हंगिरगे येथे बेकायदा मुरुम उत्खनन, न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल
तहसीलदार सांगोला यांनी मंडलाधिकारी जवळा यांना याबाबत पत्र देऊन अर्जाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यास कळवले. त्याप्रमाणे मंडलाधिकारी यांनी अहवाल तयार केला आहे. परंतु अवैद्य मुरूम उपसाबाबत पोलिसात तक्रार घेण्यात आली नसल्याने फिर्यादीने त्यांच्या क्षेत्रातील फिर्यादीच्या परस्पर मुरूम चोरून नेल्या बाबत न्यायालयात तक्रार दाखल केली.
सांगोला/ नाना हालंगडे
मुरुम खोदकामासाठी शासनाची कोणतीही परवानगी न घेता फिर्यादीच्या परस्पर त्यांच्या जमिनीतील बेकायदा मुरूम उत्खनन करून पर्यावरणाचे नुकसान केल्याबाबत सी. पी. बागल अँड कंपनीचे चंद्रकांत प्रभाकर बागल आणि पद्माकर प्रभाकर बागल यांच्याविरुद्ध सरिता दादासाहेब सावंत (रा. सांगोला) यांनी तक्रार दाखल केली आहे. अवैध मुरूम उत्खनना विरोधात पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हकीकत अशी की, हंगिरगे (ता. सांगोला) येथे फिर्यादीच्या मालकीची जमीन आहे. फिर्यादी हे कुटुंबासोबत सांगोला येथे राहण्यास आहे. हंगिरगे येथे हंगिरगे ते टोकले वस्ती या रस्त्याचे मुरमीकरण व खडीकरण करण्यात आलेले आहे. सदर रस्त्याच्या ठेका सी. पी. बागल अँड कंपनी, रा. गादेगाव यांना मिळाला आहे. फिर्यादीच्या जमिनी मधील त्यांच्या परस्पर व फिर्यादीचे कोणतीही परवानगी न घेता एक एकर क्षेत्रातील सुमारे साडेतीन फूट खोदकाम करून जागोजागी खड्डे पडून फिर्यादीच्या मालकीची मिळकतीतील मुरूम खोदकाम व वाहतूक केला आहे.
फिर्यादी गावी येत नसल्याने तसेच कोरोना विषाणूचे प्रादुर्भावामुळे गावी जाता आले नसल्याने फिर्यादीच्या परस्परच अवैधरित्या मुरुम नेण्यात आला आहे. याबाबत फिर्यादीने चौकशी करून सांगोला पोलीस स्थानकात तक्रार देण्याकरता आले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली.
त्यानंतरही फिर्यादीने सांगोला पोलीस स्टेशनकडे रजिस्टर पोस्टाने लेखी तक्रार पाठवली. तसेच त्या तक्रारीच्या प्रतीही उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा, तहसीलदार सांगोला यांना पाठविण्यात आल्या.
तहसीलदार सांगोला यांनी मंडलाधिकारी जवळा यांना याबाबत पत्र देऊन अर्जाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्यास कळवले. त्याप्रमाणे मंडलाधिकारी यांनी अहवाल तयार केला आहे. परंतु अवैद्य मुरूम उपसाबाबत पोलिसात तक्रार घेण्यात आली नसल्याने फिर्यादीने त्यांच्या क्षेत्रातील फिर्यादीच्या परस्पर मुरूम चोरून नेल्या बाबत न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सांगोला पोलिसात याबाबत गुन्ह्याची नोंद झाली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले हे करीत आहेत