सोलापूरच्या सहायक पोलिस आयुक्तांचा व्यायाम करताना मृत्यू
सहा.पो. आयुक्त सुहास भोसले, जिममध्येच आला हृदयविकाराचा झटका
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : सोलापूर पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त सुहास भोसले (वय ५६) यांचा जीममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येवून मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही घटना घडली.
पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त सुहास भोसले हे आज सकाळी जिममध्ये व्यायाम करीत होते. ते सुरुवातीला चक्कर येऊन पडले. त्यानंतर त्यांनी जिम चालू ठेवली आणि दुसऱ्यांदा अटॅक आला. त्यावेळी जिम ट्रेनर यांनी त्यांना थोडा छातीला पंपिंग करण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी सर्वांना एकत्रित करून त्यांना गाडीमध्ये बसवून हॉस्पिटलला पाठवले होते. परंतु त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
एका चांगल्या अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस प्रशासनाला धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुहास भोसले हे डिव्हिजन क्रमांक एक याठिकाणी विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. जेलरोड पोलीस ठाण्यात हे कार्यालय आहे. 1 एप्रिल 2021 रोजी ते अमरावतीहून सोलापूरात जॉईन झाले होते. मृत्यू समयी त्यांचे वय 56 असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची माहिती कळताच हॉस्पिटलमध्ये पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी गर्दी केली होती.