सांगोल्यात दोस्ती अन् राज्यात कुस्ती
खणखणीत राजकीय वार्तापत्र
सांगोला / नाना हालंगडे
भाजपा व शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांच्या नेत्यांमध्ये राज्यात दररोज कुस्ती तर सांगोल्यामध्ये याच पक्षांच्या नेत्यांमध्ये मात्र दोस्ती अशी परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. सांगोला शेतकरी सहकारी सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यात शेकापनेही विरोधकांची मोठी मदत घेतल्याने तेही त्याच पद्धतीचे राजकारण करताना दिसत आहेत. एका अर्थाने सांगोला तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष, त्यांची विचारधारा याची खिचडी झाल्याचे दिसून येत आहे. हे राजकारण सकारात्मकतेचे म्हणायचे की सोयीचे? असा मोठा सवाल कार्यकर्त्यांपुढे आहे.
बापूंचा कामाचा सपाटा
तालुक्यात आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हातून सध्या विकासकामांची उद्घाटने दररोज सुरू आहेत. सदर कार्यक्रमाला शेकापचे नेते वगळून काँग्रेस-राष्ट्रवादी भाजपा, शिवसेना शिंदे गटाचे नेते उपस्थित असतात. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे तालुक्यातील सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर उद्घाटन आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते होत असते.
आमदार पाटील हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सातत्याने सडकून टीका करतात. परंतु त्या टीकेला तालुक्यातील एकही राष्ट्रवादी नेता उत्तर देत नाही. त्यामुळे दीपकआबा साळुंखे-पाटील हे ही भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या तालुक्यात जोरात चालू आहे. मात्र सध्या तरी या चर्चेत तथ्य दिसून येत नाही.
माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील हे शरद पवार यांना दैवत मानतात. साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटन प्रसंगी दीपकआबांनी आमदार पाटील यांना “शरद पवार यांच्यावर टीका करू नका” असे जाहीरपणे ठणकावून सांगितले होते. तरीही बापू मात्र पवार यांच्यावर टीका करण्यास थांबत नाही. त्यांचा रोजचा कार्यक्रम सुरूच आहे.
शेकापनेही घेतली विरोधकांची मदत
सांगोला सूतगिणीची निवडणूक बिनविरोध झाली. ती निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी चंद्रकांत देशमुख, पोपट देशमुख हे दोन बंधू व डॉ.बाबासाहेब व डॉ.अनिकेत या दोन चुलत बंधूनी विरोधकांना विश्वासात घेऊन निवडणूक बिनविरोध केली. डॉ. प्रभाकर माळी यांना चेअरमन करून अनेकांच्या चेअरमन पदाच्या इच्छेवर पाणी फिरवले.
कुणाचं चाललंय काय?
तालुक्यातील 81 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये 55 हून अधिक सोसायट्यांवर शेकापणे वर्चस्व मिळवले आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या सहा ग्रामपंचायतीवर शेकापची सत्ता होती. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर निवडणुका होत असून सदर निवडणुकीत डॉक्टर बंधूंचे नेतृत्व पणाला लागणार आहे. या निवडणूकीत आमदार शहाजीबापू पाटील हे शेकापला धोबीपछाड करतात का? याकडे लक्ष लागले आहे.
सरपंच पद हे प्रत्यक्ष मतदारातून निर्वाचित होणार असल्याने सदर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाची कोणत्या पक्षाबरोबर युती महायुती कशी होते यावर पुढील नगरपालिका, जिल्हा परिषद, समिती च्या निवडणुकीत सर्व पक्षांच्या नेत्यांचे भवितव्य समजून येणार असल्याने आमदार शहाजी बापू पाटील यांनी विकास कामाचा निधी आणून भूमिपूजनाचा कार्यक्रमावर भर दिला आहे.
शेकापचे नेते डॉ.बाबासाहेब व डॉ.अनिकेत तसेच चंद्रकांत देशमुख हे जनतेच्या संपर्काच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवीत आहे व त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. मात्र आ. शहाजी पाटील यांनी ताकद लावल्यास ही निवडणूक शेकापला अवघड जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
शिवसेनेची बंडखोरी केल्याने शिंदे गटातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अडचणी निर्माण झाल्या आहेत. परंतु आमदार शहाजी बापू पाटील हे बंडखोरी करूनही काय झाडी, काय डोंगर या वाक्यामुळे पाटील तालुक्याचे नेते समजले जात होते. परंतु ते राज्य पातळीवरील शिवसेना शिंदे गटाचे प्रभावी नेते झाले आहे. त्यांना राज्यात मागणी वाढत आहे. तसेच त्यांच्या त्या वाक्यामुळे सर्व पक्षातील नेत्यांना भुरळ पडली आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील यशावर त्यांची तालुक्यात किती भुरळ पडली हे दिसून येणार आहे.
निष्ठावान नाराज?
सध्या आमदार पाटील हे निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलतात अशी मोठी चर्चा आहे. परंतु पाटील कार्यकर्त्यांना नेहमीच पाठबळ देतात असेही त्यांच्या गोटातून सांगितले जत आहे. तसे पाहता आ.पाटील यांनी काँग्रेस, अपक्ष, भाजप, शिवसेना, आता शिवसेना शिंदे गट पक्ष बदल त्यांनी केले आहेत. परंतु असंख्य कार्यकर्ते मात्र व्यक्तीगत पाटील यांच्यावर प्रेम करत असले तरी ते मूळच्या ठाकरे शिवसेनेत राहिले आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दुसऱ्या पक्षात असणाऱ्या कार्यकर्त्याला आमदार पाटील कशी काय ताकद देतील असा सवाल आहे. परंतु पाटील ज्या पक्षात जातात त्यांच्याबरोबर असणाऱ्याला त्यांची ताकद ते वाढवितात, तसे प्रयत्न करतात हे दिसून येत आहे.
दीपकआबांचे कार्यकर्ते “आर या पार”च्या तयारीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांचे कार्यकर्ते हे यंदा दीपकआबांनाच आमदार करायचे या ईर्षेने पेटले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांकडून जोरदार चर्चा होताना दिसून येत आहे. दीपकआबाही विविध कार्यक्रम तसेच बैठकांच्या, आंदोलनांच्या निमित्ताने सक्रिय आहेत. यंदाची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची आणि जिंकायची या तयारीने कार्यकर्ते मोठ्या नेत्याने कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे.
भाजप बॅकफूवर
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये सांगोला तालुक्यातील भारतीय जनता पक्ष मात्र बॅकफूवर गेला असल्याचे दिसत आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे एका कोर्ट मॅटरमध्ये अडकले असल्याने ते जोपर्यंत सक्रिय होत नाहीत तोपर्यंत भाजपचे सांगोला तालुक्यातील काम उठावदार नसेल हेही यातून दिसत आहे.
भाजपचे तालुक्याचे नेते चेतनसिंह केदार हे तालुक्यातील भाजपला सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत असले तरी श्रीकांत देशमुख यांनी जो आंदोलनाचा धडाका मागील काही महिन्यांपूर्वी लावला होता तो माहोल सध्या सांगोला तालुक्यात दिसून येत नाही. शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचे सरकार आल्याने आता भाजपला तालुक्यात किंवा इतर ठिकाणी आंदोलने करण्याची गरज पडली नसली तरीही सांगोला तालुक्याचा विचार करता शिंदे गटाच्या आमदार शहाजीबापू पाटील यांच्या करिश्मामुळे भारतीय जनता पक्ष सांगोला तालुकापुरता का असेना झाकोळला असल्याचे दिसून येत आहे.
आरक्षण पडणार का?
विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेनुसार सांगोला तालुक्यात अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ आरक्षित होईल अशी चर्चा होताना दिसत आहे. त्या दृष्टीनेही अनुसूचित जाती घटकातील इच्छुक उमेदवार त्यांच्या त्यांच्या ताकतीनुसार मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. सर्वच पक्षातील अनुसूचित जातीच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेत्यांना हा मतदारसंघ आरक्षित झाल्यास तिकिटाची माळ आपल्याच गळ्यात पडेल असे वाटत असल्याचेही दिसत आहे. त्याही अनुषंगाने सांगोला तालुक्यात मतदार संघ आरक्षणाची चर्चा सातत्याने होताना दिसत आहे. मात्र याचे चित्र पुढील वर्षभराच्या काळात स्पष्ट होईल हे मात्र निश्चित.
लक्ष्मण हाकेंना बळ
महादेव जानकर तसेच गोपीचंद पडळकर यांच्यासोबत राज्यभर एक आक्रमक नेता म्हणून काम केलेले राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य असलेले लक्ष्मण हाके यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चांगलेच बळ दिले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर लक्ष्मण हाके यांना पक्षाचे उपनेतेपद देण्यात आले होते.
मात्र मागील पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना शिवसेनेने पक्ष प्रवक्ते पदाची मोठी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदेंची शिवसेना व ठाकरेंची शिवसेना यामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. लक्ष्मण हाके यांनी प्रवक्ते पदाची जबाबदारी अंगावर पडताच राज्यभरामध्ये भेटीगाठींचा धडाका लावला आहे. आगामी काळात तेही सांगोला तालुक्यात नेटाने कामगिरी करताना दिसतील अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.