सोलापूर विद्यापीठात ‘ग्रामीण विकास’ अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
विद्यार्थ्यांना करिअरची विस्तीर्ण क्षीतिजे खुली
सोलापूर (विशेष प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सामाजिक शास्त्रे संकुलामध्ये ग्रामीण विकास या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी दिली.
कोणत्याही शाखेच्या पदवीनंतर ग्रामीण विकास अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो. एक वेगळे व हटके करिअर ग्रामीण विकास क्षेत्रात करण्याची संधी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली आहे. संशोधनाबरोबरच शासकीय-निमशासकीय क्षेत्रामध्ये नोकरीची संधी यामुळे प्राप्त होऊ शकते. केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयात चांगल्या पदावर नोकरी करण्याची संधी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्राप्त होत असते. विद्यापीठातील अनेक विद्यार्थी याचा लाभ घेतलेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड या क्षेत्रातही विशेष कार्य करण्याची संधी ग्रामीण विकास अभ्यासक्रम केल्यानंतर प्राप्त होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, विमाक्षेत्र, स्पर्धा परीक्षा, त्याचबरोबर अशासकीय संघटना यामध्ये देखील एक वेगळे करिअर करता येते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून ग्रामीण विकास अभ्यासक्रमासाठी सध्या ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुन विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रा. चेतन मोरे (9970774488) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने नेहमीच विद्यार्थी केंद्रस्थानी मानून काही महत्त्वपूर्ण कोर्सेस सुरु केलेले आहेत. त्या कोर्सेसना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. त्या कोर्सपैकी विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलांतर्गत ‘रूरल डेव्हलपमेंट’ हा एक महत्त्वपूर्ण कोर्स सुरू आहे. या कोर्सला कोणत्याही शाखेचा पदवी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो.
ग्रामीण विकास मंत्रालय (केंद्र व राज्य)
राष्ट्रीय पातळीवर व प्रत्येक राज्यात स्वतंत्रपणे ग्रामीण विकास मंत्रालय कार्यरत असल्याचे दिसून येते. या मंत्रालयात अनेक वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी कार्यरत असतात. त्याचबरोबर या मंत्रालयाला ग्रामीण विकासातील तज्ज्ञ व जाणकार लोकांची सदैव गरज असते. त्यासाठी रुरल डेव्हलपमेंट (ग्रामीण विकास) हा कोर्स केल्यास ग्रामीण विकास मंत्रालयात चांगली नोकरी मिळण्याची शाश्वती आहे. त्याशिवाय ग्रामीण विकास मंत्रालयात कार्यरत असताना त्या व्यक्तींना ग्रामीण विकासाशी संबंधित मोठे प्रकल्प सहजपणे राबवता येतात. ज्या विद्यार्थ्यांना ग्रामीण विकास मंत्रालयात काम करावयाचे आहे त्यांनी रूरल डेव्हलपमेंट हा कोर्स पूर्ण करून आपले करियर करता येईल.
राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)
देशात शेती व ग्रामीण विकास या दोन्ही क्षेत्रांना सर्वाधिक महत्त्व आहे. त्या दोन क्षेत्रांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. यासाठी 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. नाबार्ड ही राष्ट्रीय पातळीवरून प्रत्येक राज्यातील राज्य सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करते. तसेच प्रत्येक राज्यातील राज्य सहकारी बँक ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्जपुरवठा करते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या तालुका पातळीवरील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करतात. या सर्वच शासकीय यंत्रणेमध्ये ग्रामीण विकासातील सल्लागाराची गरज असते. त्यात ग्रामीण विकासात्मक कार्यक्रम राबवले जातात. हे कार्यक्रम अधिक परिणामकारकपणे राबवण्यासाठी ग्रामीण विकासातील तज्ज्ञांची गरज आहे. त्यासाठी रूरल डेव्हलपमेंट कोर्स केल्यास नाबार्डमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यरत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत ग्रामीण विकासासाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात. हे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी शासकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज असते. बर्याचवेळा ग्रामीण विकासाचा संबंध नसलेल्या व्यक्ती या यंत्रणेवर कार्यरत असतात. परंतु, रुरल डेव्हलपमेंट हा कोर्स केल्यास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनेवर काम करण्याची संधी मिळू शकते.
विमाक्षेत्र
सध्या विमाक्षेत्र हे अतिशय झपाट्याने विस्तारत आहे. ग्रामीण भागातील लोकांना बचतीच्या सवयी लावण्यासाठी अलीकडे विमा कंपन्या ग्रामीण भागात सक्रिय झाल्या आहेत. या विमा कंपनीमध्ये अनेक ग्रामीण विकास अधिकारी व ग्रामीण विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. या पदांवर कार्य करण्यासाठी रूरल डेव्हलपमेंट हा कोर्स केल्यास विमा कंपनीमध्ये वरील पदावर काम करण्याची संधी मिळते.
स्पर्धा परीक्षा
प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषत: एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. सारख्या स्पर्धा परीक्षेत पंचायत राज्य व नागरिकशास्त्र यावर आधारित अनेक प्रश्न विचारलेले असतात. त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास रूरल डेव्हलपमेंट या कोर्समध्ये पुर्ण होतो. त्या अर्थानेही हा कोर्स महत्त्वपूर्ण आहे.
अशासकीय संघटना (एनजीओ)
आज देशात व महाराष्ट्र राज्यातही अनेक अशासकीय संघटना (एनजीओ) कार्यरत आहेत. यामध्ये फोर्ड फाऊंडेशन, CAPART, CIDA, NIRD आधी संघटनांचा उल्लेख करता येईल. या सर्व संघटना ग्रामीण विकासासाठी अधिक कार्यशील आहेत. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या संघटनांमध्ये संशोधन सहाय्यक, संशोधन अधिकारी या पदांकरिता तज्ज्ञ व्यक्तींची गरज असते. यासाठी रुरल डेव्हलपमेंट हा कोर्स पूर्ण केल्यास वरील पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते. वरील संधीशिवाय प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये सुद्धा नोकरी मिळवता येणे शक्य आहे. त्याशिवाय अध्यापनाच्या कामात ज्यांची इच्छा असेल त्यांना अध्यापनातही आपले करिअर करता येईल.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी प्रा. चेतन मोरे (9970774488) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलामध्ये रूरल डेव्हलपमेंट हा कोर्स शिकवला जातो. स्वत:चे करिअर घडविण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, असे आवाहन सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी केले आहे.