सांगोल्यात डाळिंब बागांवर बुलडोझर
तेल्यासोबतच "शॉट होल बोरर"चा विळखा
सांगोला / नाना हालंगडे
सांगोल्याचं सोनं असलेलं डाळिंब आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तेल्या, बिब्या, मर रोगापाठोपाठ आत्ता “शॉट होल बोरर” या किडीचा मोठा प्रादुभाव दिसून येत असल्याने डाळिंब झाडे वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी वैतागले असून उभ्या बागांवर ट्रॅक्टर फिरवीत आहेत.
सांगोल्याच डाळिंब सातासमुद्रापलीकडे पोहचलं. चांगली आंतरराष्ट्रीय बाजारपेठही मिळू लागली. पण, मागील दोन वर्षापासून तेल्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येवू लागल्याने बागायतदार शेतकरी पुरता हैराण झाला आहे. अशातच बदललेले हवामान, अवकाळी पाऊस, व ढगाळ वातावरण यामुळे मोठा फटका बसलेला आहे.
राज्यातील सर्वाधिक व जिल्ह्यातील जादा क्षेत्र सांगोला तालुक्यात आहे. 25 हजार हेक्टर क्षेत्रापैकी निम्याहून अधिक क्षेत्र याला बळी पडले आहे. याच डाळिंबावरील रोगाचे संशोधन होत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
डाळिंब संशोधन केंद्र कुचकामी
सोलापुरात डाळिंब संशोधन केंद्र आहे. तेही निरुपयोगी ठरत आहे. अशातच आता डाळिंबावर “शॉट होल बोरर” या किडीने आक्रमण केल्याने झाडे वाळू लागली आहेत.
“शॉट होल बोरर”चा झटका
सोलापूर जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे फळपिक असलेल्या डाळिंब या पिकावर काही दिवसापासुन डाळींब पिकावरील “शॉट होल बोरर” या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीमुळे तालुक्यातील डाळिंब बागायती नष्ट होत आहे.
या कराव्यात उपाययोजना
“शॉट होल बोरर” या किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाने काही उपाययोजना सुचविल्या आहेत.
नुकसानीचा प्रकार
१ : प्रौढ मादी झाडाचे खोड, फांदी आणि मुळाच्या उघडया भागावर छिद्र पाडतात.
२ : खोडाच्या आतील भागावर तसेच बाह्य भागावर टाचणीच्या आकाराची लहान छिद्रे आढळुन आल्यास तो मुख्यत्वे शॉट होल बोररचा प्रादुर्भाव समजावा. भुंग्यानी पाडलेल्या छिद्रामध्ये बारीक पिठासारखा भुसा आढळून येतो.
३ : मुळे, खोड व फांद्यावरती भुंग्यानी पाडलेल्या छिद्रामुळे झाड सुरवातीस पिवळे पडते व शेवटी झाड वाळून मृत पावते.
डाळींब पिकावरील शॉट होल बोरर (खोड भुंगेरा) एकात्मिक व्यवस्थापन
अ ) प्रतिबंधात्मक उपाययोजना
१. मर रोग , अती अवर्षणाचा ताण, अती पाऊस, अन्न द्रव्यांची कमतरता इत्यादी कारणामुळे झाड कमजोर होते. अशा झाडांवर शॉट होल बोररचा प्रादुर्भाव होतो म्हणून डाळिंब बाग निरोगी ठेवावी. पोषणतत्वासाठीची स्पर्धा टाळण्यासाठी डाळिंब बाग सतत तणमुक्त ठेवावी.
२. प्रादुर्भावास बळी पडलेल्या तसेच वाळलेल्या फांद्या शोधून जाळून टाकाव्यात म्हणजे भुंग्याचा पुढील प्रसार रोखता येईल . झाड मोठ्या प्रमाणात प्रादुर्भावास बळी पडले असेल तर झाड पुर्णपणे उपटुन जाळून टाकावे. फळबागेच्या आत किंवा जवळ प्रादुर्भावीत उपटलेल्या झाडांचे ढिग करू नयेत. ते तात्काळ जाळून टाकावेत. नाहीतर अशा ढिगांत भुंगेऱ्यांची पैदास होते व ते जवळच्या डाळिंब बागेवर हल्ला करतात .
४. स्वयंचलित सौर इलेक्ट्रिक प्रकाश सापळे प्रती हेक्टरी १ अशा प्रमाणात लावावेत.
५. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन ईमामेक्टीन बेंझोएट ५ टके (एस.जी) झाडाचे खोड व फांद्यांवरील मोकळ्या भागावर फवारावे.
६. खोडाला लेप देणे ( स्टेम पेस्टींग) : – झाडाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर बहार घेण्यापूर्वी व बहार घेतल्यानंतर झाडाच्या तळापासुन २ फुटापर्यंत खोड व फांद्यावरील मोकळ्या भागावर खालील पेस्ट लावावी , – पाणी १० लिटर + लाल माती ४ किलो + ईमामेक्टीन बेझोएट ५ टक्के ( एस.जी ) – २० मिली + कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्लूपी २५ ग्रॅम ब )
उपचारात्मक उपाययोजना :
* : १. पहिली ड्रेचिंग : – ईमामेक्टीन बेझोएट ५ टके ( एन.जी ) + प्रोपकोनॅझोल १० टक्के ( एस.जी ) ( २ ग्रॅम प्रती लिटर + २ मि.ली. प्रती लिटर पाणी )
* दुसरी ड्रेचिंग पहिल्या ट्रेचिंग नंतर १५ दिवसांनी ईमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के ( एस.जी ) + कार्बडेझम ५० टक्के ( डब्लू पी ) ( २ ग्रॅम + १ ग्रॅम प्रती लिटर पाणी ) गोलाकार पध्दतीने ५ ते १० लिटर द्रावण प्रति झाड.
* तिसरी ड्रेचिंग : – दुसऱ्या ड्रेचिंग नंतर १५ दिवसांनी पहिल्या ट्रेचिंगची रसायने घेऊन प्रादुर्भावाच असेल तर तिसरी ड्रेचिंग करावी , Kauns खोड व फांद्यावरी फवारणी ( स्टेम स्प्रे ) : – थायमेथोक्झम २५ टक्के डब्लू जी २ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळुन खोड व फांद्यांच्या मोकळ्या भागावर फवारणी करावी .