सोलापूर जिल्ह्यात औषधांअभावी पशूधन धोक्यात
जि. प. सदस्य अॅड. सचिन देशमुख यांनी प्रशासनाला धरले धारेवर
सांगोला (विशेष प्रतिनिधी) : एकीकडे कोराेनाचे संकट जीव घेण्यासाठी आ वासून उभे असताना आता त्यात भरीस भर म्हणून शेतकऱ्यांवर पशुधन वाचवण्याचे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पशूसंवर्धन विभागाच्या विविध ठिकाणच्या पशूवैद्यकीय दवाखान्यात औषधांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. अनेक गावात जनावरे मोठ्या प्रमाणात आजारी असल्याने तसेच त्यांना वेळेत उपचार न मिळाल्यास जीव गमवावा लागणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. या गंभीर स्थितीची जि.प. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करत कोळा जि.प. गटाचे सदस्य अॅड. सचिन देशमुख यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. यावर लवकर तोडगा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने पशुधन
जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने पशूधन आहे. विशेषत: सांगोला तालुक्यात संख्या मोठी आहे. हजारो शेतकऱ्यांची उपजीविका यावर आहे. हजारो दुभती जनावरे आहेत. त्याच संख्येत शेती मशागतीसाठी वापर होणारी जनावरे आहेत. सध्या पावसाळी दिवस असल्याने जनावरे आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. अशातच पशुवैद्यकीय दवाखान्यात औषधे उपलब्ध नसल्याने जनावरांवर उपचार होणे मुश्कील बनले आहे.
ही स्थिती का निर्माण झाली?
वास्तविक पाहता जिल्ह्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्याना औषधे तसेच इतर कामासाठी समान निधी दिला जातो. त्या गावात पशुधन मोठे आहे तसेच ज्या गावांत पशुधन अल्प आहे त्या सर्वच गावांना समान निधी दिला जातो. त्यामुळेच ही गफलत होते. ज्या गावांत पशुधन जास्त आहे तेथे वास्तविक पाहता निधी जास्त दिला पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे ही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
- हेही वाचा : सांगोल्यात शेकापला हादरा; बाबा करांडे पक्षाला करणार लाल सलाम
- एकदा सगळे मंत्रिमंडळच ईडीच्या पायावर घाला!
- संपादक संजय आवटे आणि गणपती पूजा
- सांगोला सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पुन्हा पेटणार!
जंतनाशक, गोचीड औषध, कॅल्शियम आदी प्रकारची औषधे कमी पडत आहेत. अनेक दवाखान्यातील औषधसाठा संपला आहे.
सांगोला तालुक्यातही गंभीर स्थिती
सांगोला तालुक्यात २४ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. जंतनाशक, गोचीड औषध, कॅल्शियम आदी प्रकारची औषधे मिळत नसल्याने शेतकरी बांधव हतबल आहेत. पशुगणना नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. याला प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा बेजाबदारपणा कारणीभूत असल्याचे दिसत आहे.
जि.प. ठरावाची अंमलबजावणी व्हावी
प्रत्येक जि.प. गटात जि.प. सदस्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा ठराव जि.प. च्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. त्यानुसार प्रत्येक गटास एक ते दीड लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून जनावरांची तातडीचे औषधे खरेदी करण्याचे नियोजन होते. मात्र या ठरावाची अंमलबजावणी करण्याचा विसर जिल्हा परिषदेला पडला असल्याचे दिसत आहे.