सांगोल्यात तिहेरी अपघात पती-पत्नी ठार
कार, रिक्षा व दुचाकीचा अपघात
सांगोला / एच. नाना
भरधाव इर्टिगा कार, रिक्षा व दुचाकीच्या झालेल्या तिहेरी भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतमजूराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
हा अपघात सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास सांगोला – पंढरपूर रोड वरील हॉटेल चंद्रमाला जवळ घडला. अपघातानंतर रिक्षाचालक रिक्षा घेऊन पळून जाताना ग्रामस्थांनी बामणी ता. सांगोला गावात पकडले.
ज्ञानदेव नामदेव भिसे (वय -४५) व बबिता ज्ञानदेव भिसे (वय -४० दोघेही रा. फणेपुर ता. लोहारा जि. उस्मानाबाद) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
या अपघातात इर्टीगा कार चालक जखमी झाला असून त्याचे नाव समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस नाईक राहुल देवकते घटनास्थळी धाव घेऊन मृत व जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेतून सांगोला रुग्णालयात हलवले.
मृतांचे नातेवाईक मूळ फणेपूर ता.लोहारा जि.उस्मानाबाद येथून येण्यास विलंब लागल्यामुळे रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते तर अपघाताची नोंदही झाली नव्हती.