सांगोल्यातील पत्रकार दत्तात्रय खंडागळे यांच्या बंधूचा अपघातात मृत्यू
कंटेनरमधील पवनचक्कीचा गट्टू पडला अंगावर; शतपावली करताना घडली दुर्दैवी घटना
सांगोला/ नाना हालंगडे
भरधाव दोन कंटेनरने एकमेकांना कट मारल्याने कंटेनरवरील पवन चक्कीचा अवजड गट्टू रोडच्या शेजारुन शतपावली करुन घराकडे परतणा-या तरुणाच्या अंगावर पडून चेंगरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल बुधवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास सांगोला -पंढरपूर रोडवरील साई गणेश मंगल कार्यालयजवळ घडला. सुशांत वसंतराव खंडागळे – ४१ रा. संगेवाडी ता. सांगोला असे मृत तरुणाचे नाव आहे दरम्यान मृत सुशांत खंडागळे हे सांगोला शेतकरी सूतगिरणीत सुरक्षा अधिकारी म्हणून नोकरीस होते त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी ,दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सकाळ बातमीदार दत्तात्रय खंडागळे यांचे ज्येष्ठ बंधू होते.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की , संगेवाडी येथील मृत सुशांत वसंतराव खंडागळे हा तरुण मंगळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास घरातून सांगोला रोडने शतपावली करीत मेथवडे फाट्यापर्यंत चालत गेले होते.दरम्यान सांगोल्याकडून भरधाव वेगाने आर जे-०१-जीई- ५४३१ हा कंटनेर पवन चक्कीचा अवजड गट्टू घेऊन पंढरपूरकडे निघाला होता तर पंढरपूरकडून भरधाव वेगाने एन एल -०१- एबी- १६११ हा कंटेनर लोखंडी साहित्य घेऊन सांगोल्याकडे येत होता दोन्ही कंटेनर चालकाने साई गणेश मंगल कार्यालयजवळ एकमेकांना कट मारल्याने हिस्का बसून कंटेनरवरील पवन चक्कीचा अवजड गट्टू शतपावली करुन घराकडे परतणा-या सुशांत खंडागळे यांच्या अंगावर पडला.यात गट्टूखाली चेंगरुन त्यांचा जागीच मृत्यू झाला .अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला. या अपघाताची माहिती मिळताच फौजदार लिंबाजी पवार, पोलीस नाईक गणेश मेटकरी ,होमगार्ड गणेश झाडबुके यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व्यक्तीचा पंचनामा केला. याबाबत संतोष विठ्ठल खंडागळे या.संगेवडी याने पोलिसात खबर दिली आहे.