एसटीचे विलिनीकरण परवडणारे नाही, ही मागणी सोडून द्या
एसटी कामगार संघटनेचे माजी कार्याध्यक्ष पन्नालाल सुराणा यांचा सल्ला
- हेही वाचा : आमदारांचा बाप ड्रायव्हर हवा होता!
- मराठी माणूस टिकला नव्हे तर निलंबित झाला पाहिजे, ही सरकारची मानसिकता
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
एसटी कर्मचाऱ्यांकडून एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी होत आहे. मात्र ही मागणी वस्तुस्थितीला धरून नाही. विलिनीकरण परवडणारे नाही. यात कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होईल. ही मागणी सोडून द्यावी. लाखो लोक चिकाटीने जगतात तसे एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या न करता चिकाटीने जगावे, असा सल्ला एसटी कामगार संघटनेचे माजी कार्याध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी आंदोलकांना दिला.
पन्नालाल सुराणा यांनी सोलापुरात पत्रकार आहेत घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर भाष्य केले. भाजपवरही कोरडे ओढले. सुराणा हे १९६३ ते १९८० या काळात एसटी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष होते.
भाजपकडून आंदोलनाआडून काड्या
पत्रकारांशी बोलताना सुराणा म्हणाले की, रेल्वेचे खाजगीकरण करणारे भाजपवाले आता एसटीचे खाजगीकरण करण्यासाठीच राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उतरले आहेत. आतापर्यंत सरकार पडणार पडणार म्हणणारे भाजपवाले सरकार पडत नाही हे दिसताच आता एसटीच्या आंदोलनाआडून काड्या करत आहेत.
सरकारच्या अडचणी ध्यानात घ्या
सुराणा पुढे म्हणाले की, विलीनीकरण करताना होणाऱ्या अंमलबजावणीला येणाऱ्या अडचणी लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आहे त्यात भागवा
खर्च कमी करून आहे त्यात भागवून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढू शकते, असा मोलाचा सल्ला सुद्धा सुराणा यांनी यावेळी बोलताना दिला. डिझेल आणि टायर खरेदीत एसटीला केंद्र सरकारने सवलत द्यावी तसेच लाखो कष्टकरी कुटुंब चिवटपणे जगत आहेत हे पाहून तरी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले.
महामंडळाचा निर्णय विचारपूर्वकच
सध्या एसटीचे जे महामंडळ अस्तित्वात आहे तो निर्णय सरकारने त्याकाळात विचारपूर्वकच घेतला आहे. सरकारी खर्चाला दरवर्षी विधिमंडळाची मंजुरी घ्यावी लागते. सुटे पार्ट विकत घेण्यासाठी वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागते .त्यामुळे सरकारी कामाला विलंब होतो. स्वायत्त महामंडळांना ते काम करताना जागच्या जागी निर्णय घेऊन करता येतात, असेही सुराना म्हणाले.
संपामुळे नुकसान
एसटीचा संप इतके दिवस चालू ठेवल्यामुळे प्रवासी, नागरिक ,महामंडळ व खुद्द कामगारांचे सुद्धा मोठे नुकसान होत आहे. हे घडायला नको होते अशी खंत सुराणा यांनी व्यक्त केली.
मान्य होणाऱ्या मागण्याच मागा
एसटीचे सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची मागणी वस्तुस्थितीला धरून नाही. ही मागणी सोडून द्यावी. मान्य होणाऱ्या इतर मागण्यांसाठी आग्रही राहावे, असे आवाहन सुराणा यांनी केले.
कोण आहेत पन्नालाल सुराणा?
पन्नालाल सुराणा हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परांडा तालुक्यातील आसू या गावचे रहिवासी असून समाजवादी नेते आहेत. सुराणा हे शाळेत असताना राष्ट्रसेवादलात दाखल झाले. पुढे तरुणपणी त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात राहून भूदान चळवळीत भाग घेतला. समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून व समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणूनही त्यांनी काम बघितले. सध्या (२००९ साली) ते सोशालिस्ट फ्रन्टचे राष्ट्रीय सचिव व साने गुरुजी कथामालेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवर चाळीस पुस्तके लिहिली आहेत. १९८६ ते ९३ या काळात ते दैनिक मराठवाडाचे संपादक होते. दुष्काळ निवारण, निर्मूलन, शेतकरी-शेतमजुरांच्या हक्कासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. आणीबाणीच्या काळात ते भूमिगत होते. त्यानंतर त्यांना अटक झाली होती. भूमिमुक्ती आंदोलनात त्यांना चार वेळा तुरुंगवास झाला. लातूर भूकंपात निराधार झालेल्या मुलांसाठी त्यांनी ‘आपलं घर’ ही शाळा सुरू केली. पर्यावरण आणि जलसंधारणाच्या क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय काम केले.