सोलापुरात चार टप्प्यात दिली जाणार कोरोनाची लस

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती

Spread the love

सोलापूर, दि.9 : जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी झाली असून ही लस प्रथम शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना देण्यात येणार आहे. लसीकरणामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनचे कर्मचारी, शहर व ग्रामीण पोलिस,  50 वर्षांवरील नागरिक आणि कोमॉर्बिड रूग्ण असे चार टप्पे केल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली. पहिल्या टप्प्यात 30 हजार 284 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे.

कोरोना लसीकरणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मोहन शेगर, लस व शीत साखळी व्यवस्थापक डॉ. गजानन जाधव, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल नवले, धर्मगुरू काझी अमजद अली यांच्यासह समाज कल्याण, कामगार कल्याणचे प्रतिनिधी, एनसीसी कमांडर, नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी, माध्यमिक आणि प्राथमिकचे शिक्षणाधिकारी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, आयएमए प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत लसीकरणाबाबत नियोजन आणि आराखड्याची माहिती डॉ. जाधव यांनी दिली. श्री. शंभरकर म्हणाले, कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण आणि औषधाशिवाय पर्याय नाही. समाजामध्ये लसीकरणाबाबत जागरूकता आणण्यासाठी सर्व क्षेत्रातील व्यक्तींना बैठकीसाठी बोलावण्यात येणार आहे. लसीकरणाचा आराखडा आणि नियोजन अचूक होण्यासाठी प्रयत्न करावेत. लस देण्यासाठी डाटा फिडिंगच्या कामाला गती देऊन त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. सर्व नियोजन 16 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

जिल्ह्यात 300 बुथचे नियोजन करून आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली असेल तरच त्यांना लस मिळेल. शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा डाटा अचूकपणे द्यावा. श्री. शंभरकर यांनी लसीकरणासाठी लागणाऱ्या कोल्ड चैनविषयी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. लसीकरणावेळी सुरक्षेसाठी पोलीस, एनसीसी यांची सुरक्षा घेता येईल, यावर चर्चा झाली.

जागतिक आरोग्य संघटनेचे सोलापूरचे सल्लागार डॉ. अमोल गायकवाड यांनी सादरीकरणाद्वारे लसीकरणाच्या तयारीची माहिती दिली. पुढील आठवड्यात जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लसीकरणाबाबत प्रशिक्षण होणार आहे. तसेच जे प्रत्यक्ष लस देणार आहेत, त्यांचे 18 डिसेंबरला प्रशिक्षण होणार असून एका बुथवर 100 जणांनाच लस दिली जाईल. याठिकाणी विविध पाच प्रकारचे सदस्य असणार आहेत. लसीकरणादिवशी गर्दी, गोंधळ होऊ नये, यासाठी ज्यांना लस दिली जाणार आहे, त्यांना लसीकरणाचा दिवस एसएमएसद्वारे दिला जाणार आहे. लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला अर्धा तास वेटिंग रूममध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी असे 5994 आरोग्य संस्था आहेत. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, जिल्हा रूग्णालये, अंगणवाडी कर्मचारी, खाजगी दवाखान्यांचा समावेश आहे. लस देण्यासाठी नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचारी 30 हजार 184 अशी आहे. कोल्ड चैनमध्ये आयएलआर-145 आणि डीप फ्रिजींग 201 सध्या उपलब्ध आहेत. व्हॅसिन स्टोरेजची कपॅसिटी 25 लाख 11 हजार ते 29 लाख 30 हजार इतकी आहे. कृषी विभागाचीही यासाठी मदत घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांनी दिली.

यावेळी डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांनी पोलिओ लसीकरणाबाबत माहिती दिली. 17 जानेवारीला पोलिओची लस 3 लाख 44 हजार पाच वर्षाच्या आतील बालकांना दिली जाणार आहे. यासाठी 2449 लसीकरण केंद्र, 338 टीम तयार करण्यात आल्या आहेत.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका