सोलापूर विभागातील 130 एसटी कर्मचाऱ्यांच्या आज बदल्या
सांगोल्यात निलंबित कर्मचाऱ्यांचाही बदल्यांत समावेश
सांगोला : नाना हालंगडे
एसटी कामगारांच्या बदल्यांचे सत्र गेली तीन दिवसांपासून सुरूच आहे. सोलापूर विभागात पहिल्या दिवशी 51 कामगारांच्या जिल्हांतर्गत बदल्या, दुसऱ्या दिवशी 44 जणांच्या, तर मंगळवार, 7 डिसेंबर रोजी 130 जणांच्या बदल्या केल्या.
विशेष म्हणजे यात ज्या कामगारांचे निलंबन केले होते अशा या सांगोला आगारातील 25 कामगारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी हे निलंबित कामगारांच्या बदल्या कशा करतात, याला कोणता नियम आहे हा संशोधनाचा विषय आहे. अशा या सर्व गोष्टी घडत असल्या तरी कामगार हे आपल्या कामबंद आंदोलनावर ठाम आहेत.
राज्यात एसटी कामगारांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. हे आंदोलन सरकारकडून चिरडण्याचा जोरदार प्रयत्न होताना दिसत आहे. जुमानत नसलेल्या कामगारांचे निलंबन, बदल्या केल्या जात आहेत. असे असले तरी आर या पारची लढाई समजून सर्व कामगार एकजुटीने आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आज मंगळवार 7 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता सांगोला आगारातील 200 कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शपथा घेत हा संप अजून 20 डिसेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे असे घोषित केले. कोणीही कामावर यायचे नाही.
कामगार एकजुतीचा विजय असो, असाच नारा दिला. त्यामुळे सरकारकडून उपसण्यात आलेले बदली किंवा निलंबन अस्त्र निष्प्रभ ठरताना दिसत आहे.