सोलापुरच्या ‘शगुप्ता दाल चावल’ची खवय्यांना भुरळ
ब्रँड मे दम है : विशेष लेख (मुबारक शेखजी)
सध्या एकीकडे नोकर्या झपाट्याने कमी होत आहेत. देशभर तरुणांना नोकरीवरुन कमी करण्यात येत आहे. शासनाच्या लाखो रिक्त जागादेखील भरल्या जात नाहीत. तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढलेली आहे. याला सोलापूरदेखील अपवाद नाही. सोलापूरचे निम्मे तरुण पुण्यात नोकरीसाठी जातात आणि नोकरीच्या शोधात भटकतात. तर दुसरीकडे सोलापूरच्या तरुणाईला उद्योजकतेकडे वळण्याची प्रेरणा देणारे चहा, दाल चावल, भजी-वडा पाव असे व्यवसाय सोलापुरात भरभराटीला आलेले आहेत. सोरेगाव रस्त्यावरील शगुप्ता दाल चावल सेंटर हे याचे उत्तम उदाहरण आहे.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी “दुसर्यांकडे काम करण्यापेक्षा चार लोकांना काम देणारे बना” असे सांगितले आहे. सोलापुरातील एका हॉटेलात काम करणार्या पिता-पुत्रांनी स्वतःचा काहीतरी उद्योग करावा, असा विचार मनात घेऊन हा व्यवसाय सुरू केला. सोलापूरच्या लोकांची भूक स्वस्तात भागवण्याच्या उद्देशाने बाशा अब्दुल शेख आणि वकील बाशा शेख या पिता-पुत्रांनी “शगुप्ता दाल चावल सेंटर” ची सुरुवात 2013 साली सोरेगाव रस्त्यावर केली. या दाल चावल सेंटरमुळे आठ ते दहा लोकांना रोजगार मिळतो.
शगुप्ताच्या दाल चावलची चव खूप छान असल्याचे सोलापूरकर सांगतात. शगुप्ताचे दाल चावल आणि त्यासोबत भजी खाणे हे एक खाऊगिरीच्या दुनियेतील नवीन समीकरणच बनले आहे. शगुप्ताचे हे दाल चावल शुद्ध शाकाहारी असते. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी दाल चावल बनविला जातो तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला आहे. शगुप्ताचे दाल चावल आणि भजी प्रत्येकी फक्त दहा रुपयांना मिळतो. सेंटर सुरू केल्यापासून ते आजपर्यंत कितीही महागाई वाढली तरी दाल चावलची किंमत वाढवलेली नाही. म्हणजेच फक्त वीस रुपयांत दाल चावल आणि भजीने पोट भरते.
कोणताही व्यवसाय अथवा उद्योग करताना प्रामाणिक राहून ग्राहकांची सेवा केल्याने उद्योग आपोआप वाढतो. – बाशा शेख
शगुप्ता दाल चावल सेंटर सोलापूर शहराच्या बाहेर असूनदेखील सोलापूरचे लोक आवर्जून तिथे जातात आणि दाल चावल खातात किंवा पार्सल घेतात. शगुप्ता हॉटेलवर ग्राहकांची तूफान गर्दी लोटलेली असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठमोठे नेते, उद्योजक, व्यावसायिकदेखील आवडीने शगुप्ताला भेट देतात आणि दाल चावलचा आस्वाद घेतात. सुरूवातीस दररोज दोन किलो तांदूळापासून सुरू झालेला प्रवास आज शंभर किलो तांदूळ खप होण्यापर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे नोकरदारही कमावणार नाही एवढं ते भरगच्च उत्पन्न हे पिता-पुत्र मिळवतात. हे सगळं ईश्वराच्या कृपेने आणि ग्राहकांच्या आशीर्वादानेच शक्य झाले असल्याचे बाशा शेख आवर्जून सांगतात.
कोणताही व्यवसाय अथवा उद्योग करताना प्रामाणिक राहून ग्राहकांची सेवा केल्याने उद्योग आपोआप वाढतो. त्यामुळे सोलापूरच्या तरुणाईने नोकरीच्या मागे फरफटत न जाता उत्तम शिक्षण घेऊन सोलापूरच्या भरभराटीसाठी नवनवीन उद्योगधंदे उभे करावे आणि सोलापूरच्या तरुणाईच्या रिकाम्या हातांना काम द्यावे. असा मौलिक सल्ला वजा संदेश शगुप्ताचे चालक आणि मालक बाशा अब्दुल शेख सोलापूरच्या तरुणाईला देतात.
– मुबारक शेखजी