सांगोला/नाना हालंगडे
“काय झाडी.. काय डोंगार… काय हाटील..” या डायलॉगमुळे राज्यात चर्चेत आलेला सांगोला तालुका पुन्हा एकदा एका नव्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. सांगोला आगारातील एका बस चालकाने “माल लावून” एसटी बस सुसाट पळविली. घाबरलेल्या प्रवाशांनी निम्म्या रस्त्यात ही बस थांबून त्या पेताड्या ड्रायव्हरला ताब्यात दिले.
त्याचं झालं असं की, स्वारगेट ते सांगोला बस निघाली. बसमध्ये भरपूर प्रवाशी होते. चालकाने 62 किलोमीटरचे अंतर सुसाट वेगात बस पळवून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण केला. पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वे गेट पासून बस नागमोडी चालू लागली. ट्रकचा कट बसल्याने बस रस्ता सोडून चालू लागल्याने प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यानंतर काही प्रवासी आणि वाहकाने चालकाला बस थांबवण्यास भाग पाडले. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
याबाबत मोहन इंगुळकर (रा. वेल्हा) व मंगल पाटोळे (रा. पंढरपूर) या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार स्वारगेट – सांगोला बस (क्र. एमएच १४ बीटी ३५८४) दुपारी दीड वाजता स्वारगेट बसस्थानकातून निघाली. बसस्थानकाबाहेर येताच दुभाजकाला धडकली. पण, त्यावेळी काही जाणवले नाही. पुढील प्रवास सुरू झाला.
बस वारंवार झोला मारत होती. कधी वेगात, तर कधी रेस करत बसचा प्रवास सुरू होता. पुढचा प्रवास सुरु झाल्यानंतर बस सतत झोल मात होती. कधी वेग जास्त तर कधी रेस करत बस पळत होती.
बसने ट्रकला कट मारला
पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी रेल्वे पासून बस नागमोडी चालू लागली. एका ठिकाणी तर बसने ट्रकला कट मारला. त्यानंतर बस डांबरी रस्ता सोडून साईडपट्टीवरुन धावत होती. यामुळे चालकाने मद्यपान केल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले.
याच दरम्यान, पुणे विभागाचे लाइन चेकर सहायक वाहतूक निरीक्षक कमर शेख, वसंत रावते, रफिक आतार हे नीरा परिसरातच होते. शेख यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली व चालकाला ताब्यात घेत नीरा पोलिसांच्या ताब्यात दिले. बस नीरा स्थानकात आणून प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले. सांगोला आगाराची ही बस ५२ प्रवासी घेऊन निघाली होती.
नियमित तपासणी करताना पालखी मार्गावर ही बस रस्त्याच्या खाली जाऊन थांबली होती. अशा अवस्थेत बस का उभी आहे हे पाहिले असता, चालक संतोष विश्वंभर वाघमारे (वय ३२, रा. लातूर आगार, सांगोला) हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. सोबत वाहक प्रवीण बुरंजे (सांगोला आगार) हे होते. प्रवाशांनी चालक दारू पिऊन बस चालवत असल्याची तक्रार केल्याने चालकाला नीरा पोलिसांच्या ताब्यात दिले.
सांगोला आगारात मनमानी कारभार
सांगोला आगारात सध्या मनमानी कारभार सुरू आहे. प्रभारी असलेला डेपो मॅनेजर वेगळ्याच तोऱ्यात असतो. आज कोणत्याही बसेसला वेळापत्रक नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशी वैतागले आहेत. अनेक बसेस मनात येईल तेव्हा धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सध्या दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. अशातच बसच्या भोंगळ कारभाराचा त्यांना फटका बसत आहे. आज सांगोला आगाराला कोणीच वाली नाही.. अशातच आगारात बसेस ही कमी आहेत….त्यामुळे प्रवाशी, शालेय मुले, मुली यांना खूपच त्रास सोसावा लागत आहे.