सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी हरीश बैजल
अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली
सोलापूर : सोलापूरच्या पोलिस आयुक्तपदी हरीश बैजल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैजल हे सायबर विभागाचे पोलिस उप महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते. ते सायकलप्रेमी आहेत. नाशिक ते पंढरपूर वारी देखील सायकलवर केली आहे असे समजते. कर्तव्यकठोर अधिकारी, श्री विठ्ठलाचे निस्सीम भक्त अशी त्यांची ओळख आहे.
सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे. अंकुश शिंदे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा मुंबई या ठिकाणी पदोन्नती मिळाली आहे.
अंकुश शिंदे यांना काही दिवस सोलापुरात थांबावे लागले होते. दरम्यानच्या काळात राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर हा विषय काढला असता त्यांनी येणाऱ्या पंधरा दिवसात नव्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती होईल अशी माहिती दिली. त्यानुसार शुक्रवारी सोलापूरसाठी नवे पोलिस आयुक्त म्हणून हरीश बैजल यांची नियुक्ती झाली आहे.
सोलापूर शहरातील गुन्हेगारी, अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.