सोलापुरात धावणार इलेक्ट्रिक घंटागाड्या

प्रिसिजन कंपनीचा महापालिकेसोबत करार

Spread the love

घंटागाड्यांचे रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा वार्षिक साडेसहा कोटी रुपये इतका खर्च वाचेल आणि जवळपास १८०० टन कार्बन डायऑकसाईडचे होणारे उत्सर्जन वाचेल. शिवाय, रहिवाशी क्षेत्रात होणार आवाजाचा स्तरही लक्षणीयरित्या कमी होईल.

सोलापूर : थिंक टँक न्यूज नेटवर्क
स्मार्ट सोलापुरात सोलापूर महापालिकाही स्मार्ट बनत आहे. महापालिकेच्या मालकीच्या सर्व घंटागाड्या आता इलेक्ट्रिक घंटागाड्यात रुपांतरीत होणार आहेत. याबाबत प्रिसिजन कंपनी व महापालिकेत नुकताच एक करार करण्यात आला.

प्रिसिजन कंपनीची इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये गरुडझेप
प्रिसिजनच्या १०० टक्के मालकीची नेदरलँड येथील सबसिडरी कंपनी “इमॉस” ही एक वैशिष्ठ्यपूर्ण व्यवसाय करते आहे. ज्यात ट्रक, बसेस आणि मिलिटरी वाहनांसाठी इलेक्ट्रिक पॉवरट्रेन्सचे डिझाईन, विकास, आणि उत्पादन करून पुरवठा करण्याचे काम केले जाते. इमॉस या कंपनीने युरोपात आजवर ६०० हुन अधिक इलेकट्रीक वाहने वितरित केली आहेत. ज्यांनी १५० दशलक्ष किलोमीटर्सपेक्षा अधिक प्रवास केला आहे.


प्रिसिजनने सदरचे तंत्रज्ञान आणि कौशल्य आता भारतात आणून यशस्वीरीत्या एक २३ आसनी संपूर्णतः रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस तयार केली आहे. या पहिल्याच बसच्या ड्राइव्हलाईनमध्ये जवळपास ६० टक्के भारतीय बनावटीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. ARAI ने देखील याची चाचणी घेऊन प्रमाणित केली आहे.

महापालिकेच्या २५० घंटागाड्या बनणार इलेक्ट्रिक
सोलापूर महानगर पालिकेकडे संपूर्ण शहरातील कचरा एकत्रित करण्यासाठी जवळपास २५० घंटागाड्या आहेत. (लाईट कमर्शियल व्हेइकल्स) या २५० घंटागाडयांना १०० टक्के इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचा “सोमपा”चा मानस आहे. शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि प्रिसिजन यांच्या आज रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार प्रिसिजनने वर्ष २०२२ अखेरपर्यंत तीन नवीन रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक लाईट कमर्शियल व्हेईकल व्हेइकल्स मोफत बनवून द्याव्यात. ज्याचा वापर महापालिका घंटागाड्यांसाठी करेल. या गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी प्रिसिजनने आवश्यक ती सेवा द्यायची आहे. या तीन गाड्यांच्या यशस्वी चाचणीनंतर महापालिकेच्या ताफ्यातील घंटागाड्यांचे संपूर्णतः इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी महापालिका ई – टेंडरिंग प्रक्रिया पूर्ण करेल.

वार्षिक साडेसहा कोटी रुपये इतका खर्च वाचेल
सोलापूर महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार या घंटागाड्यांचे रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा वार्षिक साडेसहा कोटी रुपये इतका खर्च वाचेल आणि जवळपास १८०० टन कार्बन डायऑकसाईडचे होणारे उत्सर्जन वाचेल. शिवाय, रहिवाशी क्षेत्रात होणार आवाजाचा स्तरही लक्षणीयरित्या कमी होईल. या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी आवश्यक असणारी सुविधा आणि गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर्स आणि बाकी मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्याची महापालिकेने जबाबदारी घेतली आहे.

प्रिसिजन आणि महानगरपालिका यांच्यात करार
या गाड्यांच्या विकासासाठी प्रिसिजन आणि सोलापूर महानगरपालिका यांनी एकत्रितपणे परस्पर सहकार्याने कार्य करण्याचा निश्चय केला आहे. या करारावर स्वाक्षरी करण्याच्या प्रसंगी सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीमती श्रीकांचना यन्नम आणि महापालिकेचे आयुक्त श्री पी शिवशंकर, महापालिका सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार व अन्य अधिकारी तसेच अमोलबापू शिंदे, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे आदी पदाधिकारी आणि प्रिसिजनच्या वतीने चेअरमन यतिन शहा, पूर्णवेळ संचालक करण शहा आदी उपस्थित होते.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका