
थिंक टँक / नाना हालंगडे
सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲड. उत्तमभय्या नवघरे यांना शासकीय विश्रामगृहावर बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून शिवसेनेचे ज्येष्ठ नेत्यांकडून ही मारहाण झाल्याचा आरोप नवघरे यांच्या पुतण्याने माध्यमासमोर केला असून सिव्हील हॉस्पिटल मधील पोलीस चौकीच्या एमएलसीमध्ये या नेत्याचे नाव घेण्यात आलं आहे. जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तम नवघरे यांच्यावर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशिक नवघरे यांनी त्यांना उपचारासाठी दाखल केले असून ते सध्या बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमधील पोलीस चौकीतील एम एल सीमध्ये अशी नोंद आहे की, उत्तम दिगंबर नवघरे (वय 54, रा.आदर्श नगर सोलापूर) यांना 28 नोव्हेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर जमिनीच्या वादातून प्रकाश वानकर व इतर दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने छातीस, कमरेस व मानेवर मुका मार लागला असून सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी उपचारासाठी प्रशिक नवघरे यांनी दाखल केले आहे. पेशंट बेशुद्ध अवस्थेत आहे.
उत्तम नवघरे हे सोलापूरातील सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते आणि वकील आहेत. त्यानी विविध सामाजिक आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. सध्या ते सोलापूर जिल्हा न्यायालयात वकिली करत आहेत. त्यांना जमिनीच्या वादातून मारहाण करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.