सोलापूर महापालिकेला करावी लागेल प्रयत्नांची शिकस्त

पत्रकार प्रशांत जोशी यांचा सणसणीत लेख

Spread the love

“सोलापूर शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या आणि होणारे मृत्यू रोखण्यात सोलापूर महापालिकेला अपयश आल्याचे दिसून येत आहे. कोरोनाने दगावलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शेकडो रुग्ण वेगवेगळ्या हाॅस्पिटलमध्ये स्वत:चा प्राण वाचावा म्हणून तडफडत आहेत. अनेक डॉक्टर आणि परिचारिका या कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. अतिशय कठीण काळ असून सारेच हतबल झाले आहेत. अशा स्थितीत लोकांचे जीव वाचवण्यासाठी महापालिकेला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.”

• राजकारणाचा संसर्ग, लोकप्रतिनिधी ‘क्वारंटाईन’
चालू महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढली, त्यामुळे महापालिकेच्या मर्यादा उघड्या पडल्या. ठराविक अधिकारी आणि कर्मचारी सोडले तर प्रशासन हाताची घडी घालून काम करत आहे. प्रशासनाला कोरोनापेक्षा भयंकर अशा ‘राजकारण विषाणू’चा संसर्ग झाला आहे. वरिष्ठ विरुद्ध कनिष्ठ असा संघर्ष चालू आहे. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. हाताच्या बोटावर मोजावे इतकेच नगरसेवक आपल्या प्रभागात रुग्णसेवा (जनसेवा हीच इशसेवा) करीत आहेत. निवडणुकीत मतांसाठी कटोरा घेऊन दारोदारी फिरणारे लोकप्रतिनिधी कोरोनाला घाबरून बिळात बसले आहेत. ही सोलापूर शहराची आजची स्थिती आहे.

• दवाखान्यांची ‘इम्युनिटी’ वाढवा
गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. महापालिकेचे ३२ दवाखाने आहेत. परंतु, या सर्व दवाखान्यांची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच आहे. ना आॅक्सीजनची सोय आहे ना व्हेंटिलेटरची सुविधा. गंभीर आजाराच्या रुग्णांवर एकाही दवाखान्यात उपचार होऊ शकत नाही. बाह्यरुग्ण विभाग रुग्णांना उपचार देण्यासाठी की डॉक्टरांचे कल्याण करण्यासाठी असा प्रश्न पडतो. अडगळीत पडलेल्या या दवाखान्यात सुधारणा करावी, असे ना प्रशासनाला वाटते ना नगरसेवकांना. सर्वांचा ‘इंटरेस्ट’ फक्त खरेदीत. औषध खरेदी आणि वैद्यकीय साहित्य खरेदीवर प्रत्येकाची नजर. पंतप्रधान निधीतून फुकटात मिळालेल्या व्हेंटिलेटरवरची धूळ झटकावी, असे कोरोनासारख्या संकटातही कुणाला वाटले नाही, याचेच आश्चर्य वाटते!

• कर्तीधर्ती माणसं गमावली
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मधला काही काळ सोडला तर या आजाराने सोलापूरकरांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. अनेकांच्या घरातली कर्तीधर्ती माणसं कोरोनामुळे दगावली आहेत. कित्येक कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शोक करायलाही डोळ्यांत अश्रू उरले नाहीत, इतकी भयानक आपत्ती अनेकांच्या नशीबी आली आहे. लोकांच्या मनात भितीने घर केले आहे. जो तो भेदरला आहे, मरणाच्या भितीने कोसळला आहे. अशा खचलेल्या माणसांना सावरण्यात महापालिका अपयशी ठरली आहे.

• विदारक चित्र
कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक जीवघेणी आहे. प्राणवायूअभावी अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. बायपँपची कमतरता आहे. अतिदक्षता विभागातील खाटा मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. खिशात पैसा असूनही उपचार मिळत नाही. रुग्णालयाचा परिसर चिंता, ताणतणाव आणि भयाने व्यापून गेला आहे. आत रुग्ण व्हेंटिलेटरवर आणि बाहेर नातेवाईक आॅक्सीजनवर असे विदारक चित्र प्रत्येक ठिकाणी पहायला मिळत आहे. जगण्यासाठी रुग्णालयात खाटा नाहीत आणि मृत्युनंतर अंत्यसंस्काराला स्मशानात जागा नाही. अशावेळीदेखील काही जणांची ‘दुकानदारी’ चालू आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे.

• पूर्ण ताकदीने व्हावा कोरोनाशी मुकाबला
शहरावर कोरोनाचे इतके मोठे संकट असताना महापालिका चिरनिद्रेत आहे. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट नवीन होते. सारेच गोंधळून गेले होते. वैद्यकीय क्षेत्रातील काही मंडळींचा असहकार होता. कोरोनाच्या भितीमुळे त्यांनी काही दिवस शस्रे खाली ठेवली होती. काही डॉक्टर मात्र कोरोना योध्दे बनून पहिल्या दिवसापासून मैदानावर उतरले होते. त्यांच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा राहिला. हातात हात घालून या योध्द्यांनी कोरोनाविरुध्द यशस्वी लढा दिला. त्यामुळे पहिली लाट सहजपणे परतावून लावता आली. आज चित्र बदलले आहे. कोरोनाने अक्राळविक्राळ रुप धारण केले आहे. तो नरसंहारक बनून आला आहे. त्याला रोखण्याचे कठीण आव्हान आपल्यासमोर आहे. अशावेळी महापालिकेने अधिक सजग आणि सक्रिय होऊन कोरोनाविरुध्द मैदानात उतरले पाहिजे.

• महापालिकेचे कर्तव्य
शहरातील लोक प्राणाणिकपणे कर भरतात. त्यांना आरोग्य सुविधा देणे हे महापालिकेने कर्तव्य आहे. कोरोना रुग्णांना योग्य आणि चांगले उपचार मिळावेत यासाठी तिजोरीचा विचार न करता प्रशासनाने आपली जबाबदारी निभावून नेली पाहिजे. रुग्णाचा पाॅझिटिव्ह रिपोर्ट आला की त्याला आणि नातेवाईकांना क्वारंटाइन सेंटरमध्ये (कोंबड्यांना खुराड्यात कोंबतात त्याप्रमाणे) कोंबून ठेवणे इतकीच महापालिकेची जबाबदारी नाही. रुग्णांच्या शारीरिक आणि मानसिक व्यथा समजून घेऊन त्यांच्या दुख:वर मायेची फुंकर घालण्याचे काम प्रशासनाने केले पाहिजे. रुग्णांना क्वारंटाइन सेंटर म्हणजे तुरुंगवास वाटावा हेच महापालिकेचे अपयश आहे. चार दिवस अंडी आणि तीन दिवस चिकन देऊन रुग्ण बरा होत नाही. त्याच्या आरोग्याच्या तसेच मानसिक गरजांची पूर्तता केली गेली पाहिजे.

• टेस्टींग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट महत्त्वाचेच
कोरोनाला रोखण्यात महापालिकेला अपयश आले याला महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजनाचा भाव. टेस्टींग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट या बाबतीतले नियोजन कागदावरच राहिले. दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरात कोरोनाच्या पुरेशा चाचण्या होत नाहीत. त्यासाठीची यंत्रणा तोकडी आहे. प्रयोगशाळांची संख्या कमी असल्याने चाचणीचा रिपोर्ट वेळेवर मिळत नाही. बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात नाही. होम आयसोलेशनला परवानगी दिली जाते परंतु नियमांचे पालन होते का यावर लक्ष ठेवले जात नाही. लोकांना मास्क लावायला भाग पाडण्यापेक्षा त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात ज्यास्त रस घेतला जातो. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचे सर्व्हेक्षण केवळ नावापुरते आहे. कोरोना लसीकरणाच्या नियोजनाची पुरती वाट लागली आहे. याबाबतीत लंगडे समर्थन करुन प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. अशा पध्दतीने काम केले तर कोरोना आणखी काही महिने जाणार नाही.

• सोलापूरकरहो, लोकसहभागही महत्त्वाचा
कोरोनाविरुध्दच्या लढाईत लोकसहभाग महत्वाचा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील काही मंडळी रुग्णांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. सामाजिक संस्थांनी जबाबदारी घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अशावेळी नियमावर बोट ठेऊन सहभाग नाकारण्याचा करंटेपणा प्रशासनाने करू नये. काही नगरसेवकांनी आपला विकास निधी वैद्यकीय सुविधांची खरेदी करण्यासाठी दिला आहे. या निधीचा योग्य विनियोग झाला पाहिजे. कोरोना रुग्णांना चांगले उपचार उपलब्ध करुन देऊन त्यांना ठणठणीत बरे करण्यातच महापालिका प्रशासनाचे यश आहे. हे काम यशस्वी करण्यासाठी महापालिकेला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे, हे मात्र निश्चित.

– प्रशांत जोशी (ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर)

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका