स्वराज्यरक्षक संभाजी आणि इतिहासाचे अवजड ओझे
विजय चोरमारे यांचा खणखणीत लेख
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे `गो ब्राह्मण प्रतिपालक` एवढेच त्यांचे कर्तृत्व त्यांनी अनेक दशके मराठी मनांवर थोपले. रामदास आणि दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याच्या भाकडकथा पाठ्यपुस्तकांमधून पेरल्या. अनेक पिढ्यांच्या डोक्यात तीच खोट्या इतिहासाची रद्दी भरली. पेशव्यांनी अटकेपार झेंडे फडकले आणि पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला, अशी शब्दरचना अत्यंत हुशारीने केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा काढला. परंतु त्याचवेळी छत्रपतींवर वार करायला पुढे आलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचे आडनाव अनेक वर्षे दडवले. अशा कितीतरी गोष्टींची जंत्री सांगता येईल. जेम्स लेनने जिजाऊ महासाहेबांचे चारित्र्यहनन केले, त्याला विपर्यस्त माहिती पुरवणारी हीच पिलावळ होती. इतिहासाच्या माध्यमातून आपल्या सोयीची मांडणी, सोयीच्या गोष्टी आणि सोयीच्या शब्दरचना त्यांनी केल्या.
याच मंडळींनी छत्रपती संभाजी महाराजांचे चारित्र्यहनन करणा-या काल्पनिक कहाण्या पसरवल्या. मल्हार रामराव चिटणीसांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे सव्वाशे वर्षांनी लिहिलेल्या बखरीचा आधार मानून संभाजी महाराजांचे चरित्र रंगवण्यात आले. तेच अस्सल साधन असल्याचा प्रचार करण्यात आला. तोच आधार घेऊन संभाजी महाराजांसाठी धर्मवीर ही उपाधि वापरली जाऊ लागली. राम गणेश गडकरी यांचे `राजसंन्यास` हे नाटक त्याच परंपरेतले. १९४१ साली ग. कृ. गोडसे यांनी `धर्मवीर संभाजी` हे नाटक लिहिले होते, त्याचे प्रयोग पुढची पन्नास वर्षे होत होते. त्यानंतर अगदी अलीकडच्या काळातसुद्धा धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्फूर्तीकथा (रमाकांत देशपांडे), धर्मवीर संभाजीराजे (महेश तेंडुलकर), धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज (अरुण जाखडे) अशी संभाजी महाराजांना धर्मवीर संबोधणारी पुस्तके सापडतात.
शाहीर योगेश यांनीही – `देश धरमपर मिटनेवाला / शेर शिवा का छावा था/ महापराक्रमी परमप्रतापी / एकही शंभू राजा था` अशा ओळी लिहून ठेवल्या आहेत.
एका बखरकाराने सूडबुद्धीने विपर्यस्त चित्रण केले. तेच खरे मानून ललित लेखकांच्या प्रतिभेला धुमारे फुटले. त्यातूनच संभाजी महाराजांसाठी धर्मवीर हे विशेषण रूढ झाले. चार वर्षांपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांची `स्वराज्यरक्षक संभाजी` ही दूरचित्रवाणी मालिका झी टीव्हीवरून प्रसारित झाली. आशय आणि सादरीकरण अशा दृष्टिकोनातून मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट म्हणता येईल अशी ही मालिका होती. या मालिकेने संभाजी महाराजांच्या चरित्रावरील डाग धुवून काढण्याचे काम केले.
संभाजी महाराजांची स्वराज्यरक्षक ही प्रतिमा अधिक ठळक बनवली. इतिहासाबाबत अनभिज्ञ असलेल्या सामान्य मराठी जनांना अनाजीपंत आणि त्यांच्या टोळीच्या कर्तृत्वाची ओळख करून दिली. लोकांना इतिहास कळत नसला तरी इतिहासाचा वर्तमानाशी असलेला धागा लगेच पकडता येतो. टीव्ही मालिकेतील अनाजीपंतांच्या व्यक्तिरेखेचा धागा महाराष्ट्राच्या राजकारणातील व्यक्तिरेखेशी नेमकेपणाने जुळला. ऐतिहासिक दृष्टिकोनातून वर्तमान राजकारणाकडे पाहण्याची नवी दृष्टीच या मालिकेने दिली.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी परवा विधिमंडळात बोलताना छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणावे, धर्मवीर म्हणू नये असे विधान केले. यात मोर्चा काढून निषेध करण्याजोगे काय आहे? सत्ताधा-यांनी थोडे सबुरीने घ्यायचे असते. पण इथे उलटेच घडतेय. सत्ताधारीच असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. खोके आणि गद्दार या शब्दांचा लोकांना विसर पडावा यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. मग त्यासाठी नटीच्या भगव्या अंतर्वस्त्रांपासून लव जिहादपर्यंत काहीही चालते. सत्ताधा-यांनीच वातावरण बिघडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे पहिल्यांदाच घडते आहे. त्यांचा उद्देश एकच आहे. २०२४ पर्यंत धार्मिक, जातीय तेढ वाढत जाईल असे मुद्दे घेऊन सतत रस्त्यावर उतरायचे. लोकांच्या डोक्यात विद्वेषाचे विष भरायचे आणि त्यावर राजकीय पोळी भाजून घ्यायची.
विशिष्ट वर्गातील इतिहासकारांनी मराठ्यांच्या इतिहासाचे नियोजनपूर्वक विकृतीकरण केले. अलीकडच्या काळात बहुजन समाजातील अनेक इतिहास संशोधक पुढे आले. त्यांनी हे विकृतीकरणाचे प्रयत्न हाणून पाडले. खरा इतिहास ठोस पुराव्यांनिशी समोर आणला. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंच्या यादीतून रामदास, दादोजी कोंडदेव यांची हकालपट्टी झाली. शहाजीराजे आणि जिजाऊ महासाहेब हेच शिवरायांचे गुरू असल्याचे पुढे आले.
अजितदादा पवार यांच्या विधिमंडळातील भाषणात, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणून एका विशिष्ट प्रतिमेत बंदिस्त करू नये, असा आशय होता. त्यांच्यासाठी स्वराज्यरक्षक हीच उपाधि सर्वार्थाने योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते. तरीही कुणी संभाजीराजांना धर्मवीर म्हटले म्हणून फारसा फरक पडणारा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त ब्राह्मणांचे आणि गायींचे रक्षण केले, एवढ्यापुरते त्यांचे कर्तृत्व मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न विशिष्ट वर्गाने वर्षानुवर्षे केले. आजही संधी मिळेल तेव्हा ही मंडळी गो ब्राह्मण प्रतिपालक असाच शिवरायांचा उल्लेख करीत असतात. स्वराज्यरक्षक किंवा धर्मवीर या उपाध्या ज्याने त्याने सोयीनुसार वापरल्या तरी फरक पडणार नव्हता. पण भाजपने त्यावरून वातावरण तापवले.
अजितदादांच्या निषेधार्थ मोर्चे काढले. हे म्हणजे अनाजीपंतांच्या औलादींनी छत्रपती संभाजी महाराजांना काय उपाधि लावावी, हे सांगण्यासारखे होते. कोणत्याही गोष्टीवर दंगा करायचा. टीव्हीवर आपले बोलघेवडे प्रवक्ते धाडून तिथे सोयीचा प्रचार करायचा. स्वतःच्या सोयीच्या गोष्टी ठळकपणे छापून आणायच्या. आपल्याच लोकांना रस्त्यावर उतरून कांगावा करायला लावायचा. अशा अनेक मार्गांनी चुकीच्या गोष्टींचा प्रसार करण्याचे उद्योग सध्या महाराष्ट्रात सुरू आहेत.
इथे आणखी एक गोष्ट विचारात घ्यावी लागते.
अजितदादा पवार यांना सातत्याने लक्ष्य का केले जाते?
त्याचे उत्तर पुण्याच्या लालमहालात मिळते.
लाल महालातील दादोजी कोंडदेव आणि राजमाता जिजाऊ यांचे शिल्प होते. संभाजी ब्रिगेडसह मराठा संघटनांचा या शिल्पाला आक्षेप होता. हे शिल्प हटवण्यासाठी मोठी आंदोलनेही झाली. न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकदा महापालिकेला हजारो लोकांनी घेराव घातला होता. त्यानंतरच्या घडामोडींमध्ये एका रात्री दादोजींचे शिल्प कापून काढून अज्ञात स्थळी हलवण्यात आले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पुणे महापालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून अजित पवार यांनी घेतलेला हा निर्णय होता. अजित पवार यांचा हा घाव अनेकांच्या वर्मी लागला.
दादोजींचे शिल्प काढून टाकण्याचा निर्णय हा स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारी निर्णय होता. छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे विकृतीकरण समूळ नष्ट करण्यासाठी केलेली ही कृती होती. परंतु नंतरच्या काळात त्याची मोठी किंमत अजितदादांना सार्वजनिक जीवनात चुकवावी लागली.
आतासुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्या धार्मिक राजकारणासाठी वापर करणा-यांना अजितदादांनी फटकारले आहे. त्याचमुळे बिथरलेली ही मंडळी रस्त्यावर उतरून कांगावा करू लागली आहेत.
राजकारण राजकारणाच्या अंगाने सुरू राहील. परंतु सांस्कृतिक राजकारण नेत्यांच्या प्राधान्य यादीवर असायला हवे.अजितदादांच्या राजकारणाबाबत अनेकांचे अनेक मतभेद असू शकतील. परंतु सांस्कृतिक राजकारणाला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी जोरकसपणे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान बाळगणाऱ्या समाजाने अजित पवार त्यांचे हे योगदान लक्षात ठेवायला हवे.
त्यापलीकडे जाऊन इतिहासाचा बाजार मांडणा-यांसाठी विंदा करंदीकर यांच्या पुढील ओळी खूप काही शिकवणा-या आहेत –
इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊन ना नाचा
करा पदस्थल त्याचे, आणिक
चढुनी त्यावर भविष्य वााचा
– विजय चोरमारे
खास लेख