सोलापूरसह जिल्ह्यातील शाळांमध्ये सोमवारी घंटा खणानणार
पालक, विद्यार्थी व शिक्षकांत उत्साहाचे वातावरण
सांगोला/ एच. नाना
मागील तब्बल दीड वर्षांपासून कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तब्बल 1 हजार 830 शाळा सुरू होणार असून सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 53 तर खाजगी 93 अशा एकूण 146 शाळांना सोमवारपासून सुरुवात होणार आहे. इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू होतील. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोलापूर शहरातीलही शाळा सोमवारी सुरू होत आहेत.
कोरोना महामारीमुळे 17मार्च 2019 पासून शाळा बंद होत्या. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण नव्हते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसताच पुन्हा एकदा शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार सोमवारपासून या शाळा सुरू होत आहेत. सांगोला तालुक्यात एकूण 520 शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या 389 तर खाजगी 131 अशा या शाळा आहेत . त्यापैकी पाचवी ते बारावी पर्यंतच्या 146 शाळा सोमवारी सुरू होत आहेत . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वच्छ शाळा सुंदर शाळा ही मोहीम राबवली होती . या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील बहुसंख्य शाळातील शिक्षकांनी आपापल्या शाळा स्वच्छ व सुंदर केल्या आहेत… त्यातच सोमवारी शाळा सुरू होणार असल्याने शाळांचे रुपडे पालटुन या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा गजबजाट वाढणार आहे.
स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचे मूल्यमापन 30 सप्टेंबर व एक ऑक्टोबर रोजी पार पडले. त्यामधून एकूण तीन क्रमांक काढले जाणार आहेत . ते लवकरच जाहीर केले जातील . शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील तब्बल दहा हजार शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले . ज्या ज्या शाळांमध्ये वर्ग सुरू करण्यात येणार आहेत तेथे हेल्थ क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे . असे असले तरी अद्याप पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही .
शहरातील इ.८-१२ वी चे वर्ग सोमवारपासून सुरू
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग असलेल्या शाळा दिनांक ४ ऑक्टोबर पासून सुरू करण्यासाठी आयुक्त,सोलापूर महानगरपालिका श्री पि.शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे.त्यानुसार शहरातील जवळपास १५५ शाळा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून अध्यापनाचे काम सुरू करणार आहेत.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर मागील अनेक महिन्यांपासून सोलापूर शहरातील शाळा या बंद होत्या.सद्यस्थितीत कोविड-१९ चा शहरातील प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आजपासून सर्व शाळा सुरू होत आहेत.शाळांनी पूर्वतयारी कशाप्रकारे केली आहे,याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन पाहणी केली आहे.त्याचबरोबर उद्यापासून शाळा भेटी करून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे किंवा कसे याबाबतची पाहणी ही विविध पथकांच्या द्वारे केली जाणार आहे. त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना शासन आदेशाप्रमाणे कोणत्या मार्गदर्शक सूचनांची कार्यवाही करणे अपेक्षित आहे याबद्दल ही मार्गदर्शन आणि मदत केली जाणार आहे.
सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील सन्माननीय लोकप्रतिनिधी तसेच इतर विभागाचे अधिकारी यांनीही शाळांना भेटी देऊन शाळांनी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
- हेही वाचा : काय सांगता? सोलापूरातून जाणार 50 हजार कोटींचा महामार्ग
- यंदा नवरात्रोत्सव फक्त आठ दिवसांचा