सोलापूर जिल्ह्यात जनावरांच्या बाजारावरील बंदी हटविली
जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

थिंक टँक / नाना हालंगडे
सोलापूर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांचे बाजार भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. लम्पी चर्मरोगाच्या प्रचंड साथीमुळे आजपर्यंत जनावरांचे बाजार भरविण्यास बंदी होती. मात्र सध्या लंपीची साथ आवाक्यात आल्याने सोलापूर जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारावरील बंदी हटविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
लम्पी चर्मरोगाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्र नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. त्याअन्वये गोजातीय प्रजातीच्या गुरे व म्हशींचा अथवा कोणत्याही जनावरांचा बाजार भरविणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्यांची जत्रा भरविणे , प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करणेत आली होती.

जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार सोलापूर जिल्हा लम्पी चर्मरोगासाठी नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील लम्पी चर्मरोगाचा आढावा घेतल्यानंतर नियंत्रित क्षेत्रात कोणताही प्राणी बाजार भरविणे आणि प्राण्यांच्या शर्यती लावण्यास परवानगी देऊ शकतात असे नमूद केले आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे.
लंम्पीचे संकट टळले
गोवंशीय पशुधनाच्या केवळ ०.११ टक्के एवढी लंम्पी चर्मरोगाची लागण असून दैनंदिन मृतचे प्रमाणदेखील कमी झालेले आहे. आजारी जनावरे औषधोपचाराला प्रतिसाद देत असून रिकव्हरी रेट देखील वाढलेला आहे. सध्या पदाधिकारी व शेतक – यांकडून जनावरांचे बाजार चालू करणेबाबत मागणी वाढलेली असून जनावरांचे बाजार बंद असल्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान व आर्थिक व्यवहार बंद झालेले आहेत. त्यामुळे गोवंशीय जनावरांचे बाजार सुरू करणे आवश्यक आहे, असे आदेशात म्हटले आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मिलिंद शंभरकर यांनी शासन अधिसुचना मधील अटी व शर्तीच्या अधिन राहून सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांना सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये गोवंशीय जनावरांचे बाजार सुरू करणेस परवानगी दिली आहे.
सर्व संबंधित सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती यांना गोवंशीय जनावरांचे बाजार सुरू करण्यास परवानगी देताना खालील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहिल.
१. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्ह्यात अंतर्गत वाहतूक करावयाच्या गुरांचे लम्बी चर्मरोगकरिता किमान २८ दिवसापूर्वी प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे .
२. केवळ लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण व लाळखुरकत प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेली जनावरे बाजारात येणे आवश्यक आहे. त्याकरिता सक्षम पशुवैद्यकिय अधिकारी यांचे लसीकरण केले बाबतचे प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे .
३. गुरांचे वाहतूक करताना आरोग्य दाखला तसेच जनावरांची वाहतूक अधिनियम २००१ मधील नियम क्र . ४७ अन्वये स्वास्थ प्रमाणपत्र सोबत बाळगने आवश्यक राहिल.
४. बाजार परिसर स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्यात आलेला असावा . जनावरांना स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली असावी . दोन जनावरामधील बांधण्याचे अंतर किमान ६ फुट असावे . केवळ निरोगी जनावरांनाच बाजारात प्रवेश देणेत यावा . वरील आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे . सदर आदेशाचे उल्लघंन केल्यास संबंधितां विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५६ , तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २०० ९ मधील तरतूदीन्वये कायदेशीर कारवाई करणेत येईल याची न घ्यावी.