात. यानुसार प्रत्येक शेतकरी आपल्या मालकीची जमीन लक्षात ठेवत असतो. त्यामुळे हद्दीवरून कधी वादही होत नाहीत.
मालदांडी ज्वारीचा तोरा
मंगळवेढा पूर्वापार मालदांडी ज्वारी पिकवण्यात प्रसिद्ध आहे. म्हणून म्हण अशी आहे, की ‘पंढरपूर पाण्याचे, सांगोला सोन्याचे आणि मंगळवेढा दाण्याचे’. त्याचा अर्थ असा, की ते तीन तालुके त्या तीन पदार्थांनी समृद्ध आहेत. मंगळवेढा दाण्याचे म्हणजे मालदांडी ज्वारी पिकवण्यामध्ये (प्रादेशिक भाषेत त्याला ‘शाळू’ म्हणतात) मंगळवेढा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सात नवीन पिकांना 2016 मध्ये ‘जीआय’ (भौगोलिक निर्देशांक Geographical Index) मानांकन मिळाले. त्यात मंगळवेढ्याच्या ज्वारीचाही समावेश आहे. तेथील जमीन व वर्षानुवर्षें ती पीकरचना जपण्यात तेथील शेतकऱ्यांनी दाखवलेले सातत्य हे मानांकनामागील इंगीत आहे.
मंगळवेढ्याची ज्वारी सातासमुद्रापार पोहोचली आहे. इथल्या मालदांडी ज्वारीला केंद्र सरकारचे GI मानांकन मिळाले आहे. इथल्या काळ्याशार जमिनीतून केवळ एखाद्या पावसावर मोत्यासारखी पांढरी शुभ्र ज्वारी, हरभरा, करडई आदी पिके पिकतात. या पिकात औषधी गुणधर्म असल्याने याला फार मोठी मागणी असते. या भागातील शेतकरी कधीच ज्वारीचे बियाणे बाजारातून खरेदी करत नाहीत. पिढ्यानपिढ्या शेतात आलेल्या ज्वारीतून पुढच्या वर्षीच्या बियाणासाठी ज्वारी काढून ठेवली जाते.
ज्वारीला पण एक इतिहास आहे
मंगळवेढ्याच्या ज्वारीला पण एक इतिहास आहे. देशभरात या ज्वारीला खास मागणी असते. एकेकाळी दुष्काळामुळे चर्चेत आलेला मंगळवेढा ज्वारीचं कोठार म्हणून सर्वत्र ओळखला जाऊ लागला. याला कारण म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांची दुष्काळाबरोबर दोन हात करण्याची ताकद.
बहमनी राजवटीत म्हणजेच १४६८ पासून ते १४७५ पर्यंत भीषण दुष्काळ पडला होता. याच काळात दामाजीपंत इथले तहसीलदार होते. दुष्काळात इथली जनावरं अन्न-पाण्यावाचून तडफडू लागली होती. लोक गाव सोडून जाऊ लागली होती. पण जिथे जाईल तिथं हीच परिस्थिती, सगळीकडे मरणासन्न अवस्था निर्माण झाली होती.
दुसरीकडे सुलतानाची गोदामं मात्र अन्नधान्यानं तुडुंब भरली होती. देशोधडीला लागलेली जनता भीक मागत फिरते, हे दामाजीपंतांना काही सहन झालं नाही. त्यांनी कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता सुलतानाची गोदामं जनतेसाठी खुली केली. ही खबर कानोकान पसरली. एक वेळचं जेवण मिळावं म्हणून लोक लांबून लांबून चालत मंगळवेढ्याला येऊ लागली. दामाजीपंतांनी कोठारं उघडी केल्याची बातमी सुलतानापर्यंत पोहोचली. सुलतानाने तात्काळ दामाजीपंतांना बेड्या ठोकल्या आणि बिदर दरबारात हजर केलं.
या संकट काळात विठू महार नावाचा एक गरीब माणूस बिदर दरबारात आला. त्याने ६०० खंडी धान्यापोटी १ लाख २० हजार मोहरा भरून पावती घेतली आणि दामाजीपंतांची सुटका केली. हा विठू महार कोण? तर असं म्हटलं जातं की साक्षात पांडुरंगच विठू महाराचं रूप घेऊन बिदरला आला होता. दामाजीपंतांना आपल्यावर पंढरीच्या पांडुरंगाची कृपा झाल्याची जणू खात्री पटली. त्यानंतर त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. आणि आपलं आयुष्य पांडुरंगाच्या सेवेत घालवायचं ठरवलं.  पण सलग बारा वर्षे पडलेल्या दुर्गादेवीच्या दुष्काळानंतर इथल्या शेतकऱ्यांनी जगण्यासाठी मोठे कष्ट उपसले. त्यांनी मोठ्या जिद्दीन मंगळवेढ्यात ज्वारीची शेती फुलवली.
दुष्काळी भागात शेती फुलवनं तितकसं सोपं नव्हतं. पण मंगळवेढ्याची जमीन अगदी कसदार. मंगळवेढ्याच्या पूर्व भागात १४५ चौरस किलोमीटरचा सलग सपाट कसदार जमिनीचा पट्टा आहे. असा पट्टा फक्त महाराष्ट्रातच नाही तर आशिया खंडातला एक वैशिष्ट्यपूर्ण पट्टा आहे. या भागात अतिशय खोल काळ्याभोर चिकन मातीने तयार झालेली सपाट जमीन आहे.
जमिनीची हीच सुपीकता ज्वारीसाठी जमेची बाजू ठरली. त्यामुळेच आजही मंगळवेढ्यात ज्वारीचं सर्वाधिक उत्पादन होतं. आता मंगळवेढ्यानंतर बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर अक्कलकोट भागात सरसकट ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं. इथल्या ज्वारीला एक वेगळीच चव आहे. ज्वारीच्या या मुबलक उत्पादनामुळे ज्वारी फक्त हुरडा आणि भाकरीपुरती मर्यादित राहिली नाही. आता ज्वारीपासून उपीट, इडली, चकली असे पदार्थ तयार केले जातात. त्याची बाजारपेठ सुद्धा जिल्ह्याला उपलब्ध झाली आहे.
सततच्या पाठपुराव्यानंतर २०१६ मध्ये केंद्र सरकारकडून मंगळवेढ्याच्या ज्वारीला जीआय मानांकन मिळालं. साहजिकच इथल्या ज्वारीचा लौकिक जगभरात पोहोचला. ज्वारीची भाकरी हा महाराष्ट्राच्या परंपरागत आहारातला महत्त्वाचा घटक आहे. आरोग्याच्या दृष्टीने ज्वारीचं महत्त्व वाढत चाललंय.
मंगळवेढ्याच्या ज्वारीचा कडबादेखील मऊ, पांढरा आणि चवदार असतो. जनावरे तो आवडीने खातात. तो इतर भागांतील कडब्यापेक्षा मऊ असल्यामुळे जनावरांना खाण्यास सोपा जातो. त्या कडब्याच्या बुडक्यापर्यंतचा भाग जनावरांकडून खाल्ला जातो. मंगळवेढ्यात पिकणारा बराचसा कडबा सांगली–कोल्हापूर व कर्नाटकातील काही भागांत विकला जातो.
काळ्या जमिनीव्यतिरिक्त भीमा नदीकाठचा भाग वगळता तालुक्याच्या इतर भागातील मुख्य पीकदेखील ज्वारीच आहे. तेथेदेखील ज्या ठिकाणी तीन-चार फूटांपर्यंत खोलवर काळी जमीन आहे; त्या ठिकाणची ज्वारी काळ्या जमिनीतील ज्वारीसारखी असते. काही ठिकाणी त्याहून हलक्या असलेल्या जमिनीत पेरलेल्या ज्वारीला पाण्याची उपलब्धता असलेले शेतकरी एक-दोन वेळा पाणी देण्याचा प्रयत्न करतात. परंतु काळ्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्यामुळे पीक अधिक काळ तग धरून राहू शकते. पेरणीनंतर चाळीस-पंचेचाळीस दिवसांनी निसर्गाने साथ दिली व ऐंशी-शंभर  मिलिमीटरपर्यंत पाऊस पडला, तर जमिनीची उत्पादकता पूर्ण क्षमतेने व्यक्त होते. तीच मंगळवेढ्याला निसर्गाने दिलेली मोठी देणगी आहे.
मंगळवेढ्याच्या ज्वारीला ‘जीआय’ मानांकन मिळाल्यामुळे त्या ज्वारीला जागतिक बाजारपेठ खुली झाली आहे. जगाच्या पाठीवर मंगळवेढ्याच्या ज्वारीची मागणी वाढेल. त्याचा फायदा मंगळवेढ्यातील ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे. जागतिक पातळीवर त्याचा मान टिकवून ठेवण्यासाठी ज्वारीचा दर्जा, तिची चव, तिचा रंग आणि तिची सुबकता टिकवून ठेवून जागतिक बाजारात तिचा वरचष्मा सतत निर्माण करत राहणे ही शेतकऱ्यांची कसोटी आहे. मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना तेथेच थांबून चालणार नाही, तर त्या मालाला ‘पीजीआय’ नोंद करून घेणे आवश्यक आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका