गुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलशेतीवाडी
Trending

‘मपोसे’ ते आयपीएस अधिकारी : नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा थक्क करणारा प्रवास

Spread the love

सोलापूर : डॉ. बाळासाहेब मागाडे 
सोलापूर जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी बदली झाली असून त्यांच्या जागी नाशिक पोलीस अकादमीचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन पोलीस अधिक्षक सरदेशपांडे यांचा “मपोसे” ते “आयपीएस अधिकारी” असा प्रवास थक्क करणारा आहे. मागील महिन्यातच सरदेशपांडे यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकही मिळाले आहे.

राज्य पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) समावेश होतो. केंद्रीय गृह विभागाकडून ही प्रक्रिया राबविली जाते. राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलिस उपअधीक्षक झालेले अधिकारी हे दहा ते बारा वर्षांच्या सेवेनंतर भारतीय पोलिस सेवेचे (आयपीएस) अधिकारी होतात. पोलिस अपअधीक्षक, अतिरिक्त अधीक्षक, उपायुक्त अशा पदांवर काम केल्यानंतर त्यांना स्वतंत्रपणे जिल्ह्याचा कारभार पाहण्याची संधी आयपीएस झाल्यानंतर मिळते. त्यांच्या सेवेनुसार त्यांच्या आयपीएस सेवेची बॅच निर्धारित होते.

महाराष्ट्र पोलिस सेवेत कार्यरत असलेल्या १६ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची २०२० मध्ये भारतीय पोलिस सेवेसाठी निवड करण्यात आली. यामध्ये २०१७ च्या बॅचचे सदानंद वायसे-पाटील, अविनाश बारगळ, नंदकुमार ठाकुर यांच्यासह शिरीष सरदेशपांडे यांचा समावेश होता.

विविध पदांवर काम
सोलापूरचे नूतन पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पोलिस विभागात विविध पदांवर काम केले आहे. लातूरचे अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे येथे परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक आदी विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. तत्पूर्वी त्यांनी चंद्रपुरातील वरोरा, भुसावळ, चाळीसगाव येथे उपविभागीय अधिकारी म्हणून दमदार कामगिरी केली आहे. सोलापूरची नियुक्ती होण्यापूर्वी सरदेशपांडे यांनी नाशिक येथे पोलीस अकादमीमध्ये पोलीस अधिक्षक पदावर काम केले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सन्मान
नूतन पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेसाठी मागील महिन्यात पोलीस पदक देवून सन्मान करण्यात आला.

राज्यातील ११४ पोलीस अधिकाऱ्यांसह शिरीष सरदेशपांडे यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता.

कोरोना काळात दमदार कामगिरी
नूतन पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पुणे येथे पुणे शहर पोलिस दलात झोन क्र.२ येथे पोलीस उपायुक्त म्हणून काम करत असताना कोरोना काळात दमदार कामगिरी केली आहे.

पुणे शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. व्‍यंकटेशम यांच्‍या नेतृत्‍वाखाली पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी टाळेबंदीच्‍या काळात कौतुकास्‍पद आणि विधायक काम केले. हे काम अत्यंत जोखमीचे आणि आव्‍हानात्‍मक होते. कारण त्‍यासाठी कोणतेही मॅन्‍युअल नव्‍हते, लेखी आदेश नव्‍हते, ड्यूटी चार्ट नव्‍हता.. आपल्‍या विवेकशक्‍तीचा वापर करुन प्राप्‍त परिस्थितीमध्‍ये योग्‍य वाटणारी कृती करुन अडचणीत असलेल्‍या लोकांची मदत करणे, हाच एकमेव उद्देश होता, असे पोलिसांचे मत होते.

‘जे का रंजले गांजले, त्‍यासि म्‍हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचिं जाणावा’ असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी म्‍हटले आहे. या उक्‍तीचा तंतोतंत प्रत्‍यय पुणे पोलीस आयुक्‍तालयातील दलाने दाखवून दिला. पुणे शहरात 9 मार्चला कोरोनाची पहिली व्‍यक्‍ती आढळल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा गतीने कामाला लागली. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्‍यासाठी शासनस्‍तरावरुन वेळोवेळी टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्‍यात आली. पहिला टप्‍पा 25 मार्च ते 14 एप्रिल 2020, दुसरा टप्‍पा 15 एप्रिल ते 3 मे 2020, तिसरा टप्‍पा 4 मे ते 17 मे 2020 आणि चौथा टप्‍पा 18 मे ते 31 मे 2020 असा होता.

पुणे शहर पोलीस दलातील सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त डॉ. मितेश घट्टे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त डॉ. पंकज देशमुख, सुहास बावचे, वीरेंद्र मिश्र, स्वप्ना गोरे, पौर्णिमा गायकवाड, संभाजी कदम आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्‍तालयाच्‍या हद्दीतील लोकांसाठी अथक परिश्रम घेवून त्‍यांना दिलासा दिला. टाळेबंदीच्‍या काळात पुणे शहर पोलीस दलातील ‘माणुसकी’चा अनुभव अनेकांना आला.

तेजस्वी सातपुते यांचे कार्य चिरंतन टिकणारे
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची बदली झाली आहे. त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आली नाही.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी आपल्या कारकिर्दीत गुन्हेगारांवर चांगलाच वचक ठेवला होता. विशेषत: वाळूमाफीयांविरुध्द त्यांनी मोहीम उघडून वाळूची तस्करी करणार्‍यांविरुध्द अनेकवेळा त्यांचेवर कारवाईचा बडगा उचलला होता. ऑपरेशन परिवर्तनच्या माध्यमातून सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या आजूबाजूच्या भागातील हातभट्टी दारु निर्मितीचे अड्डे उद्धवस्त करण्यात आले. हातभट्टीत राबणारे हात आता उद्योग व्यवसायात गुंतलेले असतात. या अवैध धंद्यातील पुरुष, महिला यांना सातपुते यांनी कर्जे मिळवून दिली. या व्यवसायातील अनेकांनी आपला दुसरा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांचे हे काम चिरकाल टिकणारे असेल.

एल्गार प्रकरणातही केली धडक कारवाई
नूतन पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पुणे परिमंडळ -२ चे पोलीस उपायुक्त असताना बहुचर्चित एल्गार प्रकरणातही बेधडक कारवाई केली होती. एल्गार सभा आणि भिमा कोरेगाव हिंसाचार या प्रकरणाचा छडा लावला होता. एल्गार परिषदेच्या आयोजनामागे माओवादी संबंध असल्याप्रकरणी पत्र-मेलसह अनेक महत्वाचे पुरावे त्यांनी हस्तगत केले होते.

एल्गार परिषदेसाठी कबीर कला मंच, सीपीआय माओवाद्यांनी निधी पुरवला असल्याचा गौप्यस्फोट तत्कालीन पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी केला होता. आरोपींचे काश्मिरातील फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा दावाही पोलिसांनी केला होता. नक्षली कनेक्शनप्रकरणी प्रसिद्ध कवी वारावर राव, अरुण फरेरा, व्हर्नोन गोन्सावलीस, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा यांना अटक करण्यामध्ये तत्कालीन पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

सोलापूरच्या मातीचे अनंत उपकार

महाराष्ट्राचा धर्म कोणता?

माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका : आ. शहाजीबापू पाटील

‘बच्चन’ व्हायचंय का तुम्हाला?

कोणत्या मोबाईलमध्ये Jio चा 5G सपोर्ट मिळेल? पाहा सर्व कंपन्यांच्या मोबाईलची यादी

 

 

 

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका