सांगोल्यात भीषण अपघात, ओमनीला चिरडले, तिघे ठार
नऊजण गंभीर जखमी, थरकाप उडवणारे दृश्य
सांगोला (विशेष प्रतिनिधी) : भरधाव मालट्रकने ओमनी कारला समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह तिघेजण जागीच ठार झाले. तर कारमधील लहान मुले, महिला ,पुरुष असे 13 जण जखमी झाले. हा अपघात सांगोला – मिरज रोड वरील करांडेवाडी उड्डाणपुलाजवळील सर्विस रोडवर घडला. जखमींना तातडीने जवळीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सांगोला मिरज रस्त्यावर कारंडेवाडी फाट्याजवळ मालट्रक आणि ओमनी अपघातामध्ये ओमनी ड्रायव्हरसह दोन लहान मुलांचा जागीच मृत्यु झाला आहे. तर ओमनीतील 9 जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या दुर्घटनेत ओमनीचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
चालकासह दोन चिमुकलींचा मृत्यू
सांगोला तालुक्यातील उदनवाडी येथील ओमनी चालक दाजीराम लक्ष्मण शिंगाडे हे उदनवाडी येथून 12 प्रवाशांना घेऊन कर्नाटकच्या सिंदगी येथे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास निघाले होते. या दरम्यान कारंडेवाडी फाट्याजवळ ओमनी आणि मालट्रक दोघांमध्ये समोरासमोर अपघात झाला. यामध्ये ओमनी चालक आणि त्यांच्या शेजारी असणारी कावेरी मनोज हरिजन (वय 7) गुड्डी चंद्रकांत मगिरी (वय 8) या दोघींचा मृत्यू झाला. तर ओमनी मधील 9 जण जखमी झाले आहेत.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
थरकाप उडवणारा अपघात
अपघात इतका भीषण होता की कार चालक दाजीराम शिंगाडे याचा डावा व उजवा पाय गुडघ्यापासून खाली तुटल्याने जागीच ठार झाला. तर कारमधील कावेरी हरिजन हिच्या डोक्याला पाठीमागील बाजूस व तोंडावर गंभीर मार लागला होता. तिला तात्काळ उपचाराकरता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या गुड्डी मगिरी हिला उपचाराकरिता पंढरपूरला घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. उर्वरीत जखमींना रुग्णवाहिकेतून उपचाराकरता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातात कारचा चक्काचूर झाला असून अपघात घडताच चालक ट्रक जागेवर सोडून पळून गेला. याबाबत ,माणिक लक्ष्मण शिंगाडे रा.उदनवाडी यांनी मालट्रक चालकाविरुध्द फिर्याद दाखल केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत