सीईओ दिलीप स्वामी १ नोव्हेंबर रोजी देणार भाईंच्या देवराईला भेट

कोळ्यात कोरोना योद्धा पुरस्कार सोहळा, जि.प. सदस्य तथा ॲड. सचिन देशमुख यांची माहिती

Spread the love

सांगोला : डॉ. नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा विक्रमवीर आमदार कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ डिकसळ (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांनी उभारलेल्या भाईंच्या देवराईला सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे सोमवार, १ नोव्हेंबर रोजी भेट देणार आहेत. त्याच दिवशी कोळा येथे सीईओ दिलीप स्वामी यांच्यासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व अन्य मान्यवरांचा ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक जि.प. सदस्य तथा ॲड. सचिन देशमुख यांनी ‘थिंक टँक लाईव्ह’शी बोलताना दिली.

सीईओ दिलीप स्वामी

‘भाईंची देवराई’ आदर्शवत प्रकल्प
आमदार कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ डिकसळ (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथे पत्रकार डॉ. नाना हालंगडे यांनी स्वताच्या २ एकर जागेमध्ये 10. ऑगस्ट 2021 रोजी ‘भाईंची देवराई’ हा आदर्शवत प्रकल्प साकारला आहे. या प्रकल्पात विविध प्रकारची 1120 झाडे लावण्यात आली आहेत. या कामाचे राज्यभरातून कौतुक होत आहे. एखाद्या नेत्याच्या नावाने साकारण्यात आलेला राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. घेरडी-जत मार्गावर निसर्गाच्या कुशीत वसलेला हा प्रकल्प पाहण्यासाठी लोकांची वर्दळ वाढत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी भेट देत आहेत. आगामी काळात हे ठिकाण वन पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण बनणार आहे. सीईओ दिलीप स्वामी यांनीही यापूर्वीच या प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली होती. त्यानुसार ते सोमवार, १ नोव्हेंबर रोजी देणार भाईंच्या देवराईला भेट देणार आहेत.

जि. प. सदस्य, ॲड. सचिन देशमुख

स्वागत कमानीचे काम पूर्ण
‘भाईंची देवराई’ या प्रकल्पस्थळी भव्य अशी स्वागत कमान साकारण्यात आली आहे. त्याचे काम पूर्ण झाले आहे. धनगर समाज सेवा मंडळ, सांगोला यांनी ही कमान साकारली आहे. या स्वागत कमानीमुळे देवराईच्या वैभवात भर पडली आहे.


कोळा येथे कोरोना योद्धा पुरस्कार व सन्मान सोहळा
कोळा (ता.सांगोला) येथे १ नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता अॅड. अशोकराव देशमुख युवा व क्रीडा मंच, कोळे यांच्यातर्फे कै. भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ व ‘सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. तुलसी मल्टीपर्पज हॉल, कोळा येथे हा कार्यक्रम होईल. जि.प. सदस्य तथा अॅड. सचिन देशमुख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. याच कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा ‘कोरोना योद्धा पुरस्कार’ देवून सन्मान करण्यात येणार आहे.

योद्धा पुरस्कार व सन्मान सोहळ्याचे सत्कारमूर्ती
श्री. दिलीप स्वामी (जि.प. मुख्य कार्यकारी)
श्री. मिलिंद शंभरकर (जिल्हाधिकारी)
श्री. डॉ. शितलकुमार जाधव (जिल्हा आरोग्य अधिकारी)
सौ. चंचल पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प., सोलापूर)
श्री. अभिजित पाटील (तहसीलदार, सांगोला)
श्रीमती राजश्री पाटील (पोलीस उपअधिक्षक, मंगळवेढा)
श्री. सुहास जगताप (पोलीस निरीक्षक, सांगोला)
श्री. जावेद शेख (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर)
डॉ. सीमा दोडमणी (तालुका वैद्यकीय अधिकारी, सांगोला)
श्री. संतोष राऊत (तत्कालीन गटविकास अधिकारी)

कोळा जि.प. गटातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान
कोरोना काळात कोळा जिल्हा परिषद गटामध्ये कोरोना निर्मुलनासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जि.प. गटातील आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, सफाई कामगार, तलाठी, पत्रकार, पोस्टमन, पोलीस कर्मचारी, शिक्षक यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. या दोन्ही कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका