सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुका हा टेंभू आणि म्हैसाळ योजनेच्या शेवटी म्हणजे टेलला आहे त्यामुळे प्रत्येक वेळी टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्याला देत असताना सबंधित प्रशासनाने नियोजन नसल्याने नेहमीच सांगोला तालुक्यावर अन्याय होत आला आहे. परंतु, रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या आवर्तनात आम्ही सांगोला तालुक्यावर होणारा अन्याय अजिबात खपवून घेणार नाही. आमच्या हक्काचे संपूर्ण पाणी मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केला.
कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना व टेंभू उपसा सिंचन या योजनांची कालवा सल्लागार समितीची बैठक रविवार दि. २९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत माजी आमदार दिपकआबा बोलत होते.
पुढे बोलताना दिपकआबा म्हणाले, आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामाचे पाणी वाटपाचे नियोजन करत असताना टेल टू हेड प्रमाणे सर्वप्रथम सांगोला तालुक्यातील शेतीला मिळाले पाहिजे. सांगोला तालुक्यात चालू वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी सांगोला तालुक्यातील रब्बीची पिके, नागरिकांना आणि जनावरांना जीवनदान देण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन व्यवस्थित करून नियमाप्रमाणे पाणी वाटप करावे. आणि सबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष देऊन याची खातरजमा करावी असेही यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी अधिकाऱ्याकडून रब्बी हंगामाचे म्हैशाळ योजनेचे पंप १७ नोव्हेंबर रोजी चालू होतील व टेंभू योजनेची रब्बी हंगामाचे पंप १५ डिसेंबर रोजी चालू होतील टेंभू चे पाणी १५ जानेवारीपर्यंत सांगोला तालुक्यामध्ये पोहोचेल या पाण्यामधून दोन्ही योजनांची रब्बी हंगाम आवर्तन यशस्वी केले जाईल असे आश्वासन दिले. तसेच टेंभू आणि म्हैसाळ दोन्ही योजनांची आवर्तन नियमा प्रमाणे पूर्ण होतील असेही आवर्जून नमूद केले.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी खासदार संजय काका पाटील, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार अनिल भाऊ बाबर, आमदार सुमनताई पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार समाधान आवताडे, आमदार विक्रम सावंत, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.