“IAS अधिका-याची माणुसकी”

"मागे वळून पाहताना" (भाग-२) : इ. झेड. खोब्रागडे

Spread the love
सुट्टीच्या दिवशी मी पिपरी येथे माझ्या नातेवाईकांकडे गेलो होतो. हे गाव वर्धेपासून 10 -15 किमी अंतरावर आहे. रात्री मुक्कामानंतर दुसरे दिवशी दुपारी वर्धेला परतण्यासाठी आम्ही बस स्टॉपवर उभे होतो. माझे नातेवाईक सोबत होते. तिघेही बसची वाट पाहत होतो. एवढ्यात एक पांढऱ्या रंगाची कार पुढे गेली आणि थांबली. कारला अंबर दिवा होता. ती कलेक्टरची कार होती आणि थांबल्यामुळे मी कारकडे गेलो. कलेक्टर कारमध्ये होते. त्यांनी मला रस्त्यावर पाहिले होते. कलेक्टर म्हणाले..

राज्य शासनाचा महसूल विभागाचा नियुक्ती आदेश घेऊन परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून मार्च 1983 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे रुजू झालो. निवासी उपजिल्हाधिकारी यांना भेटलो. त्यांनी माझी जिल्हाधिकारी यांची भेट करून दिली. एम. बी. चौबे हे तेव्हा जिल्हाधिकारी होते. त्यांनी आस्थेने विचारपूस केली. आर. डी. सी. यांना ते म्हणाले, “नवीन आहेत. यांना रेस्ट हाऊसची खोली द्या, शिपाई द्या, प्रशिक्षण कार्यक्रम द्या. लक्ष द्या, काळजी घ्या”.
हे ऐकून फार बरे वाटले. मी पहिल्यांदाच जिल्हाधिकारी यांना भेटत होतो. त्यांच्याच सांगण्यावरून RDC यांनी शिपायासह सगळी व्यवस्था केली. दोन वर्षांचा प्रशिक्षण कार्यक्रम दिला. आर. डी. सी. सुद्धा उमद्या स्वभावाचे वाटले. देवळीला तलाठ्याकडे प्रशिक्षण सुरू झाले. पहिल्या लेखात याबाबत थोडक्यात लिहिले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या सूचना होत्या की, जिल्हाधिकारी यांच्याकडे होणाऱ्या सर्व बैठकांना मी हजर राहिले पाहिजे. तोही प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग होता. बैठकीत कोणकोणत्या विषयावर कशी चर्चा होते, अधिकारी काय सांगतात, कसे सांगतात, त्यावर कलेक्टर कोणती प्रतिक्रिया देतात, निर्देश देतात हे हळूहळू लक्षात येऊ लागले होते. विषय, नियम, कायद्याच्या तरतुदींची ओळख होऊ लागली होती. माझ्यासाठी हे सगळं नवीनच होत. मी बारकाईने निरीक्षण करून, शिकण्याचा प्रयत्न करीत असे. टंचाईची बैठक असो की, महसूल अधिकाऱ्यांची मासिक बैठक, प्रत्येक बैठकीत सर्वांना चहा नाश्ता आणि मिठा पान दिले जायचे. आता मात्र, पान बंद झाले. चहा नाश्ता सुरू आहे.

जिल्हाधिकारी खूप कडक व शिस्तीचे पण चांगले अधिकारी असल्याचे मला जाणवू लागले होते. त्यांचा खूप दरारा होता, कर्मचारी, अधिकारी तसे बोलायचे, घाबरायचे. मीटिंगमध्ये जिल्हाधिकारी ठाम निर्णायक भूमिका घ्यायचे व तसे निर्देश द्यायचे. मला मनातून चांगलेही वाटायचे आणि भीतीसुद्धा. विषय फार कळत नव्हते परंतु समजून घेण्याची इच्छा व्हायची, वाचन सुरू झाले. बैठकांत हजेरी लावण्याचा असा उपयोग झाला.

जिल्हाधिकारी यांच्याबाबत घडलेला एक प्रसंग सांगावासा वाटतो. सुट्टीच्या दिवशी मी पिपरी येथे माझे नातेवाईकांकडे गेलो होतो. हे गाव वर्धेपासून 10 -15 किमी अंतरावर आहे. रात्री मुक्कामानंतर दुसरे दिवशी दुपारी वर्धेला परतण्यासाठी आम्ही बस स्टॉपवर उभे होतो. माझे नातेवाईक कृषी खात्यात अधिकारी होते. त्यांची पत्नी नात्याने माझी साली आहे. ते, त्यांची पत्नी आणि मी, आम्ही तिघेही बसची वाट पाहत होतो. एवढ्यात एक पांढऱ्या रंगाची कार पुढे गेली आणि थांबली. कारला अंबर दिवा होता. ती कलेक्टरची कार होती आणि थांबल्यामुळे मी कारकडे गेलो. कलेक्टर कारमध्ये होते. त्यांनी मला रस्त्यावर पाहिले म्हणून थांबले होते. कलेक्टर म्हणाले, “कुठे जायचे आहे?” मी म्हणालो वर्ध्याला. तेव्हा सोबत चला म्हणाले. मी म्हणालो, “सर, माझ्यासोबत माझे दोन नातेवाईक आहेत. आम्ही बसने येतो” यावर, कलेक्टर म्हणाले, “बोलवा त्यांना”. आम्ही तिघेही मागच्या सीटवर बसलो. कलेक्टर स्वतः कार चालवत आम्हाला वर्धेत, आम्ही सांगितले तेथे ड्रॉप दिला. मी पहिल्यांदाच कलेक्टरच्या गाडीत बसलो होतो. माझे नातेवाईकही पहिल्यांदाच कलेक्टरच्या गाडीत बसले होते. दोघेही एवढे प्रभावित झाले होते की, कलेक्टरच्या माणूसपणाच्या वागणुकीचे कौतुक करीत होते. सर्वाना सांगत होते.

रुजू झाल्यानंतर पहिल्या एक-दोन महिन्यात आलेला हा माझ्यासाठी सुद्धा सुखद अनुभव होता. रस्त्यावर उभा असताना मला ओळखणे, गाडीत सोबत चला म्हणणे, दोन नातेवाईकांना सुद्धा सोबत गाडीत यायला सांगणे आणि त्यासाठी स्वतः गाडी चालविणे हे एक संवेदनशील IAS अधिकारीच करू शकतो हे मी अनुभवले. ही घटना तशी छोटीशी, परंतु मोठ्या मनाची, माणुसकीचे दर्शन घडवणारी होती. कलेक्टर असेही वागू शकतात ह्याचे हे उत्तम उदाहरण होते. खरं तर त्यांनी मला ओळखले नसते किंव्हा ओळखले तरी गाडी थांबवली नसती आणि थांबवली तरी मला व नातेवाईकांना स्वतः गाडी चालवत वर्धेला घेऊन गेले नसते तरी काहीच बिघडले नसते. आम्हास वाईट वाटण्याचे कारणही नव्हते. त्यामुळे, ह्या घटनेचा माझ्या मनावर खूप चांगला प्रभाव पडला आणि कलेक्टर पदावरील व्यक्तीबद्धल खूप आदर वाटू लागला. अर्थातच असे वागणारे फारच कमी कलेक्टर किव्हा IAS ऑफिसर असतात हेही अनुभवले.

मे 1983 मध्ये कलेक्टर यांची बदली झाली तेव्हा मला मनातून वाईट वाटले. हिंमत करून नागपूरला मी त्यांना जाऊन भेटलो. आभार मानले. त्यांच्या पत्नी रेल्वेमध्ये अधिकारी होत्या. कलेक्टर यांचे नाव मधुकर चौबे असे होते. पुढे, मी मुंबईला म्हाडात 1994 पासून डेप्युटेशनवर कार्यरत असताना व माझ्याकडे राजीव गांधी निवारा प्रकल्पाच्या संचालक पदाचा कार्यभार असताना त्यांच्याशी माझी भेट झाली. 1996-97 ची गोष्ट असेल. त्यांनी सरकारच्या प्रधान सचिव पदाचा राजीनामा दिला होता. चौबे सर हे गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे ओएसडी व सल्लागार होते. 1995 च्या निवडणुकीत युती सरकार सत्तेवर आले. 40 लाख घरं देण्याची घोषणा अंमलात आणण्यासाठी त्यांची मदत गृहनिर्माण मंत्री यांना होत होती. ब-याचदा चौबे सर माझ्याकडे येऊन बसायचे व चर्चा करायचे. मला अवघडल्यासारखे वाटायचे. मी म्हणत असे, “सर, मला बोलवा मी येईन तुमच्याकडे.” मात्र ते मोकळे वागत असत. असे अधिकारी तेव्हाही कमी होते आणि आजही कमी आहेत. तेव्हा तर सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता आणि बातम्याही वृत्तपत्रात फार येत नव्हत्या. 1983 ला कलेक्टर यांनी जे माणुसकीचे दर्शन घडविले त्याची बातमीही झाली नाही. आजही काही अधिकारी प्रयत्न करीत असतात. तर, काही खूप प्रसिद्धी मिळवितात. अशाने काही क्षणांसाठी चांगली प्रसिद्धी होते. परंतु, त्यामागे निरपेक्षता नसेल तर ते टिकत नाही.
मी वर्धा येथे 2006-07 या काळात दीड वर्षासाठी कलेक्टर होतो. माझ्या पी.ए यांनी सांगितले की, माजी कलेक्टर रेस्टहाऊसला आले आहेत. त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आले होते. मी जाऊन त्यांना भेटलो. या घटनेची पुन्हा चर्चा झाली. अधिकाऱ्यांनी माणुसकीचे वर्तन निरपेक्ष भावनेने करीत राहिले पाहिजे, हे मी या घटनेतून शिकलो आणि माझ्या प्रशासकीय काळात त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करीत राहिलो. काही झालं काही राहीलं.
(क्रमशः)

– इ. झेड. खोब्रागडे (भाप्रसे नि.)
Mob-9923756900

(प्रशासकीय अनुभवांवर आधारित विविध घटना जाणून घेण्यासाठी इ. झेड. खोब्रागडे लिखित “आणखी एक पाऊल”, “प्रशासनातील समाजशास्त्र” ही दोन पुस्तके नक्की वाचा. संपर्क- डॉ.बबन जोगदंड-9823338266, डॉ. महेंद्रकुमार मेश्राम-9975665862) संविधान फाउंडेशनच्या संविधान जागृती अभियानात कृपया आपला सहभाग नोंदवा.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका