ताजे अपडेटथिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

महाराष्ट्राचा धर्म कोणता?

डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा खळबळजनक लेख

Spread the love

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातनी धर्म नाकारला आणि महाराष्ट्राला समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, स्त्रियांचा आदर-सन्मान करणारा, प्रागतिक विचारांचा धर्म दिला. आपणच विचार करा मग महाराष्ट्राचा धर्म कोणता?

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. छत्रपतींच्या राज्यात भेदभावाला थारा नव्हता. छत्रपती शिवाजीराजे समतावादी होते. त्यांनी रयतेचे हित जोपासले. शिवाजीराजांचे राज्य केवळ एका जातीचे, धर्माचे, घराण्याचे नव्हते, तर ते रयतेचे राज्य होते. “शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका” हा आदेश छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिला. संकटसमयी ते गोरगरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. “तिजोरीवर लाख दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल, परंतु आपल्या राज्यातील गरीब उपाशी पोटी झोपता कामा नये” असा मानवतावाद छत्रपती शिवाजी राजांनी जपला. राज्यातील आणि परराज्यातील सर्व जाती धर्मातील महिलांचा आदर -सन्मान केला पाहिजे, शत्रूच्या स्त्रियांचाही उपमर्द होता कामा नये, हा नियम छत्रपती शिवाजी राजांनी घालून दिला.

छत्रपती शिवाजी राजांची मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांच्या विरोधातील लढाई राजकीय होती, ती धार्मिक कधीही नव्हती. त्यांची राजकीय लढाई मोगलाविरुद्ध, आर्थिक-कृषीविषयक लढाई सरंजामदाराविरुद्ध आणि धार्मिक लढाई सनातण्यांविरुद्ध होती.

शिवाजीराजे धार्मिक होते; परंतु धर्मांध नव्हते. त्यांनी कोणाचीही धर्मांधता खपवून घेतली नाही. त्यांच्या राज्यात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते. त्यांच्या प्रशासनात आणि सैन्यात सर्व जाती-धर्माचे मावळे होते. शिवाजीराजे बुद्धिप्रामाण्यवादी होते. त्यांनी कधी भविष्य-पंचांग, मुहूर्त पाहिला नाही. त्यांना आपल्या इष्ट परंपरेचा अभिमान होता. पण अनिष्ठ परंपरा त्यांनी मोठ्या धैर्याने त्यांनी नाकारल्या. त्याकाळात राज्याभिषेक करणे धर्मबाह्य असताना देखील ६ जून १६७४ रोजी त्यांनी राज्याभिषेक केला. तेवढ्यावरती महाराज थांबले नाहीत.

२४ सप्टेंबर १६७४ रोजी छत्रपती शिवाजी राजांनी तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक केला. छत्रपती शिवाजी राजांचा दुसरा राज्याभिषेक ही महान क्रांतिकारक, परिवर्तनवादी आणि दिशादर्शक घटना आहे. दुसरा राज्याभिषेक त्यांनी शाक्त धर्मानुसार केला, असे महान प्राच्यविद्यापंडित शरद पाटील सांगतात.

छत्रपती शिवाजी राजांनी दुसरा राज्याभिषेक केला म्हणजे त्यांनी सनातनी परंपरा नाकारली. शिवाजीराजांचा दुसरा राज्याभिषेक हा त्यांनी वैदिक म्हणजेच सनातनी धर्म नाकारला. शिवाजीराजांचा दुसरा राज्याभिषेक स्पष्ट करतो की शिवाजी महाराज समतावादी, स्त्रियांचा सन्मान करणारे, त्यांना स्वातंत्र्य देणारे, बुद्धिप्रामाण्यवाद जोपासणारे होते. शिवाजी राजांचा धर्म समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, स्त्रियांचा आदर सन्मान करणारा आहे. हाच महाराष्ट्राचा खरा धर्म आहे. शिवकालीन साधनांत मराठा धर्म असा उल्लेख आहे. राजाराम महाराज पाटणकरांना पाठवलेल्या पत्रात म्हणतात की मराठा धर्माचे रक्षण करणे हे तो स्वामी कार्य आहे. मराठा ही व्यापक संकल्पना आहे. अठरा पगडा जाती, बारा बलुतेदारांना मराठा म्हटले आहे.

आधुनिक काळात सनातनी अर्थात वैदिक धर्माची बौद्धिक पातळीवरती चिरफाड करण्याचे महान कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. सनातनी धर्म हा बहुजन समाजाचे शोषण करणारा आहे. त्यांना शिक्षणापासून, हक्क-अधिकारापासून वंचित करणारा आहे, त्यामुळे तो नाकारला पाहिजे, ही महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका होती. त्यासाठी त्यांनी तृतीयरत्न नावाचे नाटक, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, छत्रपती शिवाजी राजांचा पोवाडा इत्यादी लेखन केले. बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपल्या देशात सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया घातला.

बहुजन समाजाला धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जे सत्य आहे ते स्वीकारायचे आणि जे असत्य आहे ते नाकारायचे, मानवी मूल्यांची जोपासना करणे, हाच खरा धर्म आहे, ही महात्मा फुले यांची भूमिका होती. त्यांनी सार्वजनिक सत्य धर्मच्या माध्यमातून बहुजन समाजाला धार्मिक स्वातंत्र्य दिले.

पुरोहिताकडून कोणताही विधी करावयाचा नाही, निर्मिकापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. कर्मकांड ,अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी चालीरीती यावरती महात्मा ज्योतिराव फुले यांनी कडाडून हल्ला केला. आपले विधी आपण केले पाहिजेत, लग्न समारंभ पार पाडण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. भाकड कथा, निराधार पुराणकथा, बहुजन समाजाला गुलाम बनवणाऱ्या परंपरा यांचा त्याग केला पाहिजे, ही महात्मा फुले यांची आग्रही भूमिका होती.

महात्मा फुले यांनी महाराष्ट्राला सार्वजनिक सत्य धर्म दिला म्हणजे सनातनी धर्म परंपरा त्यांनी नाकारली. शंभू महादेव, पंढरीचा पांडुरंग, बळीराजा, जोतिबा, खंडोबा, भैरोबा, म्हसोबा ही आपली खरी परंपरा आहे, हे फुलेंनी सांगितले.

छत्रपती शिवाजी राजांच्या कोल्हापूर गादीचे प्रभावशाली अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपल्या संस्थानांमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. आपल्या देशातील उपेक्षित, वंचित, गरीब, कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी वर्गाला पहिले आरक्षण त्यांनी दिले. सर्वाधिक जलसाठयाचे देशातील पहिले राधानगरी हे धरण त्यांनी बांधले. औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी क्रांती केली. त्यांनी आंतरजातीय विवाहाला चालना दिली, त्याची सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रागतिक विचारांचे होते.

छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक, कृषी क्षेत्रात क्रांती केली. त्याप्रमाणेच धार्मिक क्षेत्रात देखील त्यांनी रचनात्मक क्रांती केली. नारायणशास्त्री भटजीने अभ्यंगस्नानाचे प्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना शूद्र ठरवून वेदोक्त मंत्रपठण नाकारले होते, याचा परिणाम महाराष्ट्राच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात झाला. जो सनातनी अर्थात ब्राह्मणी धर्म आपल्याला शूद्र ठरवतो, आपले हक्क-अधिकार नाकारतो, आपला छळ करतो, तो धर्म आपला असू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी १९२० साली स्वतंत्र मराठा धर्माची स्थापना करून दिले. याप्रसंगी काढलेल्या जाहीरनाम्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणाले “ज्या पद्धतीने लिंगायत आणि जैन यांनी ब्राह्मणी धर्माचे जू फेकून दिले, त्याप्रमाणेच आम्ही या धूर्त जातीच्या धार्मिक प्रभावातून मुक्त व्हावे, असे ठरविले आहे. एकाच राष्ट्रात राहून धार्मिक बाबतीत ब्राह्मणांशी वारंवार वाद करीत बसणे, हे राष्ट्रासही विघातक आहे”

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्वतंत्र धर्माची स्थापना केली. क्षात्रजगद्गुरु पदाची निर्मिती केली. फर्ग्युसन महाविद्यालयातून संस्कृत आणि तत्त्वज्ञान विषय घेऊन शिकलेले महाबुद्धिमान व प्रागतिक विचाराचे सदाशिव लक्ष्मणराव पाटील यांना शाहू महाराजांनी मराठा धर्मपीठाच्या प्रमुखपदी बसविले. परंतु क्षात्रजगतगुरूंनी लग्न करावे व माणसानी खांद्यावर घेतलेल्या पालखीत बसू नये, असा शाहू महाराजांचा विचार होता, त्याचे पालन त्यांनी केले. म्हणजे शाहू महाराजांचा धर्म हा मानवतावादी धर्म होता. सनातनी तथा धर्म राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नाकारला व क्रांतिकारक, समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, स्त्रियांचा आदर-सन्मान करणारा मराठा धर्म राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केला. हाच महाराष्ट्राचा खरा धर्म आहे

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि तत्कालीन परिस्थिती यांची प्रेरणा घेऊन भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रबोधनाच्या क्षेत्रात महान क्रांती करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशासाठी रचनात्मक कार्य केले. हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या देशाला संविधान दिले. शेतकरी, उपेक्षित, वंचित वर्गाच्या हितासाठी त्यांनी मोलाचे प्रबोधन केले. विपुल लेखन केले. रस्त्यावर उतरून संघर्ष केला. संसदेमध्ये आवाज उठविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान अभ्यासक होते. ते संपादक होते. ते महान शिक्षणतज्ञ होते. ते महान कायदेपंडित होते. ते इतिहासकार होते. ते कृषीतज्ञ जलतज्ञ होते.

सनातनी धर्माने नाकारलेले अधिकार इथल्या उपेक्षित, वंचित वर्गाला मिळावेत यासाठी त्यांनी चवदार तळ्याचे आंदोलन केले. काळाराम मंदिर आंदोलन केले. त्यांनी बहुजन समाजाला अधिकार नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. जो धर्म सार्वजनिक ठिकाणी पाणी पिऊ देत नाही, शिक्षण घेऊ देत नाही, दैवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश करू देत नाही, तो धर्म आपला कसा असू शकतो ? ही जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करून दिली. १९३५ साली नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली “ज्या धर्मात मी जन्मलो, त्या धर्मात मी मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्मावे, हे माझ्या हातात नव्हते, परंतु कोणत्या धर्मात मरावे हे माझ्या हातात आहे, म्हणून त्यांनी लाखो अनुयायांसह १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

बुद्ध हा केवळ भारताचाच नव्हे, तर जगाचा महामानव आहे. तथागत गौतम बुद्धाने वेदप्रामाण्य नाकारले, महिलावरील निर्बंध नाकारले, अनिष्ट परंपरा नाकारल्या. गौतम बुद्ध हे समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, स्त्रियांचा आदर-सन्मान करणारे, मुलींच्या जन्माचे स्वागत करून मुलीला देखील वंशाचा दिवा मानणारे होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातनी परंपरां नाकारून, भारतीयांचा श्वास तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्माची १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षा घेतली.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातनी धर्म नाकारला आणि महाराष्ट्राला समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, स्त्रियांचा आदर-सन्मान करणारा, प्रागतिक विचारांचा धर्म दिला. आपणच विचार करा मग महाराष्ट्राचा धर्म कोणता?

-डॉ. श्रीमंत कोकाटे
(लेखक हे महाराष्ट्रातील सुप्रसिध्द इतिहास संशोधक आहेत. त्यांचे अनेक वैचारिक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.)

 

मुख्यमंत्र्यांचा गोंधळ! चुकून यशवंत मनोहरांना वाहिली श्रद्धांजली

पेशवे आणि ब्रिटिशांना नडणारे छत्रपती प्रतापसिंह!

“पवार आणि ठाकरेंना ‘खंजीर’ चिन्ह द्या”

जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागणार?

माझ्याकडून दुसरं काही शिकू नका, फक्त धाडस शिका : आ. शहाजीबापू पाटील

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका