सोलापूर जिल्हा मराठी भाषा समिती सदस्यपदी डॉ. शिवाजी शिंदे यांची निवड
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली समिती
सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
मराठी भाषेचे संवर्धन व त्याबाबत शासकीय नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या सोलापूर जिल्हा मराठी भाषा समितीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सहायक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी, सुप्रसिद्ध कवी डॉ. शिवाजी शिंदे यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम, २०२१ मधील तरतूदींची अंमलबजावणी करण्यासाठी, प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर न करण्यासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करुन निवारण करण्यासाठी तसेच केंद्रिय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, विमा कंपन्या, रेल्वे तसेच अन्य केंद्रिय आस्थापना या सर्व कार्यालयांत मराठी भाषेचा वापर करण्यात येतो किंवा कसे याबाबतच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी व मराठी भाषेसंदर्भातील उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मराठी भाषा समिती स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्हा मराठी भाषा समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीमध्ये जिल्हाधिकारी स्वतः अध्यक्ष तर महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य असतील. या समितीत सुप्रसिध्द साहित्यिक श्रीकांत मोरे, डॉ.राजशेखर शिंदे, डॉ.दत्ता घोलप हे सदस्य म्हणून तर पदनिर्देशित मराठी भाषा अधिकारी हे सदस्य सचिव असणार आहेत.
या निवडीबद्दल विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी डॉ. शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. शिंदे यांचा “कैवार” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. या काव्यसंग्रहास राज्यातील नामवंत संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.