गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशल

आईला सर्पदंश, लहानग्यांनी वाचविला जीव

सांगोला तालुक्यातील महिममधील घटना

Spread the love

मीरा पाटील यांनी विद्युत पंपाचे बटन सुरू केले व पाणी देण्यासाठी त्या बांधावरून पिकाकडे येत होत्या.हर्षवर्धन व अजित ही दोन मुले त्यांच्या पाठोपाठ बांधावरून येत होती.नेमक्या त्याच वेळेस मीरा यांच्या डाव्या पायाला घोट्याजवळ विषारी सापाने दंश केला. दंश केलेला साप वेगाने दुसऱ्या बाजूला अडचणीत निघून गेला.मागे असलेल्या मुलांनी हा सगळा प्रकार प्रत्यक्ष पाहिला.

सांगोला/ नाना हालंगडे
समाज माध्यमांवर मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतानाच महीम (ता.सांगोला) येथील माता दोन लहानग्या मुलांना घेऊन शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेली होती. अचानक आईच्या पायाला सर्पदंश झाला. त्यावेळी या दोन लहानग्यांनी न घाबरता प्रसंगावधान राखत प्रथमोपचार करून तिला ताबडतोब दवाखान्यात दाखल केले.अन् जीवघेण्या सर्पाच्या दंशातून आईचे प्राण वाचवून वास्तववादी मातृदिन साजरा केला आहे.

मातृदेवो भव ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे.भारतीय संस्कृतीमधील विविध सण- समारंभामध्ये मातेला अनन्य साधारण महत्व आहे. अशा सण- समारंभामध्ये तिची पूजा करून आशीर्वाद घेतले जातात. मातेच्या सन्मानार्थ जगभर मातृदिन मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी साजरा करण्याची प्रथा आहे.अमेरिकेतून सुरुवात झालेली ही प्रथा जगभर पाळली जात आहे.

रविवार(ता.१४) रोजी हा मातृदिन साजरा करण्यात आला.छोट्या व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शिवाय गतिमान जीवनशैलीमुळे एरवी मातांचे फोटो समाज माध्यमांवर फारसे पाहावयास मिळत नाहीत. त्रिकोणी किंवा फार तर चौकोनी कुटुंबामुळे वयस्कर माता या बऱ्यापैकी अडगळीला गेलेल्या दिसतात. मात्र मातृदिनाच्या निमित्ताने मातांचे फोटो समाज माध्यमांवर झळकत होते. आयुष्यभर हलाक्याच्या परिस्थितीचा सामना करत कुटुंबाला प्रगती कडे घेऊन जाणाऱ्याा माता रविवारी समाज माध्यमांवर पहावयाास मिळत होत्या.

रविवार(ता.१४) मातृदिनाच्या दिवशीच एक अनोखी घटना सांगोला तालुक्यातील महीम हद्दीमध्ये घडली.महीम येथील दत्तात्रय विश्वंभर पाटील यांचे कुटुंब महीम गावापासून जवळच राहते. दत्तात्रय पाटील हे सांगोला महावितरण मध्ये नोकरीस असल्याने सकाळीच लवकर घराबाहेर पडले होते.त्यामुळे साहजिकच शेत-शिवाराची जबाबदारी पत्नी मीरा यांच्यावर होती.

सकाळी लवकर घरातली कामे उरकून त्या घरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी सकाळी नऊ वाजता गेल्या होत्या. त्यांच्यासोबत नुकताच सहावी पास झालेला हर्षवर्धन तर नुकताच चौथी पास झालेला अजित ही दोन मुले होती.

मीरा पाटील यांनी विद्युत पंपाचे बटन सुरू केले व पाणी देण्यासाठी त्या बांधावरून पिकाकडे येत होत्या.हर्षवर्धन व अजित ही दोन मुले त्यांच्या पाठोपाठ बांधावरून येत होती.नेमक्या त्याच वेळेस मीरा यांच्या डाव्या पायाला घोट्याजवळ विषारी सापाने दंश केला. दंश केलेला साप वेगाने दुसऱ्या बाजूला अडचणीत निघून गेला.मागे असलेल्या मुलांनी हा सगळा प्रकार प्रत्यक्ष पाहिला.या कठीण प्रसंगात केवळ बारा वर्षे वय असलेला हर्षवर्धन तर दहा वर्षे वय असलेला अजित हे दोघेही घाबरले नाहीत.

त्यांना सर्पदंशावरील प्रथमोपचार ताबडतोब आठवले. जवळच पडलेलं दावं आणि फडकं त्यांनी उचललं आणि दंश केलेल्या जागेच्या वर दोन ते तीन ठिकाणी पायाला घट्ट बांधलं. शिवाय सध्या आंब्याचे दिवस असल्याने आंबे कापून खाण्यासाठी एक चाकू त्यांनी मळ्यात आणून ठेवला होता.तो चाकू त्यांनी पळत जाऊन आणला आणि सर्पदंश झालेल्या ठिकाणी चाकूने वार करून कापले.

वरून खाली पाय दाबत आणून जखमेतून रक्त पिळून काढले. हे सगळं करत असतानाच या दोन लहान मुलांनी ताबडतोब गावातील जीप चालकाला फोन करून जीप मागवून घेतली. वडील नोकरी निमित्ताने सांगोल्याला गेले असल्याने त्यांनी गावात राहणारी आत्या व वडिलांचे चुलत भाऊ सोमा पाटील यांना फोन करून ही माहिती दिली.

साडेनऊ वाजता सर्पदंश झाला होता. प्रथमोपचार करून नातेवाईकांना कल्पना देऊन जीप बोलावून ते दहा वाजता महूद येथील महूद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आयसीयु मध्ये आईला घेऊन दाखल झाले.त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर डॉ.दत्तात्रय काटकर यांनी ताबडतोब उपचार केले. येथील आयसीयु मध्ये सर्पदंशावरील सर्व उपचार उपलब्ध असल्याने मीरा पाटील यांच्यावर ताबडतोब उपचार करण्यात आले. मीरा पाटील यांच्या प्रकृतीला आता कोणत्याही प्रकारचा धोका नाही.

लहानांपासून थोरापर्यंत सर्वांनाच संकटात सापडल्यानंतर प्रथम आठवते ती आई. मात्र मातृदिनाच्या दिवशीच आपली आई सर्पदंशामुळे मृत्यूच्या दाढेत सापडली असताना हर्षवर्धन व अजित यांनी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान व समंजसपणा कौतुकास्पद आहे.त्यामुळे मातृदिनी केला आईचा अनोखा सन्मान,विषारी सर्पदंशापासून तिचा वाचवला प्राण असेच म्हणावे लागेल.

शेतावर काम करत असताना सर्पदंशाच्या अनेक घटना ऐकावयास मिळतात. त्यावर कोणते प्रथम उपचार करावेत याची माहिती कुटुंबातील चर्चेमधून व शाळेमधून मिळाली होती. नेमका आईलाच सर्पदंश झाला. अशा वेळी ते सगळं आठवून कृती केली त्यामुळे आईचे प्राण वाचवता आले.- हर्षवर्धन व अजित पाटील,महीम

उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी मीरा पाटील यांच्यावर केलेले प्रथमोपचार पाहून मुलांचे फार कौतुक वाटले. त्यांनी प्रसंगावधान राखून दाखवलेल्या धाडसामुळेच आईचे प्राण वाचवण्यास मदत झाली. – दत्तात्रय काटकर, महूद आयसीयू

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका