सांगोला/नाना हालंगडे
जगभरातील अब्जावधी लोकांचे जगणे मुश्किल करणारा कोरोना भारतातून गेल्यासारखी स्थिती असताना हाच भयावह कोरोना पुन्हा एकदा दार ठोठावत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली असली तरी घाबरून न जाता त्याचा सामना करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.
डिसेंबर 2019 मध्ये कोविड या विषाणूने जगभर उच्छाद मांडला होता. संपूर्ण जगाने आपापल्या देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. ‘लॅन्ड टु स्काय’ आवागमन बंद होते. निर्जन रस्ते आणि घरांची कवाडे बंद होती. केवळ मोबाईल सारख्या संवाद साधनाच्या माध्यमातून धक्कादायक आणि दुखःदेणार्या घटनांची माहिती मिळत होती.
डिसेंबर महिन्यात 25 डिसेंबर पासूनच नाताळच्या आणि नववर्षाच्या सुट्यांचे वेध लागलेले असतात. महिना भरापासूनच ‘न्यू ईयर’ म्हणजे नवीन वर्षाचे वेध लागलेले असतात. 31 डिसेंबर पर्यंत चुकीच्या अनेक गोष्टी नूतन वर्षात बदलण्याचे संकल्प केले जातात. मॉर्निंग वॉकला सुरूवात करणार, जीम जॉईन करणार, वजन कमी करणार पासून आता मद्य पिणे बंद, नॉनव्हेजला बंदी असे अनेक संकल्प शुद्धीत आणि शेवटचा ‘पेग’ घेईपर्यंत केले जातात. अर्थात त्यात खुप मजा देखील असते. आणि या केलेल्या संकल्पाचे साक्षीदार बायको, बहिण किंवा जवळचे मित्र असतात.
संकल्प केेलेल्या मंडळींपैकी 20 टक्के लोक संकल्प केल्याप्रमाणे व्यायामाला, मॉर्निंग वॉकला सुरूवात देखील करतात. गुटका खाणार्या मित्राच्या तोंडात गुटका दिसत नाही. पिणारा मित्र ‘आपण सोडली’ अशा मोठ्या अविर्भावात फिरत असतो. मॉर्निंग वॉकला जाणारा मित्र दोन चार हजाराचा ट्रॅकसुट, बुट खरेदी करतो, जीमला जाणारा जीमचे दोन महिन्याचे अॅडव्हॉन्स भरतो, जीम जॉईन करतो. परंतू हा सर्व प्रकार अवघे नऊ दिवस सुरू असतो, दहाव्या दिवशी ही मंडळी आपल्या घरात आरामात झोपलेली असते. घेणारा मित्र लपून-छपून एखाद्या बारमध्ये असतो. आणि गुटका खाणारा आता दिवसातून ‘एकच पुडी’ असे सांगून वेळ मारून नेतो. हे सांगण्याचे तात्पर्य एव्हढेच की 2019 पासून तर 2021 तब्बल दोन अडीच वर्ष नवे वर्ष साजरे करण्याचा, नवे संकल्प करण्याचा आनंद आम्ही घेवू शकलो नाही.
2019 च्या डिसेंबरमध्ये चीनमधून आलेल्या कोविड-19 या विषाणूने जगभर उच्छाद मांडला, सर्व संशोधक, वैज्ञानिक, आरोग्य क्षेत्रातील सुपर स्पेशालिटी तंत्रज्ञान या कोविड-19 पुढे हतबल झाले. पराभूत झाले. हजारो-लाखो लोक जगाच्या पाठीवर मृत्युमुखी पडले. पुढे काय ? याचे उत्तर कुणाकडेही नव्हते. लॉकडाऊनची घोषणा आणि अनुभवातून जगण्याचे कौशल्य आम्ही या काळात आत्मसात केले.
घरात दुध नसतांना चहा बनविण्यापासून तर घरातल्या घरात केस कापण्याचे (कटींग) कौशल्य आम्ही शिकलो. आणि ऑनलाईन जॉब ते ऑनलाईन शिक्षण या नव्या गोष्टी देखील आम्ही आत्मसात केल्या. नोकरी गेली, वेतन बंद झाले, स्वतःजवळ असलेली गंगाजळी संपली तरीसुद्धा आम्ही खचलो नाहीत. जीवन किती ‘क्षणभंगुर’ आहे याची प्रचिती आपले आप्तेष्ठ आपले जवळचे मित्र अचानक निघून गेल्याने अनुभवली. या काळात अनेक व्यक्तींनी, सामाजिक संघटनांनी कुणी भुकेल्या पोटी झोपणार नाही याची सामाजिक काळजी घेत माणूसकी जपली.
डॉक्टर, पोलीस, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी नर्सेस, ब्रदर, पोलीस बांधव यांनी ‘देवदूताची’ भूमिका पार पाडली. जगातील सर्व वाहने जागेवर उभी होती. कारखाने उद्योग बंद असल्याने आकाश ‘निरभ्र’ होते. कुठेही धुराच्या रेषा दिसत नव्हत्या. पक्षांची किलबील देखील नव्हती. डिसेंबर 2019, डिसेंबर 2020, डिसेंबर 2021 आणि आता डिसेंबर 2022 सुद्धा. चिनमध्ये पून्हा आठ कोटी नागरीकांना कोविडची लागण झाल्याचा बातम्या झळकू लागल्या आहेत.
त्याचसोबत अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील सारख्या देशामध्ये कोविडने डोके वर काढल्याने भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने काल उच्चस्तरीय अधिकार्यांची ‘हायटेक’ बैठक दिल्ली येथे घेतली. आणि देशातील सर्व राज्यांना ‘अर्लट’ राहण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविय यांनी दिल्या आहेत. डिसेंबर मध्ये कोविडची सुरूवात झाली म्हणजे फेब्रुवारी व मार्च मध्ये जर याचा प्रसार पून्हा झाला तर सावधान… कोविड पुन्हा येतो आहे.
चिंता नको परंतू काळजी मात्र निश्चितपणे घ्या अशी सूचना देण्यासाठी या लेखाने प्रयोजन. आता आम्ही घाबरणार नाही, अशी शेखी मिरवू नका. परंतू मी आता या कोविडचा सामना करण्यासाठी ‘सज्ज’ आहे या भावनेतून सर्व गोष्टींना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा. अत्यावश्यक मेडिसीन, स्वच्छता, मास्क, गर्दीत जाण्याचे टाळणे, घरात लागणार्या आवश्यक खाण्याच्या वस्तू, किराणा, बीपी, ऑक्सिजन लेव्हल चेक करणारी यंत्रे, सॅनिटायझर, रोकड पैसे, घरातल्या घरात अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना लागणारी साधने, अशा सर्व प्रकारची तयारी करण्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी करून ठेवा, कारण मुंबई शहरात 17 रूग्णांची संख्या 135 पर्यंत पोहचली आहे.
चीन सारख्या देशात मृतदेहांना जाळण्यासाठी 24 तासाचे वेटींग आहे इतके मृत्यू होत आहेत. कोविड विषाणूमध्ये अद्यापही उत्परिवर्तन क्षमता असल्याने एका नव्या स्वरूपामध्ये कोविड विषाणू पुन्हा पसरू शकतो अशी भिती अमेरिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केल्या आहेत. खाजगी दवाखाने, रूग्णालयांनी देखील या दृष्टीने सज्ज राहण्याची आवश्यकता आहे.
महाराष्ट्र सरकारने देखील या संदर्भात टास्क फोर्सची स्थापना केली असून राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांना अर्लट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मास्क लावण्याचे बंधन करण्याची सूचना देखील येवू शकते. न्युमोनिया, अस्थमा, जिर्ण आजार झालेल्या रूग्णांवर निशेष लक्ष देण्याची सूचना केंद्राकडून आली आहे. बुस्टर डोस (तिसरा अतिरिक्त डोस) घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
ख्रीसमस, न्यु ईयर, मोठे कार्यक्रम साजरे करण्यावर बंदीची घोषणा होवू शकते. राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रा थांबवावी यासह महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात देखील यावर चर्चा झाली. म्हणून ‘दोन वर्षाचे कोविड-19 चे एक्सपिरियन्स सर्टीफिकेट’ आपल्या सर्वाजवळ असल्याने आपण सर्वांनी सावधानतेने आता याची खबरदारी घ्यावी.
हेही पाहा