सांगोल्यात सिनेस्टाईल थरार, दोघांचे ९ लाख रुपये लुटले
बागलवाडी फॉरेस्टजवळील घटना, कार पेटविली
सांगोला/ एच. नाना
अगदी चित्रपटातला साजेशी जबरी चोरीची घटना सांगोला तालुक्यात घडली आहे. अज्ञात अनोळखी इसमांनी कारमधून फिल्मी स्टाईलने पाठलाग करीत दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात झाल्याचा बनाव केला.
कारमधील दोघांनी दुचाकीवरील दोघांना दगड व हाताने मारहाण करून एकाच्या पॅन्टच्या खिशातून सुमारे ९ लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम सोन्याची बिस्किटे, ५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल जबरदस्तीने काढून घेवून सुमारे ९ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लुटला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
चोरट्यांनी जाताना त्यांची कार पेटवून देवून अपघात झाल्याचा बनाव करीत तेथून दुचाकीवरून धूम ठोकली.
त्यांनी दुचाकीचे पुढील फायबर फोडून सुमारे २ हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना सोमवार ८ रोजी रात्री ८:३०च्या सुमारास एखतपुर-अचकदाणी रोडवरील बागलवाडी फारेस्टच्या हद्दीत घडली.
याबाबत, सुशांत बापुसो वाघमारे रा. दिघंची ता. आटपाडी यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर करीत आहे.