सोलापूरला वगळून सहा जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक
१० डिसेंबर रोजी होणार मतदान
सांगोला/नाना हालंगडे निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानपरिषदेच्या आठपैकी सहा जागांसाठी (सोलापूर व अहमदनगर वगळून) निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ रोजी विधानपरिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत जरी असला, तरी सहा जागांसाठीच निवडणूक होत आहे.
ज्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामध्ये शिवसेनेची रामदास कदम यांची मुंबईतील जागा, काँग्रेसची भाई जगताप यांची मुंबईतील जागा आणि सतेज पाटील यांची कोल्हापूरमधील जागा. तसेच, भाजपाची धुळे-नंदुरबार येथील अमरीश पटेल यांची जागा व नागपूर मधील गिरीश व्यास यांची जागा याचबरोबर शिवसेनेची अकोला-बुढाणा-वाशीम येथील गोपीकिशन बाजोरिया यांच्या जागेचा समावेश आहे. तर, सोलापूर व अहमदनगर येथील जागेसाठी निवडणूक होणार नाही.
अधिसूचना जाहीर – १६ नोव्हेंबर, अर्ज दाखल करण्याची तारीख – २३ नोव्हेंबर, अर्जाची छाननी – २४ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २६ नोव्हेंबर, मतदान – १० डिसेंबर, मतमोजणी १४ डिसेंबर.