स्त्री-पुरुष समानता कुठाय?
कपिल राऊत यांचा विशेष लेख
जगात विशेषतः भारतामध्ये स्त्रियांची स्थिती काय आहे याचा विचार केला तर स्त्रियांचे रोजचे प्रश्न जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने समानता आहे, असं म्हणता येणार नाही. स्त्री-पुरुष समानतेसाठी घरातील केवळ एकाच व्यक्तीची भूमिका असून चालत नाही. तर दोघांनीही पुढाकार घेणे आवश्यक असते. त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून झाली पाहिजे व केवळ पुरुषांना विरोध केल्याने ही समानता होणार नसून त्यासाठी महिलांनीही जबाबदारी ओळखली पाहिजे. मुला-मुलींमध्ये भेद न करता समान वागणूक दिली तरच स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल.
स्त्री-पुरुष समानतेबाबत बोलायचे झाल्यास आजच्या आधुनिक काळातही आपल्या समाजामध्ये स्त्रीची समानता आभासीच वाटते, असे म्हटल्यास मुळीच वावगं ठरणार नाही. जी काही समता व स्वातंत्र्य स्त्रीला दिलेले दिसते ते शिक्षणाने आलेल्या समाजभानामुळे. मानवी हक्कांच्या जाणिवेमुळे आणि स्वातंत्र्य, समता इत्यादी तत्त्वांच्या विचारप्रवाहामुळे. तसेच पुरुष हा शक्तिशाली तर असतोच, सोबतच विचारशीलही असतो. त्याने स्त्रीचा सन्मान करायलाच हवा तो सुद्धा एका स्त्रीच्या पोटातून जन्म घेतलेला मनुष्य प्राणीच आहे हे विसरून जायला नको.
ज्याप्रमाणे आपल्याही घरात आई, बहीण आहेत तसेच अत्याचारग्रस्त महिला सुद्धा कोणाची तरी आई, बहीण असणार याचे भान असायला हवं. परंतु, आमच्या काही अशिक्षित, असंस्कृत बांधवांकडून स्त्रीचे रक्षण होण्याऐवजी मिळेल त्याठिकाणी तिचं शोषणच केलं जातं ही दुर्भाग्याची बाब आहे.
म्हणून म्हणावसं वाटतं,
असंख्य विचाराचे
अनेक इथे दिसतील
स्त्री समर्थनाच्या बाता करणारे
घरी अत्याचार करताना दिसतील…!
संदर्भित कवितेच्या चार ओळी माझ्याच “अपवाद दिसतील” या कवितेतील असून येथे उल्लेख केला आहे. ज्यांना अजूनही जीवनाचा अर्थ कळलेला नसतो अशा कोवळ्या मुली तसेच महिलांवर सुद्धा अत्याचार केला जातो, मुलींचा मजबुरीचा फायदा घेऊन बलात्कार केला जातो. या गोष्टी काही नवीन नाहीत. असे लोक अशिक्षित असंस्कृत असतात असंच म्हणावं लागेल ,पण अस ही म्हणता येणार नाही. आम्ही कित्येकदा बघतो की, शिकलेला सुशिक्षित व्यक्ती सुद्धा जेव्हा असा वागतो तेव्हा स्वतःला पुरुष म्हणवून घेण्याच्या पुरुवृत्तीला लाज वाटावी असं हे वर्तन असतं.
खरं तर आधी व्यक्तीची मानसिकता बदलायला हवी. ही मानसिकता कशी बदलेल तर याची सुरुवातच प्रत्येकाच्या घरातूनच व्हायला हवी.. प्रत्येक मुलाला लहानपणापासूनच स्त्रीचा आदर करायला शिकवायला हवा. पुरुष किंवा मुलगा हाच वंशाचा दिवा आता ही संकल्पना बदलायला हवी.
आम्ही बरेचदा असही बघतोय की, नेहमीच पुरुष विचारसरणी ही समानतेच्या विरोधात असतात पण अस काही नसतं प्रत्येक बापाला आपल्या मुलीची तेवढीच काळजी असते. तिला लहाण्याचं मोठं करण्यापासून तर तिच्या अब्रुरक्षणापर्यंत, तिच्या शिक्षणापासून ते तिच्या लग्नापर्यंत. समानता हा शब्द बोलायला जेवढ सोपं जातं तेवढच ते कठीण. एखादं विवाहित जोडपं बघितलं तर असं दिसून येईल की घरात तो किती काम स्वतःहून वाटून घेतो.
खांद्याला खांदा लावुन स्त्री उभी राहते असं हमखास आपण म्हणतो पण घरात तिच्या हाताला हात देऊन तो उभा राहतो का? तर उत्तर ते क्वचितच.! समानता कायद्यासोबतच घरातूनही मिळायला हवी, आपल्या हक्काच्या माणसांकडून मिळायला हवी. समानतेविषयी स्त्री-पुरुषांची भूमिका मांडायची झाल्यास दोघांचीही मानसिकता, समता आणि समानता यात महत्वाची असते.
त्यात जर स्त्रीचा विचार केल्यास जो पर्यंत ती स्वतःला स्वतःची मोकळीक देत नाही तोपर्यंत इतर कोणीच तिच्यावर कितीही उल्लेखनीय कामे केलीत तरी फारसा फरक पडणार नाही.!
जोपर्यंत महिलेची बाजू महिलाच सावरत नाही आणि त्याला पुरुषी विचारांची सकारात्मक जोड मिळत नाही तोपर्यंत खरं समान मुळीच नाहीच आम्ही! स्त्रियाच्या बाबतीत पुरुषाची मदतीची भूमिका महत्वाची असेलच पण त्या सोबतच तिची स्वतःची मानसिकतेची देखील साथ असायला हवी।
अनेक ठिकाणी महिला काम करून पुरुषांना पोसतात, घर चालवतात मुलांचं शिक्षण ते सर्व गरजा पूर्ण करतात. कायद्यानुसार सर्व स्त्री असो किंवा पुरुष सर्वाना आर्थिक आणि निर्णय प्रकियेमध्ये समान अर्थानीच बघितलं जाते. परंतु मुळात जाऊन जर आपण पाहिले तर सरंजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता आणि त्यातून निपजणारी विवेकहीनता बदललेली नाही.
जात, धर्म, राष्ट्र, भाषा आदी पातड्यांवर विभागलेल्या स्त्रियांचं स्त्री म्हणुन होणारं शोषण सारखच असतं, स्त्रियांची व्यक्तिगत गुलामी आणि दुय्यम स्थान हे समाजाच्या पुरुषप्रधान जडणघडणीत आहे म्हणूनच व्यक्तिगत पातळीवर स्त्रियांना जो संघर्ष करावा लागतो तो व्यक्तिगत तर असतोच सोबतच सामाजिक व राजकिय असतो, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक पातडीवरील शोषणा विरुद्धचा संघर्ष महिलांनी केलेच पाहिजेत.
आपल्याला असही बघायला मिळत की सर्व पातळ्यांवर स्त्रियांची सामाजिक जीवनातील भागीदारी वाढली आहे त्याचप्रमाणात अन्यायाची जाणीवही वाढली आहे. स्त्रियांना सहन कराव्या लागणाऱ्या अत्याचाराचे वेगवेगळे पैलू दिसू लागले आहेत आर्थिक क्षेत्रात स्त्रियांचं कामगिरीच मोजमाप झालं पाहिजे, संपत्ती निर्माण करण्यात स्त्रिया पुरुषांच्या पुढे आणि उपभोग घेण्यास सर्वात माघे हे चित्र बदलायला हवं. मी स्वतः एक पुरुषच आहे आणि पुरुषांकडून स्त्रीच्या गुणवत्तेविषयी,तिच्या आदराऐवजी स्त्री-स्वातंत्र्याच्या संतापाने खदखदत असणारी अनेक विधाने ऐकली आहेत. या रोषाचे प्रकटीकरण पुरुषी वर्चस्व जिथे असेल तिथे नक्कीच दिसेल.
आम्हाला असंही बघायला मिळत की, स्त्रियांचं कौतुकही फार थोड्या प्रमाणात होतं. अनेक पुरुषांना पुरुषप्रधानतेचा अहंकार असतो. काही अपवाद आहेतही सर्वांनाच असं म्हणता येणार नाही. महिलांनी स्वतःला कितीही स्वतंत्र समजल तरी पुरुषांच्या तुलनेत काही बंधने असतातच असं करायचं नाही, तसं करायचं नाही, 7 च्या आत घरात हि बंधने प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला आलीच असेल, हवं असूनही मनासारखं ती वागू शकत नसेल तर मग आम्ही समानता म्हणुन मिरवण्यात काही फायदा नाही समानता म्हणजे नेमकं काय तर समानता म्हणजे स्पर्धात्मक बरोबरी अजिबातच नाही तर घरातील आर्थिक, सामाजिक,सांस्कृतिक व कौटुंबिक निर्णय जे आतापर्यंत फक्त पुरुष घेत होता त्या सर्व निर्णयांमध्ये स्त्रीचा सहभाग असणे असे म्हणता येईल. महिलांनी स्वतःपासूनच सुरुवात करायला हवी. पुरुषांनी केलेल्या विविध अन्याय व अत्याचारांपुढे ती मान झुकवित असते. मुलांना जन्म देणारी व घडवनारी हि महिलाच असते. तिने ठरविले तर पुरुषी वर्चस्वाची मानसिकता ती आपल्या कुटुंबात बदलू शकते, मात्र त्यासाठी स्वतःच्या मनातूनही पुरुषी वर्चस्वाची मानसिकता पुसून टाकायला हवी.
तसेच महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने सर्व कामे केलीत त्यांच्यासारखे कपडे वापरलेत म्हणजे समानता येत नाही. स्त्रीच्या कर्तृत्वावरही त्यांनी विश्वास दाखविला गेला पाहिजे. स्त्रियांनीही स्वतःची बौद्धिक क्षमता वाढवली पाहिजे. प्रत्येक होणाऱ्या घटनेविरुद्ध मेणबत्त्या पेटविल्या जाते, पण फरक काहीच पडताना दिसत नाही आणि प्रत्येक पीडितेला न्याय मिळतोच असेही नाही. खैरलांजी, प्रियांका, मनीषा ही उदाहरणे डोळ्यासमोर आहेतच.!
पुरुषी वर्चस्व कमी करायचं असेल तर आपली मूल्ये, संस्कार मुलांमध्ये रुजवले गेले पाहिजेत. आपल्या मुलांचा सबंध शाळा आणि समाज याच्याशी सुद्धा येत असतो. तिथे मुलांवर लोकशाहीनिष्ठ संस्कार केले जातात. स्वाभिमान, देशाभिमान, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशीलता इत्यादी मूल्यांची जोपासना फक्त शाळेत न होता ती समाजातून सुद्धा झाली पाहिजे. महाराष्ट्रातील नव्हे तर इतर राज्यातही गावागावांत महिला व मुलींच्या न्याय्य हक्कांसाठी जनजागृती अभियानासारखे कार्यक्रम राबविले गेले पाहिजेत सोबतच मुलांनाही विविध उपक्रमातून महिलांप्रति सन्मानाची भावना आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार वाढीस लागण्यासाठी प्रयत्न कले गेले पाहिजेत,ज्या प्रमाणे किशोरवयीन मुलींच्या कार्यशाळा घेतल्या जातात त्याच प्रमाणे किशोरवयीन मुलांचे सुद्धा कार्यशाळा घेण्यास सुरुवात व्हायला हवी. याकामी ग्रामविकास विभागानेसुद्धा पुढाकार घ्यावा.
ग्रामविकास विभागाच्या वतीनेसुद्धा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत लोकांचा सहभाग वाढेल असं काहीतरी करन्यात यावे. ‘ग्रामीण भागाच्या विकास प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढायला हवा व त्यासाठी प्रत्येक पुरुषांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. महिला व मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, त्यांना सामाजिक हक्क मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. ग्रामविकास विभागाने यासाठी ठोस कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहेत. ग्रामीण विकासासाठी झालेल्या सामंजस्य करारांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे लक्ष दिले गेले पाहिजे. खऱ्या अर्थाने स्त्रीने पुरुषाला आणि पुरुषाने स्त्रीला समजुन घेतले पाहिजे. प्रत्येकाला समान जीवन जगण्याचा अधिकार आहे हे लक्षात घेऊन त्या परीने कार्य केले गेले पाहिजे.. अहंकार अहंपना बाजूला सारून एक मनुष्य म्हणुन एकमेकांकडे बघितले गेले पाहिजे. माणूसपण जपले पाहिजे.! प्रत्येक वाट्यात समान अधिकार एकमेकांना असले पाहिजेत, वैचारिक परिपक्वता अंगी बाळगुन आपुलकीचं बीज पेरलं पाहिजे.. कुठलीही स्त्री असली तरी तिच्या रक्षणाची जबाबदारी आपली असेल ही भूमिका तयार व्हायला हवी,कुठलाही भेदभाव न करता महिला आणि पुरुष दोघांनीही एकमेकांना प्रत्येक क्षेत्रात समानतेची वागणूक दिली गेली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समानता येईल.
● कपिल नंदा बबनराव राऊत
(कवी/लेखक/चित्रकार/समुपदेशक/सोशलवर्कर/SET/फिल्ड ऑफिसर-NHSC ELDER LINE project)
जिल्हा वर्धा) मो.9960770970