हराळवाडी पाझर तलावाच्या पुनरूज्जीवनाची गरज
सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांची मागणी
थिंक टँक न्यूज नेटवर्क
कामती ता. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे असलेल्या पाझर तलावात चिलार बाभळी आणि इतर झाडं उगवली आहेत. तलावात गाळही मोठ्या प्रमाणात साठला आहे. या तलावाचे तातडीने पुनरूज्जीवन केले तर त्याचा फायदा पंचक्रोशीतील गावांना होऊ शकतो पाझर तलावातील गाळ काढल्यास परिसरातील विहिरी आणि बोअरच्या पाणीपातळीत वाढ होईल. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या दुर होण्यासाठी त्याचा उपयोग करून घेता येईल.
याविषयी हराळवाडीचे सामाजिक कार्यकर्ते आणि पैलवान माऊली हेगडे म्हणाले,पाझर तलावासाठी हराळवाडीच्या शेतकरी व गावकऱ्यांनी त्याग केला आहे.मात्र,पाटबंधारे खात्याने दाखविलेल्या अनास्थेमुळे तलावाची हानी होत आहे.त्याकडे संबंधित विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे. मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे २००४ सालच्या दुष्काळी स्थितीमध्ये गोरगरिबांच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेमधून पाझर तलाव तयार करण्यात आला आहे.
पाझर तलाव व नव्याने सांडपाण्याचे नियोजन केलेल्या तलावाचे क्षेत्र पाच एकर विस्तारलेले आहे.तात्कालिक जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी २०१९ मध्ये पाझर तलावाचे एकुण क्षेत्र ११.६६ एकर इतके नव्याने मंजुर केले. दुष्काळामध्ये लोकांच्या हाताला काम देण्यासाठी आणि त्यातून तलावाची भरीव स्वरूपाची कामे होऊन दुष्काळावर मात करण्यासाठी पाणीसाठा निर्माण व्हावा.
या उदात्त हेतूने २००३ ते २००४ मध्ये रोजगार हमी योजनेतून पाझर तलावाची निर्मिती करण्यात आली. दरवर्षी पावसाळ्यात साठणारे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.त्याबरोबर झाडाझुडपाने,चिलारीने भरलेल्या हराळवाडी हद्दीतील पाझर तलावाची दुरवस्था झाली आहे. हराळवाडी महसूल हद्दीत असणारे तलावक्षेत्र सध्या पूर्णपणे गाळाने भरले आहे.पाझर तलावाची पाणी साठवण क्षमता निम्माने कमी झाली आहे. पाझर तलावाची देखभाल शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून केली जाणे अपेक्षित असते.परंतू त्याच्याकडून कोणतीही कार्यवाही होता दिसत नाही.पाझर तलावाकडे ग्रामप्रशासानेही व जिल्हाप्रशासनानेही साफ दुर्लक्ष केले आहे,असे माऊली हेगडे म्हणाले.