“सुषमा अंधारे राष्ट्रवादीत गेल्यानेच मी घटस्फोट घेतला”
विभक्त पती ॲड. वैजनाथ वाघमारे यांचा गौप्यस्फोट
Edited by Nana Halangade
“सुषमा अंधारे या राष्ट्रवादीत गेल्याची बाब मला खटकली. त्यांना मला नेता बनवायचे होते. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत जाऊन चूक केली. याच कारणावरून मी त्यांच्याशी घटस्फोट घेतला आहे. आम्ही पाच वर्षांपासून विभक्त आहोत. त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे.” सुषमा अंधारे यांनी आजपर्यंत केलेल्या वक्तव्याचा येत्या चार दिवसांत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याची खळबळजनक घोषणा सुषमा अंधारे यांचे विभक्त पती ॲड. वैजनाथ वाघमारे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या त्यांच्या आक्रमक भाषणांमुळे अलीकडील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. मागील आठवड्यात त्यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती. त्याला गुलाबराव पाटील यांनीही प्रत्युत्तर देत टीका केली होती.
दरम्यान सुषमा अंधारे यांचे विभक्त पती एडवोकेट वैजनाथ वाघमारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात दाखल झाले आहेत. त्यांनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधून आपली बाजू मांडली.
वैजनाथ वाघमारे म्हणाले की, सुषमा अंधारे यांच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. आम्ही अनेक वर्षे एकत्रितपणे सामाजिक कार्य केले आहे. यांच्या शैक्षणिक वाटचालीत येथे मी सोबत होतो. आमचे लग्न होऊन सुखाचा संसार सुरू होता. मात्र मधल्या काळात सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मला मान्य नव्हता. तेव्हापासून आमच्यात वैचारिक मतभेद सुरू झाले. हे वैचारिक मतभेद टोकाला गेले आणि आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मागील पाच वर्षापासून आमच्यात कोणतेही नातेसंबंध नाहीत.
त्या वेगळ्या आहेत. मागील काही दिवसांपूर्वी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. ही बाब खटकणारी आहे. मी माझ्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शिंदे गटात प्रवेश करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोरगरीब, वंचित, उपेक्षित, शेतकरी, शेतमजूर यांना न्याय देणारे नेतृत्व असल्याने मी त्यांच्या प्रेमात पडलो.
सुषमा अंधारे यांना राजकीय भूमिका घेण्याची स्वातंत्र्य आहे. त्यांनी यापूर्वी मराठा समाजावर केलेल्या आरोपांचाही मी गौप्यस्फोट करणार आहे. येत्या काही दिवसात मी स्वतः जळगाव येथे जाऊन गुलाबराव पाटील यांच्या गावात पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत मी सुषमा अंधारे यांच्याबाबत मोठा खुलासा करणार आहे.
सुषमा अंधारे या शिवसेनेची तोफ आहेत असे मला वाटत नाही. त्या ज्या पुस्तके वाचून बोलतात ती पुस्तके कोणी घेऊन दिली हेही मी सांगणार आहे. सुषमा अंधारे यांनी घेतलेली राजकीय भूमिका ही आंबेडकरी चळवळीशी केलेली बेइमानी आहे हेही मी तेथे सांगणार आहे. याशिवाय त्यांच्या बाबतच्या लोकांसमोर न आलेल्या अनेक गोष्टींचा मी खुलासा करणार आहे.
अंधारे यांना घेरण्याचा प्रयत्न
आपल्या तडाके बंद भाषणांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर तोफ टाकणाऱ्या सुषमा अंधारे यांना घेरण्याचा प्रयत्न या एकूण राजकारणातून दिसून येत असल्याचे मत अनेक जाणकार व्यक्त करीत आहेत. जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी याबाबत फेसबुक पोस्ट करत “विरोधकांना शह देण्यासाठी एखाद्या महिलेच्या विभक्त पतीला राजकारणात ओढण्याचे पाप करू नका” असे म्हटले आहे.
शहाजीबापूंच्या इलाख्यात ठाकरेंचा बॉम्ब, लक्ष्मण हाकेंची पक्ष प्रवक्तेपदी नियुक्ती
“घे चुना.. मळ पुन्हा” गायछाप गुजरातेत गेल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही