सुषमा अंधारे म्हणाल्या, “देवेंद्रजी यह डर होना जरुरी है.. मै एन्जॉय कर रही हुं”
सोलापूरच्या सभेत अंधारे यांची तुफान फटकेबाजी
सोलापूर : विशेष प्रतिनिधी
“देवेंद्रजी.. मी भीमाची, फुले, कबिरांची लेक आहे. मी अभ्यास करून बोलते. मी शिवसेनेत येवून चार महिने झाले नाही तोवर तुम्ही घाबरलात. वारकऱ्यांचा मी अपमान केला असे तुम्हाला वाटते. कर्नाटकात देवाच्या डोक्यावर पाय ठेवून पूजा केली जाते. इंदुरीकर महाराज सतत देवतांचा अपमान करतात.
श्री श्री रविशंकर यांनीही पार्वतीची निर्भर्त्सना केली. संभाजी भिडे गुरुजी तुकारामांचा अपमान करतात. हे सर्व तुम्हाला चालते. कारण हे लोक तुम्हाला प्रश्न विचारत नाहीत.” असा पलटवार करत सुषमा अंधारे यांनी, “देवेंद्रजी यह डर होना जरुरी है.. मै एन्जॉय कर रही हुं” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ललकारले.
सोलापूर येथे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. सुषमा अंधारे यांनी या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लक्ष करीत प्रचंड टीका केली. फडणवीस यांनी नुकतेच अंधारे यांनी वारकरी संतांचा अवमान केल्याचे म्हटले होते.
त्याला प्रत्युत्तर देत सुषमा अंधारे यांनी आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आगपाखड केली. विविध राजकीय नेते, तथाकथित साधुसंत, लोकप्रतिनिधी यांच्याकडून हिंदू धर्म, हिंदू देवतांचा तसेच महिलांचा सातत्याने होणारा अपमान, विटंबना यांची व्हिडिओद्वारे पोलखोल केली आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले.
सुषमा अंधारे म्हणाले की मी भिमाची वाघीण आहे म्हणाल्या की, कांशीराम यांचे माझ्यावर संस्कार झाले आहेत. मी केडरमध्ये वाढली आहे. कोणतीही गोष्ट अभ्यासाशिवाय, विचार केल्याशिवाय बोलत नाही. त्यामुळे तुम्ही मला कशातही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी ते तुमच्याने शक्य होणार नाही.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपने तुमचे मांजर केले आहे. महाराष्ट्रातल्या गाड्या कर्नाटकात फोडल्या जात असताना तुम्ही तोंडातून एक शब्दही काढला नाही. या घटनेला पंधरा दिवस उलटले असताना तुम्ही गप्प होता. कारण भाजपचा तुमच्यावर मोठा दबाव होता.
तुमचे प्रतिमाहनन करायचे आणि महाराष्ट्राच्या जनतेतून, जनतेच्या मनातून तुम्हाला उतरवायचे. तुमचे इमेज डॅमेज करायचे हा भाजपचा डाव होता. तो यशस्वी झाला. या घटनेला इतके दिवस झाल्यानंतर आज तुम्ही तोंड उघडले आणि या प्रश्नावर तुम्ही भाष्य केले.
भाजपकडून एकनाथ शिंदे यांना पद्धतशीरपणे संपविण्यात येत आहे. एकनाथ शिंदे गटातील चार ते पाच आमदारांची चौकशी लावण्यात आली आहे. शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, संजय राठोड, राहुल शेवाळे अशा अनेक नेत्यांच्या मागे चौकशी लावून त्यांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याचे काम हे भाजपच करीत आहे.
आपल्याला सेटलमेंटमध्ये मदत करणारे एकनाथ शिंदे चालतात. मात्र प्रामाणिकपणे पक्षनिष्ठा जोपासून उभे आयुष्य भाजपसाठी खर्ची घालणारा एकनाथ खडसे चालत नाही अशी टीका करत सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, चंद्रकांत बावनकुळे, विनोद तावडे आदींचे राजकीय करिअर भाजपने संपवल्याचा गंभीर घणाघात केला.
वाचा सविस्तर