
थिंक टँक / डॉ. नाना हालंगडे
डेंग्यू ताप हा एडिस इजिप्ती या डासांद्वारे पसरणारा आजार असून तो डेंग्यूच्या एकूण चार विषाणूंपैकी कोणत्याही एका विषाणूमुळे होऊ शकतो. घरातील किंवा घराशेजारील साठलेल्या स्वच्छ पाण्यातून एडिस इजिप्ती या डासांची पैदास होत असते. या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.
डेंग्यू कशामुळे होतो?
डेंग्यू हा रोग डेंग्यूच्या विषाणूमुळे होत असतो. डेंग्यूच्या विषाणूची लागण ही ‘एडिस इजिप्ती’ या डासांच्या चाव्यातून होत असते.
डेंग्यूचे प्रकार
डेंग्यूचे विषाणु हे चार प्रकारचे असतात. त्या व्हायरसनुसार डेंग्यूचे १, २, ३ किंवा ४ असे प्रकार होऊ शकतात. हे विषाणू डासांच्या चाव्यातून स्वस्थ व्यक्तीच्या रक्तात मिसळतात. आणि त्यामुळे डेंग्यूची लागण होत असते.
लक्षणांनुसार डेंग्यूचे प्रकार
लक्षणांनुसार डेंग्यूचे तीन प्रकार असतात.
*१) सौम्य डेंग्यू ताप (DF)
*२) हेमोरॅजिक डेंग्यू ताप (DHF)
*३) डेंग्यू शॉक सिंड्रोम
वरील तीन प्रकारांपैकी हेमोरॅजिक डेंग्यू ताप (DHF) आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम हे दोन प्रकार अतिशय गंभीर असे आहेत. यामुळे अत्यधिक प्रमाणात रक्तस्त्राव होऊ शकतो. तसेच रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका अधिक असतो. मात्र चांगली बाब ही आहे की, गंभीर अशा हेमोरॅजिक डेंग्यू ताप आणि डेंग्यू शॉक सिंड्रोम होण्याचे प्रमाण हे अत्यंत कमी आहे.
*डेंगू आजार होण्याची कारणे
डेंग्यू हा आजार ‘एडिस इजिप्ती’ या डासांद्वारे पसरत असतो. ह्या डासांची पैदास घरातील फुलदाणी, कुंड्या, टाकी, भांडी किंवा घराशेजारी पडलेल्या टाकाऊ वस्तू यांमध्ये साचून राहिलेल्या स्वच्छ पाण्यात होत असते. ह्या प्रकारचे डास प्रामुख्याने सकाळी व संध्याकाळी चावत असतात. हे डास आपल्या चाव्यातून डेंग्यूचे विषाणू पसरवत असतात. तसेच डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला डास चावून तो डास दुसऱ्या एका व्यक्तीस चावल्यामुळेही डेंग्यूचा प्रसार होऊ शकतो.
डेंग्यूची लक्षणे
Dengue Symptoms in Marathi
डेंग्यू तापाचा संसर्ग झाल्यानंतर, लक्षणे साधारणपणे चार ते सात दिवसानंतर सुरू होतात. अचानक तीव्र ताप येणे (106 डिग्री फॅरेनहाइट पर्यंत ताप येणे),
तीव्र डोकेदुखी,
लिम्फ ग्रंथी सुजणे,
स्नायू व सांध्यांमध्ये वेदना होणे,
तापानंतर साधारण २ ते ५ दिवसांदरम्यान त्वचेवर पुरळ व लालसर चट्टे दिसून येणे,
मळमळ व उलट्या होणे,
पोटात दुखणे,
भूक मंदावणे,
अशी सौम्य डेंग्यू तापाची लक्षणे असतात.
सौम्य असणारा डेंग्यू ताप वाढल्यास त्यामुळे पुढे, हेमोरॅजिक डेंगू तापाची (DHF) स्थिती निर्माण होऊ शकते. हेमोरॅजिक डेंगू ताप ही गंभीर स्थिती असून यामध्ये तीव्र ताप येणे, नाक किंवा हिरड्यामधून रक्तस्त्राव होणे, झटके येणे अशी प्रमुख लक्षणे असतात. आणि जर हेमोरॅजिक डेंगू ताप (DHF) पुढे वाढत गेल्यास रुग्णांचा रक्तदाब कमी होऊन डेंग्यू शॉक सिंड्रोमची स्थिती होते व त्यामुळे रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
सांगोला तालुक्यातील युवा हृदयसम्राट डॉ.अनिकेत (भैय्या) चंद्रकांत देशमुख
डेंग्यू तापाचे निदान Dengue diagnosis test
रुग्णामध्ये असणारी लक्षणे पाहून डेंग्यूची शंका असल्यास, आपले डॉक्टर काही चाचण्या करायला सांगू शकतात. डेंग्यू तापाचे ब्लड टेस्ट करून रक्तातील व्हायरल ऍन्टीबॉडीजची तपासणी केली जाते. याशिवाय पांढऱ्या पेशी (wbc), रक्तातील प्लेटलेट्स यांचीही तपासणी करून डेंग्यूचे निदान करतात.
डेंग्यू ताप आणि उपचार
डेंग्यूवर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे पेशंटमध्ये असणाऱ्या ताप, अंगदुखी अशा लक्षणांनुसार उपचार करण्यात येतात. डेंग्यू तापामध्ये रक्तस्त्राव होण्याचा धोका अधिक असल्याने तापासाठी योग्य ती औषधे द्यावी लागतात. त्यामुळेचं डेंग्यू तापामध्ये कधीही aspirin आणि ibuprofen अशी औषधे दिली जात नाहीत. यासाठी डॉक्टर paracetamol हे औषध देऊ शकतात.
डेंग्यू तापामुळे शरीरातील क्षार व पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते. यासाठी आयव्ही फ्लुइड देण्यात येते. तसेच रुग्णास ओआरएस द्रावण, द्रव पदार्थ किंवा फळांचा रस दिला पाहिजे. डेंग्यूच्या तापात रुग्णाने बेड रेस्ट घेणे आवश्यक असून आपल्या डॉक्टरांनी दिलेलीचं औषधे घ्यावीत.
पाहा खास व्हिडिओ