सोलापूरकडे जाणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसवर दरोडा
चोरट्यांच्या हल्ल्यात एकजण जखमी
पुणे : कोणार्क एक्सप्रेसवर तिघा चोरट्यांनी दरोडा टाकून दोघा महिलांच्या गळ्यातील सव्वा लाखांचे मंगळसुत्र व साखळी हिसकावून नेली. बहिणीची सोनसाखळी चोरणार्या या चोरट्यांना पकडण्यासाठी खाली उतरलेल्या एका निवृत्त रेल्वे कर्मचार्याचा मुलगा चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झाला. ही घटना पुणे दौंड रेल्वेमार्गावरील नानविज फाट्याजवळ रात्री पावणे नऊ वाजता घडली. रेल्वे सिग्नलच्या वायरी कट केल्याने सिग्नल न मिळाल्याने थांबलेल्या रेल्वेवर हा प्रसंग गुदरला.
विनायक श्रीराम (वय २७, रा. सोलापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कोणार्क एक्सप्रेस रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवरुन सुटली. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ती दौंड रेल्वे स्टेशनच्या आऊटला असलेल्या नानविज फाटा येथे आली. चोरट्यांनी सिग्नलच्या वायरी कट केल्याने तिला सिग्नल मिळाला नव्हता.
गाडी थांबल्याचे पाहून तिघे चोरटे पुढे आले. त्यांनी महिलेल्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र हिसकावले. दरवाज्यात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली. बहिणीची चैन हिसकाविल्याचे पाहिल्यावर विनायक श्रीराम यांनी चोरट्याचा पाठलाग करायला सुरुवात केली. चोरट्यांनी रेल्वमार्गावरील दगड उचलून त्यांना मारले. चोरटे अंधारात पळून गेले.
सहायक पोलीस निरीक्षक युवराज कलबुर्गी तपास करीत आहेत.